नार्वेकर बिलेटेड…पत्रकार हेमंत जोशी


नार्वेकर बिलेटेड…पत्रकार हेमंत जोशी 

काही अनामिक भितींनी मी ग्रासलेलो आहे. जसे परदेशात जातांना जेव्हा तुमचे आणि तुमच्याकडल्या सामानाचे चेकिंग होते त्यावेळी बेल्ट देखील काढायला सांगितल्यानंतर मला कायम भीती वाटत आलेली आहे कि पॅन्ट घसरून खाली पडेल, माझी फजिती होईल. आपले मुख्यमंत्री त्यांचे बरेचसे संभाषण भ्रमण ध्वनीवर एसेमेस पाठवून उरकतात. भीती वाटते, त्यांनी पाठविलेल्या एखाद्या एसेमेसचा कोणी दुरुपयोग करून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केल्या गेला तर. विनाकारण रिस्क घेऊ नये. फार पूर्वी माझ्या एका मित्राने पितांबर नेसून लग्न केले. आम्हा ब्राम्हणांमध्ये ते कॉमन आहे पण त्याने पीतांबराच्या आत पुन्हा पीतांबराचीच अंडरवेअर घालायला काय हरकत होती, त्याने ते केले नाही आणि वधूच्या गळ्यात हार घालण्याची आणि त्याचे पितांबर सुटण्याची एकच वेळ झाली. अख्या मांडवात गोंधळ. हा नेमका जेथे आडोशाला लपला तेथेच मुलीकडल्या बायकाही लपायला आल्या. शेवटी गुरुजींनी त्याच्या अंगावर अंतरपाट भिरकावला तेव्हा कुठे वातावरण निवळले.

 मला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सचिव श्री मिलिंद नार्वेकर यांच्या बिनधास्त बोलण्याची भीती वाटते. एकदा का अमुक एखाद्यावर त्यांचा विश्वास बसला कि त्यांचे ते बेधडक बिनधास्त बोलणे, असे खरेच वाटते, कोणी लावालाव्या केल्या तर…१८ मे, मिलिंद नार्वेकरांचा वाढदिवस. बिलेटेड हॅपी बर्थ डे मिलिंदजी. तुम्हाला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. वय ५२ सरले खरे पण तुमचा उत्साह वय वर्षे २५ असलेल्या तरुणाला देखील लाजविणारा आणि प्रेरणाही देणारा. रात्री उशिराने तेही मानसिक शारीरिक थकल्यानंतर अंथरुणावर पहुडणे पण जवळच्या माणसांना भल्या पहाटे तेही ब्रेकफास्ट घेतांना फोन करून सविस्तर बोलणे हि तुमची खासियत, कंटाळा हा तुमचा नंबर एकचा शत्रू. तसे तुम्ही अनेकांचे शत्रू पण तुमचे त्याकडे फारसे कधी लक्ष नसते, तुमचे त्या अर्जुनासारखे. बारीक लक्ष त्या उद्धवजींकडे त्यामुळे ठाकरेंच्या घरातलेही बिनधास्त असतात, तुम्ही असता कि त्यांची मनापासून काळजी घ्यायला. आजपर्यंत अनेक मोठ्या खुबीने मातोश्रीवर आधी बस्तान बांधून मोकळे झाले नंतर पदे हाती पडलीत कि फायदा गैरफायदा घेऊन मोकळे झाले. तुम्ही जे मागितले असते ते अगदी सहज तुम्हाला मिळाले असते. पण आज वयाची पन्नाशी उलटली तरी उद्धवजींचे पीए एवढ्यावरच तुम्ही समाधान मानले. हे आजकाल क्वचित घडते…


www.vikrantjoshi.com

शिवसेनेत तुमचे पद तुमचे अधिकार कोणते हे फारसे कोणाला माहित नाही, जाणून देखील घ्यायचे नसते. उद्धवजींचे सचिव म्हटले कि सारे संपते. तुम्हाला भेटणाऱ्याला थेट उद्धव किंवा आदित्य यांना भेटल्यासारखे होते. काही महत्वाचे बोलायचे असले किंवा निरोप द्यायचा असला कि समोर तुम्हालाच केल्या जात असल्याने थेट बाळासाहेब माँसाहेब होते अगदी तेव्हापासून त्यांच्या घरातले जबाबदार प्रतिनिधी म्हणूनच तुमच्याकडे बघितल्या जाते. ठाकरे कुटुंबीय किंवा मातोश्रीसाठी सर्वाधिक शिव्या खाणारा माणूस म्हणून तुमची गिनीज बुक मध्ये नोंद होणार आहे. तुम्ही सांगितलेले ते अखेरचे असते, इतरांना ठाकरेंकडून पुन्हा खात्री करून घ्यावी लागत नाही. अनेकांचे पीए कालांतराने मोठे झाले पण पीए असतांना एवढे मोठे, तुम्ही एकमेव आणि अद्वितीय. यश सातत्याने पचविणे येथे आपल्याकडे मोठे कठीण असे काम कारण यशाची मस्ती डोक्यात लगेच शिरते तेथेच मग बहुतेकांचे पानिपत होते. तुमचे ते तसे नाही. मी मातोश्री पेक्षा मोठा असे ज्यांना ज्यांना वाटले ते सारे कसे संपले आपल्याला तो इतिहास सर्वांना तोंडपाठ आहे. तुमचे तसे झाले नाही, होणारही नाही….


नदीचे दोन काठ त्यांना जोडणार्या पुलासारखे तुमचे काम आहे म्हणजे अनेकदा कार्यव्यस्ततेमुळे अनेकांचे, नेत्यांचे, उद्योगपतींचे, आमदारांचे, शिवसेना नेत्यांचे, मंत्र्यांचे, खासदारांचे, पदाधिकाऱ्यांचे, मान्यवरांचे, विरोधकांचे थेट शिवसेना पक्ष प्रमुखांशी बोलणे होत नाही अशावेळी त्यांना हमखास तुमची आठवण होते आणि भाव न खाता तुम्ही मध्यस्थाचे काम प्रामाणिकपणे बजावून केवळ दुवा घेऊन मोकळे होता. उद्धव ठाकरे यांच्या वतीने वेळ निभावून टाळणे किंवा थापा मारून समोरच्या माणसाला उगाचच खुश करणे तुमच्या ते म्हणाल तर रक्तात म्हणाल तर स्वभावात नसल्याने, नार्वेकर तोंडावर पडले, असे कधी घडले नाही. एकवेळ एखाद्या इच्छुकाला आमदार किंवा नामदार होण्याची थेट मातोश्रीवरून सांगितले तरी खात्री नसते पण तुमचे काम होईल, हे शब्द त्यांच्या कानावर पडलेत कि असे बिनधास्त होऊन बाहेर पडतात. तुमच्या भोवताली निर्माण झालेले तेजोवलय असेच टिकावे, सतत वाढावे त्यासाठी तुम्हा मनापासून शुभेच्छा आणि आशीर्वाद…

तूर्त एवढेच.

पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *