पापांचा विळखा : पत्रकार हेमंत जोशी

पापांचा विळखा : पत्रकार हेमंत जोशी 

अगदी अलीकडे वरळीवरून कुठल्याशा सावंत आजींचा फोन होता. कितीतरी बोलत होत्या. मनापासून मनातले सांगत होत्या. वाचनाची आवड असल्याने कोणीतरी ओळखीच्यांनी त्यांना ऑफ द रेकॉर्ड चा कुठलासा अंक आणून दिला होता, अंक वाचून झाल्यानंतर त्यातला भ्रमणध्वनी शोधून मला थेट फोन केला, म्हणाल्या, मी ७८ वर्षांची आहे, लिखाणाच्या एकंदर ढाच्यावरून तुम्ही माझ्या नातवाचे वयाचे असावेत.( इश्य ! अशी वाक्ये ना मला खूप सुखावून जातात, मग दिवसभर मी आनंदाच्या भरात स्वतःभोवती गोल गोल गिरक्या घेत सुटतो) तुमचे लिखाण अतिशय आवडले, कधी नव्हे ते हे वर्तमानपत्र तीन वेळा वाचून काढले. असेच लिहीत राहा, असेच मंत्रमुग्ध करा, तुमचे काहीही होणार नाही, माझे स्वामी समर्थ तुमच्या सदैव पाठीशी आहेत, असतील. अर्थात हि अशी कौतुकाची थाप आजतागायत किमान लाखभर वेळा कधी प्रत्यक्ष तर कधी लिहून पाठवून, कधी फोनवरून पडली आहे. मी परवा कुठल्याशा वाहिनीवर अमीर खान आणि विराट कोहलीची एकत्र मुलाखत बघत होतो, त्यात अमीर म्हणाला, कुठलाही पुरस्कार मी स्वकारात नाही कारण ते कसे मिळतात आणि मिळविल्या जातात, मला ठाऊक आहे, एक मात्र खरे आहे, दर्शकांची माझ्या सिनेमाला मिळणारी दाद हाच पुरस्कार मला सर्वाधिक महत्वाचा वाटतो. मी अमीर खान नाही पण वाचकांचे हे असे जगभरातून मिळणारे प्रेम मला पुरस्कारांसारखेच असते, म्हणून इतरांसारखे अनेकदा मॅनेज केलेले पुरस्कार मला मिळत नाहीत किंवा मिळाले नाहीत, याचे कधीही दुःख नसते, वाईट वाटत नाही किंवा पत्रकारांच्या कुठल्याही घाणेरड्या राजकारणात मी सहभागी होत नाही कारण सारेच पत्रकार मला माझ्या कुटुंबासारखे आहेत, बहुसंख्य पत्रकार उत्स्फूर्त जेव्हा मुंबईत अलीकडे पार पडलेल्या मुलाच्या विवाह स्वागत समारंभाला वेळात वेळ काढून सहभागी झाले, तो क्षण मला अतिशय आनंदाचा होता. नावे ठेवणे आम्हा पत्रकारांचे कामच असते, अगदी जगातल्या सुंदरींपैकी एक माधुरी दीक्षितला देखील प्रसंगी आम्ही ती कशी तिरळी बघते, लिहून सांगून मोकळे होऊ पण माझ्या कडल्या स्वागत समारंभाचे जमलेल्या पत्रकारांनी पत्रकार असूनही जे गावभर कौतुक केले, मन आनंदाने भरून आले….

मुलाच्या विवाह समारंभानंतर पुढल्या काहीच दिवसात माझ्या लहान नातवाचे अचानक सतत तीन दिवस पोट दुखत होते, सारे करून झाले पण पोट थांबेना, अर्थात देवाचा धावा सुरु होता, देव म्हणजे अदृश्य शक्ती, जी हे जग चालवते. त्या अदृश्य शक्तीची मनापासून प्रार्थना केली, कारण अगदीच क्षुल्लक निघाले, त्याला बरे वाटले. येथे हे सांगण्याचे कारण म्हणजे जेव्हा तुम्ही कसेही करून दारिद्र्य रेषेतून बाहेर पडून सुखवस्तू आयुष्याकडे वाटचाल करता तेव्हा आपण श्रीमंत होत असतांना कुठे चुकतोय का, याचा दर दिवस सम्पल्यानंतर दर रात्री विचार करणे आणि केलेल्या चुका भविष्यात होऊ न देण्याची शपथ घेणे अतिआवश्यक असते कारण पापांची प्रक्रिया जर पुढे सतत अतिश्रीमंत होण्यासाठी सुरु ठेवली तर पैसे येतात पण घर संपते, घरातले घरपण हरवते, जी पापे मी केली, त्याची मी मोठी किंमत मोजली आहेच आणि मोजावीही लागणार आहे पण जेव्हा केव्हा तुमचे कुटुंब एखाद्या जीवघेण्या संकटात सापडते तेव्हा आड येते ते तुमचे पुण्य. महत्वाचे म्हणजे संकटातही मन स्थिर ठेवणे तेव्हाच शक्य असते जेव्हा तुमच्याकडे पुण्याचा साठा असतो. आपले मुख्यमंत्री तीन तीन वेळा जेव्हा मृत्यूच्या दारातून परत येतात, मिळालेल्या आशिर्वादातूनच असे चांगले घडते. 

श्रीमंत होतांना, नाव मिळविताना, मोठे होताना, लोकाभिमुख होतांना इतरांना मागे हटवून आपण जे त्वेषाने पुढे सरकत असतो, तेव्हा अनेक पापे हातून घडतात, लक्षात येते त्यानंतर असे मी करणार नाही, ठरवावे लागते तरच ती अदृश्य शक्ती तिचा विविध रूपात धावा केल्यानंतर मदतीला धावते, घरोघरी मधुमेहाचा विळखा, हे आपण केलेल्या पापांचेच बक्षीस आहे, पुण्याचा साठा वाढवा, नक्की देव मदतीला येतो….

अलीकडे मनाला भावलेला एक प्रसंग सांगतो. श्रीमान राज ठाकरे यांच्या निवास स्थानी दसऱ्याच्या काही दिवस आधी धाकट्या मुलाच्या विवाहाचे निमंत्रण करायला गेलो होतो. राज यांना खोलीतून बाहेर यायला अवधी होता, मी आणि विक्रांत वाट पाहत बसलो होतो तेवढ्यात राज यांचे चिरंजीव तडफेने दोन वेळा इकडून तिकडे स्माईल देत गेले, ते जीवघेण्या आजारातून बाहेर पडले, असे अजिबात वाटले नाही, टच वूड…सांगण्याचा हेतू हाच, कुठलेसे पुण्य राज यांना आडवे आले आणि ते या जीवघेण्या संकटातून सहीसलामत पटकन बाहेर पडले. माणसाला आणखी काय हवे, राज अनेक राजवाडे बांधतील पण राजवाड्यातला राजकुमार सहीसलामत हवा, तरच आयुष्य सार्थकी लागले, म्हणता येईल. पुण्य आपल्या प्रत्येकाच्या आड यायलाच हवे. घरा घरातले घरपण टिकायला हवे…

तूर्त एवढेच.


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *