वृत्तपत्रे वाहिन्या आणि वाह्यातपणा : भाग २: पत्रकार हेमंत जोशी


वृत्तपत्रे वाहिन्या आणि वाह्यातपणा : भाग २: पत्रकार हेमंत जोशी 

यवतमाळ पासून धंदेवाईक पत्रकारितेला सुरुवात झाली आणि आपल्या या राज्यात मराठी अमराठी असा भेदभाव न राहता अगदी उघड सऱ्हास वृत्तपत्रे विविध मीडिया आणि वाहिन्यांच्या आडून तद्दन व्यावसायिक पत्रकारितेला सुरुवात झाली. तरुण भारत संचार किंवा वागळे यांची मालकी असतांना महानगर यासारखी काही वृत्तपत्रे वाहिनी किंवा इतर मीडिया आजही अगदीच टीचभर प्रमाणात नाही म्हणायला या क्षेत्राकडे सामाजिक दृष्टिकोन किंवा खऱ्या अर्थाने लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून नक्की बघतात पण हे प्रमाण अत्यल्प आहे त्यासाठी भाऊ तोरसेकर यांच्यासारखे पत्रकारितेतले मीडियातले संत म्हणूनच जन्माला यावे लागते पण तसे अलीकडे फारसे घडत नाही किंबहुना स्वतःचा स्वतःच्या विविध व्यवसायाचा काळ्या  धंद्यांचा दबाव विविध स्तरांवर निर्माण करण्यासाठीच शेटजी या हलकट व नीच वृत्तीचे मराठी अमराठी मीडिया क्षेत्रात उतरल्याचे या राज्यात जिकडे तिकडे बघायला मिळते. तरुण भारत किंवा सामना सारखी वृत्तपत्रे आपल्या तत्वांशी यासाठी चटकून चिपकून राहिली आहेत कारण त्यांच्या पाठीशी शिवसेना किंवा भाजपा ठामपणे उभे आहेत किंबहुना आम्ही शिवसेनेचे किंवा आम्ही भाजपचे मुखपत्र आहोत असे त्यांनी आजतागायत कधी लपविले देखील नाही. नारायण राणे यांना मात्र त्यांच्या प्रहार दैनिकाचा तरुण भारत किंवा सामना सारखा प्रभावी उपयोग का करवून घेता आला नाही त्यावर पुढे मी नक्की लिहिणार आहे पण राणे यांचे या दैनिक नक्की मोठे आर्थिक नुकसान झाले आहे… 

शिवसेनेच्या सामना दैनिकाला जसे घवघवीत यश मिळाले दुर्दैवाने अत्यंत जहाल प्रखर व सत्य हिंदुत्व मांडूनही तरुण भारत ची अवस्था वारंवार घटस्फोट घेणाऱ्या होणाऱ्या दुर्दैवी तरुणीसारखी होत आली आहे म्हणजे थेट प्रमोद महाजन यांच्यापासून तर विश्वास पाठक किंवा नितीन गडकरी यांच्यासारख्या प्रभावी आणि आर्थिक गणिते जुळवून आणण्याची ताकद असणाऱ्या विविध मंडळींच्या हातात त्या त्या वेळी तरुण भारत सुपूर्द करण्यात आला पण यापैकी कोणालाही तरुण भारताला लोकमत दैनिक जन्माला येण्याआधी जे यश मिळायचे ते लोकमत च्या जन्मानंतर कधीच मिळाले नाही आणि पुढे पुढे तर आपल्या या  राज्यात कितीतरी वृत्तपत्रे प्रभावीरीत्या स्पर्धेत उतरल्याने तरुण भारत दैनिकांची वैचारिक दृष्ट्या हिंदूंना प्रचंड गरज अस्तानही या वृत्तपत्राला उठाव मिळाला नाही, तरुण भारत दैनिकाची नागपूर सारखे एखादे शहर वगळता अवस्था मुख्य नर्तिकेच्या मागे नाचणाऱ्या कोरस मधल्या एक्स्ट्रा नटासारखी कायम होत आली. व्यवसायासाठी वृत्तपत्रे किंवा बातम्या देणाऱ्या वाहिन्या हा एकमेव दृष्टिकोन समोर ठेऊनच अलीकडे दबाव निर्माण करणारे हे क्षेत्र तद्दन धंदेवाईक मंडळींच्या हाती स्थिरावले आहे, टिळक आगरकरांची प्रखर देशभक्तीची पत्रकारिता आपल्या या राज्यात अभावानेच आढळते. तुम्हाला पुढले वाचून  खूप आश्चर्य वाटेल, पुढले वाचल्यानंतर मला नक्की माहित आहे कि तुम्ही ते वाचून आश्चर्याने एकाचवेळी पाचही बोटे तोंडात घालून सभोवताली गिरक्या घेऊन नाचणार आहात, स्वतःच स्वतःला वाकुल्या दाखवून मोकळे होणार आहात. आजकाल वृत्तपत्रे वाचण्याची आवश्यकता किंवा गरज उरली आहे का त्यावर मला येथे तुम्हाला नेमके उदाहरण देऊन सांगायचे आहे… 

अचंबित करणारे माझे वाक्य असे कि अगदी आत्ता आत्ता पर्यंत म्हणजे मागल्या वर्षीपर्यंत मुंबईत माझ्या घरी मुंबईतून प्रसिद्ध होणारी लोकमत लोकसत्ता सकाळ पुढारी महाराष्ट्र टाइम्स किंवा टाइम्स ऑफ इंडिया सारखी मराठी इंग्रजी दैनिके साप्ताहिके थोडक्यात जवळपास 10-12 वृत्तपत्रे विकत घेऊन वाचून त्यातली महत्वाची कात्रणे कापून आणि चिटकवून ठेवत असे म्हणजे तुम्ही जर माझ्या माहीमच्या कार्यालयात अगदी अचानक जरी आलात तरी एक अख्खी खोली या कात्रणांनी तुम्हाला भरलेली दिसेल.नंतर मी वृत्तपत्रे विकत घेण्याचे प्रमाण कमी केले, केवळ महत्वाची  चार पाच वृत्तपत्रे घेऊन वाचायला  लागलो आणि लक्षात असे आले कि प्रमाण कमी केले तरी  पत्रकार असूनही फारसे काही अडले नाही,आता अलीकडले अति आश्चर्य म्हणजे लॉक डाऊन सुरु झाल्यापासून या तीन महिन्यात मी एकही वृत्तपत्र वाचले नाही कारण ती बंद होती मिळायची नाहीत आणि ऑन लाईन जाऊन वाचण्याची कधी गरजच पडली नाही कारण आवश्यक त्या बातम्या फेसबुक चाळले तरी वाचण्यात येतात, काम भागते. अगदी तशी गरज भासली तर बातम्या देणाऱ्या वाहिन्या असतातच तीच ती बकबक करतांना. आपल्या देशाचा देखील आता पुढल्या काही वर्षात अमेरिका किंवा तत्सम देश होणार का कि जेथे वृत्तपत्रे वाचल्या जात नाहीत आणि विकत

तर अजिबात घेतल्या जात नाहीत. माझ्यासारख्या चोवीस तास पत्रकारितेत असणाऱ्याला जर वृत्तपत्रे वाचली नाहीत तर फारसे काही अडले अडत नाही तर सर्व सामान्यांना तेथे कितीसा फरक पडेल आणि हे असे नक्की घडते आहे घडणार आहे कारण वृत्तपत्रांची विश्वासहर्ता संपत चालली आहे…

क्रमश: हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *