विषय वेगवेगळे ३ : पत्रकार हेमंत जोशी

विषय वेगवेगळे ३ : : पत्रकार हेमंत जोशी 

मीडिया मग त्या विविध वाहिन्या असोत अथवा वृत्तपत्रे, मनात अढी, द्वेष, राग, मत्सर, बदला घेण्याची भावना मनात ठेवून तुम्ही वृत्तपत्रे किंवा वाहिन्या चालवीत असाल तर असा आक्रस्ताळेपणा फार काळ खपवून घेतल्या जात नाही, आपण तेवढे चांगले आणि अख्खे जग वाईट, अशी भूमिका सार्वजनिक जीवनात वावरतांना घेऊन चालत नाही, प्रत्येकाकडे कावीळ झाल्यागत बघणे योग्य नसते. सार्वजनिक जीवनात काम करतांना माणसे चुकतात, केलेल्या चुका अति गंभीर असतील तर त्या चव्हाट्यावर आणणे आमचे ते कामच आहे पण उठसुठ एखाद्या रिंग मास्टरच्या भूमिकेत पत्रकारांनी किंवा मीडिया मध्ये काम करणाऱ्यांनी वागू नये, डोळ्यासमोर मिशन नक्की असावे पण एखाद्याकडून कमिशन घेण्यासारखे दुसऱ्यावर आगपाखड करणे नक्कीच चुकीचे आहे, मग अशा व्यक्तीचा निखिल वागळे होतो, जे मी दोन महिन्यांपूर्वी लिहिले होते तेच खरे ठरले म्हणजे मीडिया क्षेत्रात वागळे यांचा उतरता क्रम ज्या पद्धतीने सुरु झाला, एक दिवस त्यांना आहे ती वाहिनीही सोडावी लागेल, मी लिहिले होते नेमके तेच घडले, मला वाटते निखिल वागळे यांनी जेथून सुरुवात केली होती, तेथूनच ते पुन्हा एकदा आपल्या पत्रकारितेची वाटचाल सुरु करतील किंवा त्यांनी ती तशी सुरुवात करावी म्हणजे त्यांना पुन्हा एकदा चंदेरी किंवा षटकार सारखे पाक्षिक सुरु करावे अर्थात त्यांना हि पाक्षिके सुरु करावी लागतात कि काय अशी त्यांची आजची मीडिया क्षेत्रात अवस्था झाली आहे, अर्थात वागळे यांना आम्ही सल्ला देणे म्हणजे चिखलातून बाहेर आलेल्या म्हशीच्या पाठीवर बसण्यासारखे, आम्हीच धाडकन खाली पडून ढुंगणावर आपटू. निखिल यांनी चुका केल्या म्हणून त्यांच्यावर हि नौबत आली, मी म्हणणार नाही, ते त्यांच्या क्षेत्राशी नक्कीच प्रामाणिक आहेत पण त्यांना त्यांची एकांगी भूमिका आणि आक्रस्ताळा स्वभाव नाडला, भोवला असे म्हणणे नक्कीच चूक ठरणार नाही. आजतरी चित्र असे आहे निखिल यांच्या पत्रकारितेचा साप शिडीचा खेळ झाला आहे म्हणजे त्या खेळात एखादा कसा थेट ९९ पर्यंत पटापट पोहोचतो पण नेमका ९९ वर येतो तो सापाच्या तोंडावर मग खेळाडू थेट खाली उतरतो पुन्हा वर चढण्यासाठी पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते, पाठीमागून येणारा प्रतिस्पर्धी जिंकून मोकळा होतो…


येथे निखिल वागळे आठवले ते झी मीडिया चे दिल्लीतील प्रतिनिधी पत्रकार रामराजे शिंदे यांच्यामुळे. अलीकडे रामराजे यांनी ‘ दिल्ली तखत ‘ या मथळ्या खाली एक लेख लिहिला होता, ज्यामुळे सेनेच्या गोटात बरीच खळबळ माजली, येथेही तेच घडले शिंदे यांनी भाजपाची तळी उचलतांना शिवसेनेवर विनाकारण तीही जहरी टीका केली, जे योग्य नव्हते म्हणजे एकीकडे तुम्ही भाजपाला मोठ्या उंचीवर नेऊन ठेवत असतांना सेनेची त्याच लेखात आई बहीण घेता, ते योग्य नाही, एकवेळ आपण सेनेवर केलेली टीका देखील दुर्लक्षित करू पण चुकीची माहिती पेरून सेना भाजपा मध्ये रामराजे यांनी ज्या पद्धतीने आगीत तेल ओतण्याचे काम केले ते त्यांच्याकडून अपेक्षित नाही म्हणून हा वाक्यप्रपंच. पुन्हा तीच भीती, रामराजे यांनीही वागळे यांच्या पावलावर पाऊल ठेवू नये, एक दिवस मग हाताशी काहीच उरले नाही तर शिंदे यांना देखील गावाकडे निघून जावे लागेल, शिंदे यांच्यासारख्या चुणचुणीत, निर्भय, कष्टाळू पत्रकारावर हि वेळ येता कामा नये…

संदर्भ असा रामनाथ कोविंद यांच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीनिमित्ते दस्तुरखुद्द भाजपा प्रदेशाध्यक्ष अमित शाह जातीने मातोश्रीवर गेले, तेथे त्यांचे उद्धव आणि कुटुंबीयांनी मनापासून स्वागत केले, खेळीमेळीच्या वातावरणात ठाकरेंनी लगेच जाहीर करून टाकले कि आम्ही कोविंद यांच्या पाठीशी उभे आहोत. हे असे सुरळीत घडले तिकडे वर्ष बंगल्यावर मुख्यमंत्र्यांनी सुटकेचा निश्वास सोडला, कारण त्यांना या ताणाताणीचा सर्वाधिक सतत त्रास होत आला आहे, त्यामुळे वरच्या पातळीवर वातावरण निवळले म्हणून फडणवीस जाम खुश होते, त्यांनी त्या दिवशी ख़ुशी ख़ुशी त्यांच्या आवडीची ब्लॅक कॉफी एक कप जादा घेतली, हो ते कॉफी पर्यंतच, त्यांचा कधीही तळीराम झाला नाही आणि होणारही नाही. पण हा आनंद काही क्षण टिकला कारण लगेच रामराजे शिंदे लिहून मोकळे झाले कि अमित शहा असे म्हणालेत कि शिवसेना त्यांचा नंबर एक चा शत्रू आहे आणि यापुढे सेना संपविणे त्यांचे लक्ष्य आहे. इकडे रामराजेंचा लेख प्रसिद्ध झाला आणि उद्धव यांनी पुन्हा उभे राज्य डोक्यावर घेतले, त्यांनी थेट अमित शहा आणि मुख्यमंत्र्यांना फोन करून हा काय दगाबाजीचा प्रकार आहे, विचारले. जे घडलेच नव्हते, ते ऐकुन शहा आणि फडणवीस दोघेही अचंबित भयभीत आश्चर्यचकित झाले, त्या दोघांनीही अतिशय शांतपणे उद्धव यांचे सांगणे ऐकून घेतले नंतर लगेच त्यांनी सपुरावा सिद्ध केले कि असे कोणतेही वक्तव्य अमित शाह यांनी केले नाही, उद्धव त्यावर शांत झाले आणि राष्ट्रपतीपदाची अति महत्वाची हि निवडणूक मग शांतपणे आणि बिनबोभाट पार पडली..असे घडता कामा नये, रामराजे त्या लेखात नेमके काय लिहून मोकळे झाले ते पाक्षिक ऑफ द रेकॉर्ड च्या जुलै उत्तरार्ध अंकात वाचायला विसरू नका.

जाता जाता : 

प्रेमाने बघाल तर कचरा पण 

सुंदर दिसेल…

…..

…..

……

…..

…..

फक्त नजर डुकराची पाहिजे…!! 

तूर्त एवढेच :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *