सहन होत नाही सांगताही येत नाही : पत्रकार हेमंत जोशी

सहन होत नाही सांगताही येत नाही : पत्रकार हेमंत जोशी 

आता तो नेता मंत्री जिवंत नाही, नरकात नक्कीच सडत असेल, त्याला नेता किंवा आमदार म्हणून फार जवळून बघता आले नाही पण मंत्री असतांना त्याचे चाळे सतत दिसायचे कानावर पडायचे, त्याचे कर्तुत असे कि ज्या स्त्रीवर त्याची नजर पडली ती त्याला हवी असे, मग तो त्याची हवस भागेपर्यंत तिच्यासाठी वाट्टेल ते करीत असे, शरद पवारांचे मात्र अगदी उलट आहे, शरद पवार यांची आजही ज्या व्यक्तीवर नजर पडते त्या व्यक्तीचे कोणतीही अपेक्षा न ठेवता पवार भले करून सोडतात, तन मन धनाने त्यासाठी धावून जातात. मोठे करतात. ज्यांचे भले केले असे आपल्या राज्यात तर न मोजता येणारे पण देशातही संख्येने कितीतरी. ज्यांना आधी कवडीची किंमत नसते पवारांनी डोक्यावर हात ठेवला कि समोरची व्यक्ती मग ती कितीही सामान्य असली तरी असामान्य वाटायला लागते किंवा असामान्य होते. पण ज्याला शरद पवार आधी मोठे करतात त्यालाच ते एक दिवस असे काही कोपऱ्यात भिरकावून देतात कि समोरचा तेव्हापासून अक्षरश: कोलमडून पडतो किंवा स्वतःला कसेबसे सावरतो म्हणजे भारती लव्हेकर यांना अतिशय उदार अंतकरणाने मोठ्या मनाने मराठा नसतांनाही जर विनायक मेटे यांचे आशीर्वाद लाभले नसते तर आज त्या आमदार होणे फार दूरचे, चार घरी केवळ हळदी कुंकवाला जाणे तेवढे त्यांच्या हाती उरले असते, कारण याच लव्हेकर बाईंना पवारांनी थेट राष्ट्रवादी कार्यालयात स्थान देऊन त्यांना अगदी हाकेच्या आणून बसविले नंतर एक दिवस नेहमीच्या स्वभानुसार दूर केले. अर्थात असे या राज्यात भारती लव्हेकर, गिरीश गांधी, दत्ता मेघे, अजय पाटील, संजय खोडके, गजानन देसाई, दिवंगत गोविंदराव आदिक आणि गुरुनाथ कुलकर्णी असे कितीतरी…


एकदा गप्पांच्या ओघात मी गुरुनाथ कुलकर्णींना म्हणालोही, आतातरी पवारांनी तुमची दखल घ्यायला हवी, तुम्हाला मंत्री करायला हवे, कुलकर्णी म्हणाले, त्यांच्या मनात यावेळी मला मंत्री करायचे होतेही पण राज्यपालांनी नियुक्त केलेल्या विधान परिषद सदस्यांना मंत्री करता येत नाही, त्यामुळे मला मंत्री होणे अशक्य आहे, असे शरदराव म्हणाल्याने, मला नाही वाटत माझे मंत्री होण्याचे स्वप्न पूर्ण होईल. पुढल्या आठच दिवसात राज्यपालांनीच नियुक्त केलेल्या फोउजिया खान यांना मंत्री म्हणून संधी देण्यात आली, पवारांनी त्यांच्या मराठवाड्यातल्या या मुस्लिम कार्यकर्तीला संधी दिली आणि कुलकर्णी यांची तब्बेत तदनंतर घसरत गेली…

सुदैवाने ज्यांना म्हणून काळाच्या ओघात शरदरावांनी आधी मोठे केले, आर्थिकदृष्ट्या किंवा राजकारणात उभे केले नंतर बाजूला केले त्या सर्वांशी माझे जेव्हा जेव्हा बोलणे होते, साऱ्यांचे म्हणणे सेम असते, पवारांनी पुन्हा एकदा आम्हाला जवळ घ्यावे, पूर्वीचे प्रेम द्यावे. पण पवारांचेही त्या कुमार केतकरांसारखेच असावे म्हणजे कुमार ज्या वाहिनी किंवा वृत्तपत्रातून बाहेर पडले त्यांनी पुन्हा कधी तेथे नोकरी करण्यासाठी पाऊल ठेवले नाही, पवारांनी व्यक्तीश: त्या सर्वांना बोलावून मोठ्या मायेने जवळ घ्यावे, ते सारे पवारांचे ऋण मानतात आजही त्या सुशीलकुमार शिंदे यांच्यासारखे, पवारांचा नेताम्हणून विरह, पवारांच्या सहावासातल्या कडू गोड आठवणी त्या सर्वांना अस्वस्थ करून सोडतात, पवारांनीच त्या साऱ्यांना समज गैरसमजुतीतून दूर केले आहे, स्वतः पवारांपासून दूर गेलेले तसे फार कमी आहेत…

मी राजकारणात अनेकदा अतिशय जवळून बघितले आहे कि आभाळाला टेकलेले जे नेते, त्यांना आधीच्या आयुष्यात ज्यांनी अगदी जवळ राहून साथ दिलेली असते त्या साथीदारांना जेव्हा केव्हा आभाळाला टेकल्यानंतर काही नेते दूर करतात, त्यांना भेटणे किंवा त्यांच्याशी बोलणे बंद करतात, संबंध तोडतात, त्या दूर केलेल्यांचे हाल प्रियकराने सोडून दिलेल्या प्रेयसीसारखे होतात, त्यांच्यातल्या अनेकांना आत्महत्याही करावीशी वाटते. पवारांनी सोडून दिलेले दूर केलेले नेते किंवा त्यांचे कार्यकर्ते यांचे तन आणि मन खरोखरी पुढली अनेक वर्षे नैराश्येने ग्रासलेले असते, हीच वस्तुस्थिती आहे…


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *