नागपुरातली मोठी माणसे : पत्रकार हेमंत जोशी

नागपुरातली मोठी माणसे : पत्रकार  हेमंत जोशी 

शून्यातून विश्व् निर्माण करणारे कायम माझ्या आकर्षणाचे कौतुकाचे विषय ठरले आहे. अलीकडे चंद्रपूरातले माझे जिवलग उद्योगपती मित्र कुंदन ढोरे यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमीत्ते त्यांनी नागपुरात आयोजित केलेल्या कौतुक सोहळ्यास मुद्दाम हजेरी लावली, छोट्या मोठ्या कामांपासून त्यांनी केलेली आयुष्याची सुरुवात आणि आज बौद्ध समाजतल्या कुंदन यांनी मिळविलेले यश, विदर्भात तसे सोपे काम नाही कारण जातीपातीच्या निकषांवर तिथे एखाद्याला जवळ घेणे किंवा दूर ढकलणे सुरु असते पण कुंदन ढोरे यांनी त्यावर मात केली आणि उत्तम कंत्राटदार म्हणून आज स्वतःची मोठी ओळख निर्माण केली, त्यांच्या या खडतर प्रवासावर करावे तेवढे कौतुक कमी ठरावे. कुंदन यांच्यासारखे अत्यंत दिलदार मनमिळावू मित्र मला लाभलेत हे माझे भाग्य समजतो. नागपुरात गेलो आणि हॉटेल व्यावसायिक जिवलग मित्र उत्तम स्नेही हेमंत नानिवडेकर यांच्याकडे गेलो नाही असे होत नाही. सख्खा भाऊ घरी आल्याचा आनंद व्हावा त्यापद्धतीने मिसेस सुहासिनी नानिवडेकर ज्या वर्हाडी पद्धतीने स्वागत करतात ते सारे प्रसंग न विसरता येणारे. पैसे आणि मोठे मन ज्या घरी असते त्या घरात वावरतांना स्वर्गात आल्यासारखे वाटते…

हेमंत नानिवडेकर यांचे नागपुरात काही बँक्वेट हॉल आहेत त्यापैकी एक हॉल ते ज्या धंतोली परिसरात राहतात तेथे आहे. हेमंत यांनी सांगितलेला किस्सा असा कि त्यांच्या या इमारतीसमोर एक समोसे तयार करून विकणारा माणूस होता, दिवसभर त्याच्या हातगाडीवर प्रचंड गर्दी होत असे, येणारे ग्राहक त्यांची वाहने नानिवडकरांच्या इमारतीसमोर पार्क करून समोर त्याच्याकडे सामोसे खायला जायचे त्यामुळे नानिवडेकरांना दररोज दिवसभर प्रचंड मानसिक त्रास होत असे त्यातून त्यांनी अनेकदा त्या सामोसे विक्रेत्याला सांगितले कि एखादा माणूस ठेव म्हणजे तो साऱ्यांच्या वाहनांना व्यवस्थित पार्क करायला सांगेल पण वारंवार सांगूनही त्याने जेव्हा ऐकले नाही तेव्हा स्वतः हॉटेल व्यावसायिक असलेल्या हेमंत यांनी एक शक्कल लढविली त्यांनीही मग दोन माणसे लावून स्वतः समोसे विक्रीचा व्यवसाय सुरु केला विशेष म्हणजे तो वीस रुपये प्लेट विकत असे तर नानिवडेकर चक्क दहा रुपये प्लेट समोसे विकायला लागले, कोट्याधीश नानिवडेकर यांना त्यातून काहीही फरक पडला नाही पण त्या समोसे विक्रेत्याचा धंदा जेव्हा बंद पडायला लागला त्याने तेथून कायम स्वरूपी धंदा बंद केला, शिफ्ट केला, आयुष्यात याच पद्धतीने जगायचे असते म्हणजे हमखास यश मिळते, इतरांवर जाळून उपयोग नसतो, आपली रेषा मोठी करायची असते इतरांची रेषा पुसण्यापेक्षा, मी देखील आयुष्यात याच पद्धतीने जगत  आलो आहे. माझा नातलग मोठा म्हणून त्याचे वाईट चिंतण्यापेक्षा मलाही तसे मोठे होणे शक्य आहे का त्यावर माझे प्रयत्न असतात, उगाच नातलगांचे मित्रांचे समव्यावसायिकांचे वाभाडे काढून त्यांना अस्वस्थ करून सोडण्यापेक्षा आपण मोठे होण्याचे प्रयत्न करावेत…

मित्रवर्य कुंदन ढोरे यांच्याकडील कार्यक्रम आटोपल्यानंतर नागपुरातल्याच बाळासाहेब उर्फ अरविंद देशमुख या बुजुर्ग व्यावसायिक मित्राच्या दिल्ली पद्धतीच्या भव्य कोठीवर डिनर साठी गेलो, तेथे डिनर यासाठी घेतले कि बरेच वर्षानंतर माजी मंत्री दिलदार नेते दत्ता मेघे यांना त्यांनी मुद्दाम आंमत्रित केले होते. मी, दत्ताभाऊ, स्वतः अरविंदजी, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब कुलकर्णी आणि आणखी एक नेते बाबुराव तिडके आमची त्या रात्री फक्कड मैफिल जमली, गप्पा झाल्या, जुन्या अनेक आठवणी निघाल्या, मन भरून आले वरून अरविंदजींनी खाऊ पिऊ घालून तृप्त केले. दत्ता मेघे यांच्यासारखे मंत्री सुरुवातीला माझ्या पाठीशी उभे होते म्हणून अगदी सहज यश मिळाले. ज्यांना मी कायम नागपुरातले गांधी म्हणतो त्या गिरीश गांधी यांच्याशी भेट झाली. एखाद्याने पीएचडी करावी असे हे समाजसेवी श्री गिरीश गांधी, सतत फक्त आणि फक्त भेटायला येणाऱ्या प्रत्येकाचे भले करण्यासाठी धडपडणारे, मला तर असे वाटते कि जर हे मारवाडी गृहस्थ आम्हा नागपुरातल्या मराठी माणसांच्या पाठीशी मोठ्या मनाने उभे राहिले नसते तर नागपुरातली सांस्कृतिक चळवळ केव्हाच लोप पावली असती, जेथे कमी तेथे आम्ही असे जगणारे गिरीश गांधी, आमचे ते मित्र आहेत त्याचा सार्थ अभिमान वाटतो…

तूर्त एवढेक्सह : हेमंत जोशी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *