उद्धव चुकलेच : पत्रकार हेमंत जोशी

उद्धव चुकलेच : पत्रकार हेमंत जोशी 

वाईट वाटते जेव्हा तुमची गत आयुष्यातली प्रेयसी तिच्या नवऱ्याला खेटून चिटकून चिपकून  बसलेली असते आणि तुम्ही मात्र एकटेच समोरच्या सोफावर तिच्या आठवणीत व्हिस्कीचा  सिप मारत बसलेले असतात. वाईट वाटते एखाद्या तरुणीला देखील जेव्हा ती तुमच्या  आठवणीत एकाकी जीवन जगत असते आणि तुम्ही मात्र बायकोचा हात हातात घट्ट पकडून  मधेच तिला लाडाने जवळ घेत, त्या प्रेयसीकडे  पाहून न पाहिल्यासारखे करता. आयुष्यातले  चुकीचे निर्णय तुमचे आमचे आयुष्य निरर्थक करून सोडतात. राजकारणातला प्रदीर्घ अनुभव  मला सांगतो आहे कि राजकीय दृष्ट्या एक नेतृत्व म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे  किमान हि पंचवार्षिक योजना तरी मागे आले आहेत, त्यांचे मोठे नुकसान होते आहे. जेव्हा  एखाद्याला माहित असते कि बिळात हात घातल्यानंतर नक्की विंचू चावणार आहे तरीही तो  ते तसे करत असेल तर सांगणारा सल्ला देणारा प्रेम करणारा मूर्ख ठरतो… 

हा अंक हाती पडेपर्यंत कदाचित शिवसेनेचा एखादा नेता मुख्यमंत्री म्हणून विराजमान झालेला  असेल तरीही उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मोठे नुकसान करवून घेतले आहे हे येथे ठामपणे  सांगावेसे वाटते. शिवसेना हि उद्धव यांच्या अलीकडच्या धोरणामुळे नक्की नुकसान करवून  घेते आहे. उद्धव यांच्या आघाडीला बिलगण्याच्या मिठीत घेण्याच्या भूमिकेवर केवळ भाजपा आणि संघवाले नाराज झाले असते तर एकवेळ आपण त्याकडे दुर्लक्ष केले असते पण ज्यांना मराठी म्हणून हिंदू म्हणून अभिमान आहे असे या राज्यातले सारे मग ते कोणत्याही विचारांचे असतील उद्धव यांच्यावर त्यांच्या भूमिकेवर अतिशय नाराज आहेत त्यात मग शिवसैनिकही आले. उद्धव यांचे हे तर असे वागणे झाले कि घरच्या बायकोला ठेंगा दाखवायचा आणि माहिजीच्या बाईला ती नाचत असतांनाच तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालायचे. कदाचित फडणवीस किंवा भाजपा नेते चुकले असतील पण त्याची शिक्षा थेट शत्रूंना घरी राहायला जागा देणे, या टोकाला द्यायची नसते… 

शिवसेना आणि भाजपाने त्यांना इतिहास माहित असतांनाही १९९९ ची पुनरावृती केली, त्यांनी थेट पुन्हा एकवार पवारांना रान मोकळे करून दिलेले आहे त्यामुळे मला फारसे आश्चर्य वाटणार नाही जर पुढे १०-१२ वर्षे शरद पवार यांची सत्ता येथे बघायला मिळाली. देवेंद्र फडणवीस किंवा भाजपा फार भाग्यवान असेल तरच युतीच्या बाबतीत यापुढे राज्यात काही चांगले त्यांच्या बाबतीत घडू शकते अन्यथा उद्धव ठाकरे यांनी आघाडीला आपणहून उघडून दिलेले दरवाजे विशेषतः सेनेलाही आणि अर्थात भाजपाला बऱ्यापैकी महागात पडणारे हे घडते आहे. घडलेले आहे. शरद पवारांच्या बारीक सारीक हालचालींवर लक्ष ठेवावे घालावे लागते तेव्हा ते नेमके काय करताहेत आपल्या ध्यानात येते. मुख्यमंत्री निवडीच्या धामधुमीतही जेव्हा शरद पवार उठले नि थेट नागपूरला दौऱ्यावर आले हे दिसते तेवढे साधे राजकीय गणित नाही तर ज्या विदर्भाने  पवारांना मधल्या काळात साथ दिलेली नाही त्या विदर्भावर पुन्हा पकड मिळविण्यासाठी पवार नागपुरात दाखल झाले आहेत हे लक्षात घ्यावे, मोठी चूक उद्धव ठाकरे आणि भाजपाच्या हातून घडलेली आहे, शरद पवार केव्हा या साऱ्यांना उल्लू बनवून मोकळे झाले हे यांच्या म्हणजे युतीच्या लक्षातही आले नाही, विशेष म्हणजे आम्ही काहीतरी चूक करतोय हे आजही अद्यापही उद्धव ठाकरे मानायलाच तयार नाहीत, मतदार, मराठी माणूस शंभर टक्के ठाकरेंवर यावेळी मनातून चिडला आहे, प्रचंड नाराज आहे… 

तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *