राज कि बात : भाग २: पत्रकार हेमंत जोशी

राज कि बात : भाग २:  पत्रकार हेमंत जोशी 

आमच्यातले असे बहुतेक पुरुष मनातल्या मनात म्हणत असतात कि बायको काही दिवसांसाठी माहेरी गेल्याचे दुःख नाही पण प्रेयसीचे मंथली पिरियड्स नेमके त्यावेळी यायला नकोत तसे काहीसे माझे त्या राज ठाकरे यांच्याबाबतीत झालेले आहे, एकीकडे वाईट नक्की वाटते कि विरोधातल्या एकमेव उरलेल्या या नेत्याचा आवाज काहीही झाले तरी बंद पडता कामा नये आणि दुसरीकडे मनातल्या मनात राग देखील येतो कि कशासाठी पैसे मिळविण्याची घाई, असे कोणते खर्च त्यांना किंवा उद्धवजींना असतात, प्रसंगी पैसे आपापल्या पक्षावर देखील खर्च न करण्यासाठी दोघेही बंधू ओळखले जातात, ईडी चे हे केवढे रिस्की झेंगाट, राज तर डिस्टरब आहेतच पण मी तर असे ऐकलेय कि का कोण जाणे पण उद्धव ठाकरे देखील बऱ्यापैकी अस्वस्थ आहेत…


खूप बडे मासे म्हणजे नेते गळाला लागणे या राज्यात अगदीच सोपे असतांनाही ईडीने राज यांना चौकशीच्या फेऱ्यात अडकविणे विचारवंतांच्या मनाला फारसे ते रुचलेले नाही, पण चौकशीच्या बाबतीत मुद्दाम फारसे घडलेले नसल्याने राज ठाकरे यांच्यावर प्रेम करणाऱ्यांना देखील ईडी विरुद्ध दुर्दैवाने आवाज उठवता येत नाही, लोकांनी भुजबळ जेव्हा अडकले होते तेव्हा हेही करून बघितले पण कायदा मोठा असतो, उपयोग झाला नाही, उपयोग होत नाही. हेही निश्चित आहे कि राज यांच्याशिवाय उन्मेष जोशी यांच्यासारखे जे काही गळाला लागलेले आहेत किंवा लागणार आहेत त्याविषयी, बरे झाले हे घडले, अशाच प्रतिक्रिया ऐकायला मिळतात कारण उन्मेष किंवा तत्सम चार दोन व्यवहारात कसे अप्पलपोटे, फक्त आपला विचार करणारे आणि राजकीय पुण्याईचा स्वतःसाठी केवळ विचार करणारे या मंडळींना जवळून बघितलेले, जवळून ओळखणारे जाणून असल्याने या अशा मंडळींना समाजाची अजिबात सिम्पथी नाही, वाईट फक्त राज यांच्याबाबतीत वाटते…


www.vikrantjoshi.com 


दुर्दैवाने राज ठाकरे यांच्या सभोवताली फार कमी ‘ संदीप देशपांडे ‘ आहेत जे नेते किंवा मित्र असूनही कडवे ‘ राजभक्त ‘ आहेत. देशपांडे यांना नजरेसमोर आणा, मला अमुक पाहिजे किंवा तमुकच पाहिजे असे मनात ठेवून न वागणारा हा अतिशय धाडसी मनसैनिक राजभक्त आणि मनसे नेता. राज यांच्यासाठी किंवा मनसेच्या कुठल्याही कोणत्याही आंदोलनात कोणी येवो अथवा न येवो, हे साहेब थेट उडी घेतात कोणत्याही बऱ्या वाईट परिणामांची चिंता काळजी न करता, वास्तविक संदीप देशपांडे यांनी ठरविले असते तर पैशांच्या अधिकारांच्या बाबतीत ते प्रसंगी शिवसेनेत देखील राहून रामदास कदम सुभाष देसाई इत्यादी झाले असते, अगदी सहज होऊ शकले असते पण सुरुवातीपासून संदीप म्हणजे हनुमानासारखा राज भक्त, त्याला पद किंवा पैसा कधीही महत्वाचा वाटला नाही त्याने त्याच्या स्वभावातले धाडस आणि आपले अंगभूत असलेले उत्तम नेतृत्व फक्त आणि फक्त राज ठाकरे यांच्या चरणी कायम अर्पण केलेले आहे….


राज ठाकरे यांचा संदर्भ येथे जोडून सांगायचे नाही पण मनातले सांगतो, सतत बघतो म्हणून सांगतो कि निदान मोदी सत्तेत आल्याने ज्यांनी काळे पैसे मोठ्या प्रमाणात मिळविले ते आता हळूहळू बाहेर तरी पडायला लागले म्हणजे हेही नसे थोडके पण काळे पैसे बाहेर पडत असतांना त्याचवेळी आजही काळे पैसे घेणारे, मिळविणारे अजिबात थांबलेले नाहीत म्हणजे भ्रष्टाचार तसूभरही कमी झाला असे अजिबात वाटत नाही, वास्तविक काळे धन मिळवणाऱ्यांवर सर्वाधिक जरब बसणे बसविणे अत्यावश्यक आहे पण ते तसे दूरदूरपर्यंत घडण्याची साधी चिन्हे देखील दिसत नाहीत त्यामुळे आज मोदी सरकार लोकांना लोकांना वठणीवर आणताहेत उद्या हेच यांच्याही बाबतीत नक्की घडू शकते. सर्वात आधी मूळ रोगाचे उच्चाटन होणे गरजेचे होते पण येथे या राज्यात किंवा देशातही प्रसंगी मोदी यांना उल्लू बनवून त्यांच्या पक्षाच्या सभोवतालचे दलाल, नेते, मंत्री, व्यापारी, कंत्राटदार तेच करताहेत जे आधी सतत घडत आले आहे, सामान्य माणसाच्या, भारतीयांच्या हाती या हरामखोरांना बघून केवळ अश्रू गाळण्याचे काम उरलेले आहे…

क्रमश: हेमंत जोशी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *