पवारांचे पॉलिटिक्स ३ : पत्रकार हेमंत जोशी

पवारांचे पॉलिटिक्स ३ : पत्रकार हेमंत जोशी 

आम्ही पत्रकार नेहमीच सतत कायम दरदिवशी राज्यातल्या व्हीआयपी मंडळींना या ना त्या निमित्ते भेटत असतो, आमचे ते कामच असते किंबहुना आमच्या नावाच्या आधी ‘ पत्रकार ‘ हि उपाधी असल्याने आम्हाला जे या राज्यातले विविध क्षेत्रातले प्रमुख आहेत, मातब्बर आहेत, नामवंत आहेत, कीर्तिवंत आहेत त्यांना भेटणे सहज शक्य होते, पुढे जाऊन मी असे म्हणेन कि आम्ही या नामवंतांना ओळखतो म्हटल्यापेक्षा ते आम्हाला ओळखतात हे आमचे भाग्य आणि केवळ पत्रकारितेत आल्याने हे शक्य झालेले आहे. आम्ही पत्रकार आहोत, आम्ही दरक्षणी राज्यातल्या महत्वाच्या व्यक्तींच्या संपर्कात येतो, हवे ते त्यांच्याशी किंवा ते आमच्याशी बोलतात, आम्ही निघून येतो. रस्त्यावर बसून बूट पॉलिश करणार्यांसारखे आमचे असते म्हणजे तो पॉलिश करणारा जसे ग्राहकाचे थोबाड क्षणार्धात विसरून पुढल्या कामाला लागतो, आम्ही त्याही पुढे म्हणजे आमचेही जेवढ्यास तेवढे असते, अमुक एखादा व्हीआयपी मन:पटलावर रुजला, मनात ठासून भरला असे आमचे क्वचित होते, आमच्याबाबतीत खचित घडते पण या राज्यातले असे दोन नेते आहेत ज्यांची आम्हा साऱ्याच पत्रकारांना सतत आठवण होते, आलटून पालटून ते आमच्या मनात एखाद्या प्रेयसीसारखे घोळत असतात, प्रसंगी स्वप्नतही येत जात राहतात आणि ते दोघे आहेत शरद पवार तसेच देवेंद्र फडणवीस. वयानुपरत्वे आणि वय वाढल्याने पूर्वीसारखे पवारांचे पत्रकारांना सतत भेटणे होत नाही पण असा एकही पत्रकार या दोघांच्या बाबतीत नसावा ज्याला हे दोघेही जवळचे वाटत नसावेत. ज्याला त्याला वाटते पवार आणि फडणवीस आमच्या अतिशय जवळचे आहेत पण जे अति करतात, म्हणजे या दोघांच्या त्यांच्याशी असलेल्या मैत्रीचा वारंवार गैरफायदा घ्यायला जातात, त्यांना मात्र हे दोघेही खुबीने दूर ठेवतात, सतत भेटण्याने किंवा सतत त्यांच्याशी किंवा इतर कोणाशीही बोलल्याने आपले महत्व वाढते असे अजिबात नसते याउलट अशा मंडळींपासून चार हात लांब राहावे आणि आवश्यक असेल तेव्हाच भेटावे, त्यांच्याशी असलेल्या मैत्रीचा नक्की फायदा होतो. पत्रकारांच्या बाबतीत सांगायचे झाल्यास त्यांनी कायम स्वयंप्रकाशित असावे म्हणजे तास होत नाही, अमुक एखाद्या व्हीआयपीच्या जवळचा असे दलाली वृत्तीने पत्रकारांनी वागू नये, पुढे होते काय कि त्या त्या व्हीआयपी चे महत्व संपले कि यांचेही तेवढ्यापुरते वाढलेले महत्व संपते म्हणजे जे पत्रकार भुजबळ सत्तेत असतांना कायम त्यांचा गैरफायदा घायचे आणि ज्यांनी ज्यांनी त्यांच्याकडे आपले महत्व वाढून ठेवले होते, पुढे जसे भुजबळ खाली आले हे असे भामट्या पत्रकारांचे देखील महत्व संपले…


राष्ट्रवादी पार्टीत नक्की अजितदादांचे महत्व कमी झाले आहे आणि त्यांना, ते सत्तेत असतांना जे जे बिलगले होते अशांनाही शरद पवारांनी खड्यासारखे बाहेर काढले आहे. अत्यंत महत्वाचे म्हणजे अजितदादा फुल फॉर्म मध्ये असतांनाही ज्या एकमेव मंत्र्याने त्यांचे आदेश फारसे पाळले नाहीत किंवा अजितदादांना नेते म्हणून नव्हे फारतर एक मित्र म्हणून जेमतेम स्थान दिले होते आणि शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांचे आदेश पाळले होते थोडक्यात अजितदादांच्या गटात न शिरता आणि आपल्या राजकीय परिणामांची चिंता न करता केवळ शरदरावांना नेते म्हणून स्वीकारले होते तसेच जे त्या सुप्रियाशी अधिक जवळीक साधून होते ते जयंत पाटील त्यांच्या पक्षात थेट प्रदेशाध्यक्ष होणे म्हणजे अजित पवारांच्या आईस्क्रीम मध्ये मीठ घालण्यासारखे किंवा एखाद्याने तिखटाने माखलेले आपलेच बोट ढुंगणावरून फिरविण्यासारखे किंवा सताड उघड्या असलेल्या डोळ्यांमध्ये संत्र्याचे साल पिळण्यासारखे हे घडलेले आहे…


अजित पवारांच्या बाबतीत थेट डायरेक्ट सांगायचे झाल्यास त्यांना पुन्हा एकदा पूर्वीसारखे जोशात आणि त्वेषात येण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे, उद्या समजा आघाडीची सत्ता आल्यानंतर सुप्रिया सुळेच नक्की मुख्यमंत्री होतील, त्या वेळी एकाच घरातले दोघे सत्तेत कसे त्यातून शंभर टक्के अजितदादांचे मंत्रिपद देखील हुकणार आहे. त्यावेळी फारतर त्यांना पक्ष संघटनेत महत्वाचे पद दिल्या जाईल आणि यापुढे जे त्या सुनील तटकरे यांच्यासारखे थेट शरद पवार यांच्या पायावर डोके ठेवून, आमचे अजितदादा यांना बिलगणे चुकले, शरद पवारांना जाऊन सांगतील त्यांचेच भले होईल अन्यथा त्या सर्वांचा ‘ बाजोरिया ‘ होईल, असे अजितदादा गटातले किंवा एकेकाळी अजितदादांना उल्लू बनवून मोठे झालेले नोव्हेअर होतील, त्यातून ते राजकारणातून निवृत्त देखील झालेले दिसतील. आणि हि यादी फार मोठी आहे, त्यावर पुढे अवश्य वाचावे. राष्ट्रवादीत जे घडते आहे किंवा घडले आहे ते फारसे चांगले नाही जणू पवारांनी आधुनिक संभाजीचे राजकीय खच्चीकरण केले, असे वाटायला लागले आहे, दादा पराक्रमी आहेत, त्यांचे चिडीचूप होणे, सर्वांच्या मनाला खटकते आहे…

क्रमश:


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *