कसे हे मुख्यमंत्री : पत्रकार हेमंत जोशी

कसे हे मुख्यमंत्री : पत्रकार हेमंत जोशी 

संकटांची सतत मालिका आजतागायत सोसूनही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून कायम कसे, विरोधकांना अस्वस्थ करून सोडणारे हे कोडे पण उत्तर अगदी साधे आहे, गुणांचाच सर्व ठिकाणी आदर होतो तसेच त्यांचे समाजाकडे, काम घेऊन येणाऱ्यांकडे किंवा भेटायला येणाऱ्या प्रत्येकाकडे सकारात्मक नजरेने बघणे, त्यांचे मुख्यमंत्रीपद अबाधित ठेवते. अंगात उत्साह संचारण्यासाठी, पॉझेटिव्ह एनर्जी निर्माण होण्या काही सिगारेट ओढतात, काही दारू पितात, काही गाणी ऐकतात, काही मसाज करवून घेतात, काही जागच्या जागी उंचच उंच उड्या मारतात, काही तंबाखू चोळतात, काही किंवा बहुतेक पुरुष शेजारच्यांच्या बायकोशी गप्पा मारतात, पण मी येथे सांगतोय ते सहज शक्य असेल तर हे करून पहा, पाच दहा मिनिटे त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सान्निध्यात काढा, तुमच्यात नक्की उत्साह संचारतो, पॉझेटिव्ह एनर्जी येते तुम्ही अक्षरश: दुडू दुडू पाळायला लागता, उत्साहात आनंदात पुढल्या कामाला लागता. ज्यांना हा अनुभव आलेला आहे तो त्यांनी नक्की येथे शेअर करावा…


अत्यंत महत्वाचे म्हणजे फडणवीस सकाळी तयार झाल्यानंतर प्रथम भेटायला येणार्याशी ज्या उत्साहाने बोलायला सुरुवात करतात तोच त्यांचा उत्साह रात्री फार उशिरा भेटायला आलेल्या माणसाशी बोलतानाही कायम असतो. विशेष म्हणजे जे खोटे बोलतात त्यांना आठवून आठवून सांभाळून प्रत्येकाशी बोलावे लागते, येथे फडणवीसांच्या बाबतीत असे अजिबात नाही कारण खोटे काहीही सांगायचे नसल्याने नेमके आठवून काहीही त्यांना सांगायचे नसते विशेष म्हणजे त्यांना पत्नीशी बोलतांना देखील सावध व्हायचे नसते कारण अमृता शिवाय दुसरे नाव तोंडातून निघणे शक्य नाही, इतर कोणत्याही वयाच्या स्त्रीकडे वेडेवाकडे बघणे वागणे अजिबात नसते, चारित्र्यवान माणूस, भानगडी करणे नाही. पत्नी असेल किंवा आई असे सत्तेतले अगदी बोटावर मोजण्याएवढे असतात जे त्यांच्या समोर ताठ मानेने बोलू शकतात, नजरेला नजर देऊन त्यांचे घरातल्या सदस्यांशी बोलणे असते, कुटुंबासमोर मान खाली जाईल असे त्यांचे वागणे नाही…


www.vikrantjoshi.com


सत्यनारायणाचा प्रसाद बघा अतिशय स्वादिष्ट चविष्ट लागतो कारण तो तयार करतांना अनेक विविध दर्जेदार पदार्थांचे योग्य प्रमाणात मिश्रण असते म्हणजे त्यात शुद्ध तूप असते, प्रसाद तयार करणार्याने तेथे आपले मन ओतलेले असते, रवा असतो, दूध असते, खवा असतो, साखर असते, काजू बदाम चारोळ्या इत्यादी ड्रायफ्रुटस असतात, केशर घातलेले असते, प्रसाद भाजणाऱ्याने त्यात आपला दीर्घ अनुभव देखील ओतलेला असतो, प्रसाद भाजणाऱ्याची परमेश्वरी श्रद्धा असते, त्यात सारे काही चांगले असते आणि चांगल्याचे योग्य मिश्रण होऊन उत्तम प्रसाद तयार करण्यात येतो. १९८० ते आजतागायत सारेच मुख्यमंत्री मी अतिशय जवळून बघितले, अनुभवले, मला वाटते त्या प्रत्येकात जे जे उत्तमोत्तम गूण होते ते सारे फडणवीसांमध्ये तंतोतंत खरोखरी ठासून भरलेले आहेत म्हणून देवेंद्र फडणवीसांचे सत्यनारायणाच्या महाप्रसादासारखे सारे काही मस्त जमून आले आहे कदाचित सतत अभ्यासात आयुष्य खर्ची घालणारे देवेंद्र त्यांनी आधी या सर्व माजी मुख्यमंत्र्यांच्या वैशिष्ट्यांचा शांतपणे अभ्यास केला असावा त्या साऱ्यांचे चांगलेपण नेमके समजून घेतले असावे तदनंतर मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली असावी, भट्टी छान जमून आलेली आहे…


शरद पवारांनीही तोंडाचा आ वासून बघता बघता थकून थक्क व्हावे एवढे फडणवीस म्हणजे पवारांच्या तोडीस तोड मेहनती व कष्टाळू. त्यांनाही आराम करणे, ताणून देणे, झोपा काढणे, लोकांना न भेटता आडवे होणे माहित नाही हेही त्यांच्या थेट पावलावर पाऊल. शरद पवारांनंतर जगाच्या प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास असलेले मला वाटते हे एकमेव मुख्यमंत्री म्हणूनच दोघेही पंतप्रधान होण्या योग्यतेचे, बघूया दोघांपैकी कोणाचा आधी नंबर लागतो ते. असे आधी वाटायचे, जेव्हाकेव्हा काँग्रेस पुन्हा एकवार सत्तेत येईल कधीतरी तेव्हा पंतप्रधान म्हणून आपल्या महाराष्ट्रातून पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाचा नक्की विचार त्यांचे श्रेष्ठ करतील पण आता तसे वाटत नाही कारण त्यांच्या श्रेष्ठींनी त्यांना अलीकडे अगदी जाणून बुजून अलिप्त ठेवले आहे, दूर ठेवले आहे, असे काय गैरसमज झाले, कळलेले नाही पण एक मात्र नक्की पृथ्वीराज यांचे वर दिल्लीत पूर्वीसारखे संबंध उरलेले नाहीत, काहीतरी खूप बिनसले आहे. देवेंद्र फडणवीस यांचे एक बरे आहे ते देशातल्या भाजपामधल्या साऱ्याच गोटांना गटातटांना आपले वाटतात, जवळचे आहेत असे सर्वांना वाटत राहते….

क्रमश:


 पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *