भानुशाली कि भानामती : HEMANT JOSHI

भानुशाली कि भानामती


३७-३८ वर्षांच्या प्रदीर्घ पत्रकारितेच्या क्षेत्रात असे कधीही झाले नाही कि अमुक एखाद्यवा विषयावर व्यक्तीवर लिहिण्यासाठी मला तब्बल सहा महिने पूर्व तयारी करावी लागली, म्हणजे पत्रकार अरविंद भानुशाली व्यक्तिमत्व नेमके कसे हे लिहिण्यासाठी मी खरोखरी सहा महिने घेतले, सखोल माहिती घेतली, त्यांच्या सभोवतालचे कडबोळे, भानुशाली यांची काम करण्याची पद्धत त्यांचे व्यवसाय त्यांचे वागणे,बोलणे, त्यांच्या व्यवसायातले, व्यवहारातले प्लस मायनस पॉईंट्स, त्यांची असलेली उठबैस, त्यांनी नादी लावलेले काही समव्यवसायिक, भानूशालीशी संपर्कात राहून आपलेही उखळ पांढरे करवून घेणारा आमच्यातलेच एक बुजुर्ग, असे कितीतरी व्यापक मुद्दे मला तपासायचे होते आणि तेही कोणाला न कळू देता, म्हणून पहिल्यांदा असे झाले, हा व्यक्ती विषय अभ्यासताना मी त्याची कमालीची गुप्तताराखली वाच्यता केली नाही, भानुशाली कुटुंबाच्या बोगस मजूर संस्था हा तर फार नाजूक विषय होता पण त्यावर माहिती घेतांना सहकार आणि सार्वजनिक बांधकाम खात्यातील कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी अभियंत्यांनी आणि ठाणे मुंबईतील अनेक कंत्राटदारांनी, न्बशक्ती मध्ये काम केलेल्यांनी जे सहकार्य केले ते न विसरता येणारे विशेषतः सार्वजनिक बांधकाम खात्यात दरारा निर्माण करण्यासाठी ज्या पद्धतीने एका सुरेख लिखाण करणाऱ्या वार्ताहाराचा वेळोवेळी ज्या पद्धतीने वापर केल्या गेला ते सांगतांना एका उच्च पदस्थ अभियंत्याने डोळ्यातील अश्रूंना वाट मोकळी करून दिली, त्यातून आता बांधकाम खात्यातून कोणाला कसे हप्ते दिले जातात, हेही मला आकडेवारीसह सांगण्यात आले…

सार्वजनिक बांधकाम खात्यात रमेश आगवणे हे अतिशय धाडसी, बेधडक, साहसी, बुद्धिमान अधीक्षक अभियंते आहेत विशेष म्हणजे त्यांचे एकुलते एक चिरंजीव रोहन, वयाच्या केवळ २५-२६ व्य वर्षी आयआयटी पवईचे पदवीधर आहेत, आयआयएम अहमदाबाद चे एमबीए आहेत, ते आयपीएस आहेत आणि आयएएस देखील आहेत, संपूर्ण भारतातले हे एकमेव उदाहरण आहे. रोहन आगवणे यांचे वर्णन वंडर बॉय असेच करावे लागेल…

त्यांचे उदाहरण मात्र येथे मी नावानिशी छापण्याचे धाडस करतोय कारण आगवणे कुठेही घाबरणारे नाहीत. आगवणे २०१० च्या सुमारास ठाणे सार्वजनिक बांधकाम खात्यात कार्यकारी अभियंता होते. त्यांच्या अंतर्गत शहापूर देखील येत होते. एकदा कुठल्याशा कार्यक्रमानिमित्ते शहापूर परिसरात त्यावेळेचे विधान सभा सभापती दिलीप वळसे पाटील येणार होते, त्यांना यायला थोडा उशीर झाला, पण चार चौघात भानुशाली यांनी त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने वळसे पाटलांचा समाचार घेतला, ते बघून आगवणेयांच्या तळपायाची आग मस्तकात गेली कारण वळसे पाटील आणि रमेश आगवणे आसपासच्या गावात राहणारे असल्याने आगवणे यांना वळसे पाटलांच्या प्रेमापोटी भानुशाली यांचे उध्दट उर्मट बोलणे रुचले नव्हते, मात्र त्यावेळी शांत बसणे एवढेच काय त्यांच्या हातात होते. पुढे एकदा भानुशाली यांनी त्यांच्या मालकीच्या शाळेलगत असलेल्या एका अनधिकृत बांधकामाची तक्रार थेट छगन भुजबळ यांच्या कडे केली, भानुशाली शक्तिशाली ते, भुजबळ यांनी आगवणे यांना बोलावून सांगितले, ते अनधिकृत बांधकाम तोडून टाका. आगवणे तेथे पोहोचल्यानंतर त्यांच्या लक्षात आले कि अनधिकृत बांधकाम तर भानुशाली यांच्या शाळेचे देखील आहे, म्हणून त्यांनी दोन्ही बांधकाम पडायला जेव्हा घेतले, भानुशाली यांनी आकांडतांडव केले पण माघारी फिरतील ते आगवणे कसले, त्यांनी चालवला कि हातोडा, नंतर आगवणे यांच्या बदलीसाठी अनेक प्रयत्न झाले, तेव्हा भुजबळ आणि आगवणे एकमेकांकडे बघून फक्त गालातल्या गालात हसायचे. हे असेच उदाहरण मला एकदा आर आर पाटलांनी दिले होते. ते म्हणाले, एक बुजुर्ग पत्रकार म्हणून मी भानूशालीचे अनेक कामे करून दिलीत, 

त्यांनी त्यातली काही धक्कादायक कामेही मला सांगितली होती. पुढे ते म्हणाले, पण हे महाशय, मी कुठे बसलोय, कोणाशी बोलतोय, काहीही न बघता आत यायचे आणि मोठ्याने बडबडत बरळत जणू मी त्यांना घाबरतो, पद्धतीने वागून मोकळे व्हायचे. एकदा मी अत्यंत महत्वाचे हिअरिंग घेत होतो, आणि भानुशाली घुसले कि आत नेहमीच्या पद्धतीने आरडाओरड करीत, मग मात्र माझी सटकली, मी देखील त्यांना मोठ्यांदा म्हणालो, आप्पा, मला माहित आहे कि तुम्ही या राज्याचे २८९ वे आमदार आहेत पण याक्षणी यु प्लिज गो आऊट ( थोडक्यात गेट आऊट ), त्यानंतर मात्र भानुशाली माझ्याकडे दबकून यायचे….अर्थात हे फार शेवटी शेवटी घडले, आबा त्यानंतर लवकरच देवाघरी गेले.

आबांचा विषय निघाला म्हणून मंत्रालयातील गृह बिभागाला, सामान्य प्रशासन विभागाला माझे विचारणे आहे कि अरविंद भानुशाली या पत्रकाराची एकमेव पिटुकल्या वृत्तपत्राच्या वार्ताहराची, मंत्रालय प्रतिनिधींची कार थेट मंत्रालयाच्या आत, परिसरात का, कशी सोडल्या जाते, मोटार कार्स आमच्यातल्याही कित्येकांकडे आहे, मग आम्हाला परवानगी का दिल्या गेलेली नाही, विषय अतिशय गंभीर आहे, निराकरण झाले नाही तर मला माहितीचा अधिकार वापरून प्रसंगी न्यायालयातही जावे लागेल. विशेष म्हणजे माझ्यासारखे कितीतरी सिनियर पत्रकार येथे येतात, अरविंद १९९५ नंतर येथे यायला लागले, तेही सामान्य वृत्तपत्र प्रतिनिधी म्हणून, मग कोणी केले हे पाप त्यांची कार थेट आत घेण्याचे, कृपया नेमके उत्तर अपेक्षित आहे. आता माझे अरविंद भानुशाली यांना एकच सांगणे आहे कि त्यांनी सन्मानाने निवृत्त व्हावे किंबहुना हे असे दहशत निर्माण करून स्वतःचे आणि आपल्या काही फॅटरांचे उखळ पांढरे करून घेणे सोडून द्यावे. विशेषतः भानुशाली यांच्या सभोवताली असलेले, चुकून बसलेले काही तरुण वार्ताहर माझे अतिशय लाडके आहेत, त्यांची लेखणी अप्रतिम आहे म्हणून, त्यांनी देखील सावध व्हावे. अरविंद यांनी खुषाल आपले सार्वजनिक वाढदिवस साजरे करावेत पण स्वतःच्या खिशातून, त्यांनी अनिता सारखे आणखी दिवाळी अंक काढावेत पण जाहिराती घेतांना, वसुली पद्धतीने त्या नसाव्यात, माणसे माझ्याकडे विविध पुरावे देऊन मोकळे झाले आहेत. ठाणे, ठाणे जिल्हा, मुंबईतील शासकीय कार्यालये, विशेषतः मंत्रालय किंवा मंत्रालयातले कित्येक वार्ताहर ज्यांनी विविध अंगांनी भानुशाली अभ्यासले होते, ते सारे माझ्याकडे अनेक कारनामे देऊन मोकळे झाले आहेत, विशेषतः मुंबई तरुण भारत मधून भानुशाली यांच्या बाबतीत सांगितल्या गेलेला किस्सा भानुशाली यांचे नेमके वर्तन, तंतोतंत सांगून गेला. गरज पडलीच तर नक्की तो किस्सा लिहून मोकळा होईल.  माझी खात्री झाली आहे कि पत्रकार भानुशाली हि व्यक्ती नसून ती प्रवृत्ती आहे, आणखी माहिती आल्यानंतर कदाचित मी ती विकृती आहे, असेही लिहितांना मागे पुढे बघणार नाही, मला हे भानुशाली हे वादग्रस्त व्यक्तिमत्व यापुढे फ़ारशी रंगविण्याची इच्छा नाही जर त्यांनी आपली पत्रकारिता करण्याची पद्धत बदलली तरच, अन्यथा हा लढा माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत नक्की सुरु असेल, कदाचित त्यात आणखी काही लटकतील, तेव्हा माझा नाईलाज असेल…

आज मात्र हे नक्की आहे कि भानुशाली यांनी मी म्हणजे दादा, पद्धतीने वागून, पत्रकारांमध्येही गुंडांच्या जशा टोळ्या असतात, तसे बदल घडवून आणू नयेत. थोडेसे आमच्यातल्या सामान्य मंडळींच्या अंगावर भिरकवायचे, स्वतः मग घबाड मिळवायचे किंवा एखाद्याने ऐकले नाही तर त्याच्यावर बहिष्कार टाकण्याचे नको तसे प्रयत्न करायचे, हे योग्य नाही, मग आपल्यातही उदय तानपाठक असतात, जे तुम्हाला सांगून मोकळे होतात कि माझ्या नादी लागलास तर भर चौकात तुला फटके मारून मोकळा होईल…

श्रीमान अरविंद भानुशाली तुमचे हे असे पत्रकारितेचा आव आणून त्यामागे खोट्या उद्योगाचे, भिक्कार कंत्राटदाराचे जाळे उभे केले आहे, ते टिकू द्या, असली भयावह दादागिरी बंद करा. मला हा वाद वाढवायचा नाही पण तुमचे वागणे मागचे पुढे सुरु राहिले तर मात्र मी स्वस्थ बसणे शक्य नाही. या लेखानिमित्ते माझे आवाहन आहे, अरविंद जेथे जेथे दुकानदारी करायला येतात, त्या सर्वांनी निर्भय व्हावे आणि अरविंद यांच्या कमाईच्या स्रोताला विरोध करावा, आमच्यातले अनेक निर्भय लढवय्ये पत्रकार नक्की तुमच्या पाठीशी आहेत, अरविंद हे कोणतेही जगमान्य लोकप्रतिनिधी नाहीत किंवा कोणत्याही प्रभावी वृत्तपत्राचे प्रतिनिधी नाहीत कि जेथून तुम्ही केलेला विरोध अंगलट येऊ शकतो…काळजी करू नका, अरविंद जेवढ्या मोठ्या, चढ्या आवाजात बोलतील दुप्पट मोठ्या आवाजात तुम्हीही उत्तर द्या, बघा मग ते कसे ढुंगणाला पाय लावून पळ काढतात ते…


ठाण्यातील आयकर खात्यातले देखील मला भानुशाली यांच्या विषयी काही मुद्द्यांवर माहिती देतांना मागे पुढे बघत होते. केवढी हि दहशत. मुंबईत मात्र तसे घडले नाही, त्यांना अरविंद भानुशाली हे नाव माहित नसल्याने ते बिनधास्त बोलत होते, काही माहिती तेथे आणि सहकार विभागातही माहिती घेणे मला आवश्यक वाटत होते, सहकार खात्यातील एक अधिकारी तर म्हणाले, साहेब, या माणसाच्या मनोवृत्तीचा मी अनेक वर्षांपासून अभ्यास करतोय, हे महाशय त्या त्या वेळी असलेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या आणि सहकार खात्याच्या मंत्र्यांशी मधुर संबंध ठेवून असतात त्यामुळे भानुशाली नको ते फायदे करवून घेतात किंवा अमुक एखाद्या तक्रारीतून सहीसलामत बाहेर पडतात. चंद्रकांत पाटील आणि सुभाष देशमुख यांनी कृपया आधीच्या वाक्याची नोंद घ्यावी…

विशेषतः मंत्रालयातील मंत्री राज्यमंत्री प्रशासकीय अधिकारी मंत्री आस्थापनेतील कर्मचारी, मंत्रालयीन अन्य अधिकारी या साऱ्यांनाच आवाहन बिनंती करतो कृपया आपण अतिशय निर्भय मनाने आमच्यातील वाईट गुंड दलाली करणाऱ्या प्रवृत्तीला अजिबात घाबरू नये, त्यांनी आणलेल्या मलाईच्या कामांना धुडकावून लावावे, आपण संघटित होऊन आमच्यातील नीच प्रवृत्तींविरोधात लढा देऊ, भलेही असा लढा देतांना एखाद्या दुसऱ्याचे नुकसान झाले तरी…

जाऊ द्या, हा विषय येथे तूर्त थांबवतो आणि भानुशाली यांना हात जोडून बिनंती करतो, तुम्ही माझे शत्रू नव्हेत, पण चांगले वागा. लढा पत्रकारांनी समाजाच्या भल्यासाठी द्यायचा असतो, स्वकल्याणासाठी नव्हे…शेवटी आणखी एक महत्वाचे सांगतो, अनेक खतरनाक विषय लिहून काढतांना मी कधीही अस्वस्थ झालो नाही पण जे काय अरविंद मला कळले, ते बघून यादिवसात मी अतिशय अस्वस्थ आहे. अमुक एखादा लहान वृत्तपत्राचा प्रतिनिधी कोणत्या टोकाला जाऊन नसले ते उद्योग करुन मोकळा होतो, न उलगडणारे हे कोडे आहे. आशा करतो, जे झाले ते झाले पण यापुढे तरी अरविंद भानुशाली वेगळे दिसतील, अपेक्षा करून तूर्त आजच्यापुरते हे लिखाण येथे संपवतो, पुढल्या भागात वेगळे काहीतरी, खळबळजनकही…


 पत्रकार हेमंत जोशी  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *