इकडले तिकडले राजकारणातले ४ : पत्रकार हेमंत जोशी

इकडले तिकडले राजकारणातले ४ : पत्रकार हेमंत जोशी 

समजा ऐनवेळी विराट कोहलीने खेळायला नकार दिला म्हणून त्याच्या ऐवजी उदय तानपाठक यांचा विचार झाला, असे होत नसते किंवा उद्या अगदी वेळेवर बोहल्यावर चढायला रणवीर सिंग याने नकार दिला म्हणून त्याठिकाणी उपस्थित असलेला पत्रकार महेश पवार बोहल्यावर चढला,असेही घडत नसते, मला हनिमूनला यायला वेळ नाही त्याऐवजी तू राजन पारकर यासी घेऊन जावे, असा मेसेज कुठलाही नवपरिणीत वर आपल्या नववधूला करणार नाही, श्री शरद पवारांच्या बाबतीत देखील नेमके तेच घडतांना दिसते आहे…म्हणजे लोकसभा निवडणूक लढविण्यास छगन भुजबळ यांनी नकार दिल्याने पवारांनी घुश्यात येऊन एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला उभे केले आणि निवडून आणले, तो इंदिरा गांधी यांचा कालखंड केव्हाच इतिहासजमा झालेला आहे, त्यांना एकाने विचारले, तुम्ही दगडासारखे बत्थड उमेदवार उभे करता आणि ते तुमच्या नावाने अगदी सहज निवडूनही येतात त्यावर इंदिराजी म्हणाल्या होत्या, दगडासारखे काय म्हणता, मी दगडांनाच उभे करते आणि ते निवडून येतात…


पवारांच्या मनातल्या जवळपास साऱ्याच संभाव्य उमेदवारांनी येणारी लोकसभा निवडणूक लढविण्यात अजिबात स्वारस्य नसल्याचे त्यांना प्रत्यक्ष भेटीत सांगितल्याने, पवारांची मोठी पंचाईत झाली आहे, त्यांच्यासाठी रक्तदाब वाढविणारा हा त्यांच्या लाडक्या नेत्यांचा नकार आहे. त्यांना पुढले पंतप्रधान व्हायचे आहे त्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच खासदार निवडून आणण्याची बऱ्यापैकी ताकद पवारांकडे, राष्ट्रवादीकडे आहे. ज्याच्याकडे अपेक्षेने बघावे, त्याने नकार कळवावा, हे म्हणजे प्रत्येकवेळी मुलीला मुलगा पसंत पडतो पण मुलाला मुलगी पसंत पडत नाही, तसे झाले, ज्यांचे पवारांनी खूप खूप भले केले, 

त्यातले कोणीही त्यांच्या या सहकार्याच्या हात पुढे करायला तयार नाही म्हणजे सुनील तटकरे विधान सभा लढायला एका पायावर उभे आहेत पण लोकसभा लढविण्यास त्यांनी नाही सांगितलेले आहे, असे या राज्यातल्या जवळपास सार्या लोकसभा मतदार संघात पवारांच्या बाबतीत त्यांच्या राष्ट्रवादीत घडले आहे. जर जबरदस्ती पवारांकडून केल्या गेली तर पक्षांतर करण्याचे देखील अनेकांचे त्यावर विचार करणे सुरु आहे, जे प्रचंड धक्कादायक असेल म्हणजे उरले सुरले ताकदवान नेते जर पवारांपासून दूर गेले तर त्यांचे नेतृत्व खिळखिळे होईल, अर्थात धूर्त पवार हे होऊ देणार नाहीत, त्यासाठी ते जंग जंग पछाडतील…


ज्यांनी ज्यांनी नकार दिला त्यांचे फारसे काही चुकले असे वाटत नाही कारण विधान सभेला निवडून आल्यानंतर अगदी सहज जो मलिदा जमा करता येतो, अधिकाधिक श्रीमंत होता येते, ते लोकसभेत अजिबात शक्य नसते त्यातल्या फार कमी मंडळींना म्हणजे एखाद्या दुसऱ्याला प्रफुल्ल पटेल होता येते, बाकी सारे फक्त रांगेत उभे राहून पंतप्रधानांच्या हातात हात फार तर मिळवून आनंद मिळविण्यात मग्न असतात. शिवाय लोकसभेला पराभूत झालो तर लगेच विधान सभेत नंबर लागेल, असेही होत नाही अन्यथा पवारांच्या इच्छेला मान देऊन लोकसभा लढवायची आणि जाणून बुजून पराभूत व्हायचे, असेही काहींनी केले असते. महाराष्ट्रातून थेट दिल्लीत जाऊन बसायचे म्हणजे नववधूला सोडून दूरवर नोकरीसाठी कतार ला निघून जाणार्या अब्दुल्लासारखे या मराठी खासदारांना वाटत असते, तिथे त्या दिल्लीत, राजधानीत ते बुजतातत, त्यांचा रामपूर का लक्ष्मण मधला खेडवळ रणधीर कपूर होतो किंवा बैराग मधला अडाणी दिलीपकुमार होतो…


तिकडे साताऱ्यात भलेही उदयन राजे भोसले यांच्याशी पंगा घेतांना वेळोवेळी राम राजे निंबाळकर यांना किंवा शशिकांत शिंदे यांना दरवेळी शरद पवार यांचे अगदी उघड सहकार्य हवे असते आणि पवार ते देतातही कारण उदयन राजे यांच्याशी राजकीय दोन हात करतांना प्रत्येकाची दमछाक होते, अशावेळी निधड्या छातीने उदयनराजे यांच्याशी पंगा घेणारे फारतर त्यांच्याच खानदानातले म्हणजे दिवंगत अभयसिंह राजे भोसले यांच्या घरातले किंवा कधी कधी खुद्द शरद पवार पुढे येतात, इतरांना मग या दोघांच्या मागे लपण्याशिवाय कोणताही पर्याय शिल्लक नसतो, मी तुमच्यासाठी धावून येतो तुम्ही माझ्यासाठी येणारी लोकसभा निवडणूक लढवायला हवी हे मात्र पवारांनी शशिकांत शिंदे आणि राम राजे निंबाळकर यांना विचारल्यानंतर त्यांनी नम्रपणे नकार दिला, पवार हे असे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एकटे पडत चालेले आहेत….

क्रमश:

पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *