वृत्तपत्रांची आकडेवारी/ लबाडी २ : पत्रकार हेमंत जोशी

वृत्तपत्रांची आकडेवारी/ लबाडी २ : पत्रकार हेमंत जोशी 


निळकंठ खाडिलकर नावाच्या मुंबईकर मराठी मालकाने संपादकाने जो खपाचा पराक्रम एकेकाळी करून दाखविला त्याची सर कोणत्याही मराठी हिंदी इंग्रजी दैनिकाला येणार नाही. हे जे काय खपाचे कोटींच्या घरात आकडे सांगताहेत ते जिल्हानिहाय निघणार्या आवृत्त्यांची एकत्र बेरीज करून सांगितलेले आकडे आहेत,महाराष्ट्रात या राज्यात कोणत्याही एकाच ठिकाणाहून जर दैनिके काढल्या गेलीत तर एका रात्रीतून कोटींचा खप काही लाखांवर येईल. दैनिकांच्या लोकप्रियतेत नवाकाळ ने जे करून गाजवून दाखविले त्याखालोखाल आजपर्यंतचे सारे आहेत पण झाले काय निळूभाऊंनी एक नवीन वाईट प्रथा या राज्यात रुजविली जी पुढे जवळपास साऱ्याच वाहिन्यांनी दैनिकांनी अंगिकारली ती अतिशय वाईट हलकट प्रथा म्हणजे बातम्या लेख मुलाखतींना थोडक्यात जे दाखविण्यात येते किंवा छापण्यात येते त्या मजकूरांना जाहिरातींचे स्वरूप दिले त्याभरवंशावर प्रचंड पैसे वाहिन्यांनी दैनिकांनी वृत्तपत्रांनी मीडियाने उकळायला मिळवायला सुरुवात केली,येथेच या राज्यात वृत्तपत्रांची वाहिन्यांची विश्वासहर्ता संपली. निळूभाऊ फार चुकले असेही म्हणता येणार नाही, मालामाल शेठजींसमोर दैनिक टिकवायचे चालवायचे तेही नियमित काढायचे म्हणजे पैसे मिळविणे त्यांना आवश्यक होते, त्यातून हे चुकीचे काम त्यांच्या हातून घडले आणि तीच प्रथा पुढे मीडिया क्षेत्रात कायम रुजली. आधी हा प्रकार तुरळक लपूनछपून होता पुढे सारे उघड उघड व्हायला लागले…


www.vikrantjoshi.com


राज्यातली जवळपास सारीच दैनिके छापून येणाऱ्या जवळपास सर्वप्रकारच्या मजकुराकडे जाहिरात म्हणूनच बघतात, इंच इंच बातम्या किंवा मुलाखतीचे पैसे संबंधितांकडून उकळतात, नेमके हे म्हणाल तर दुष्कृत्य नवाकाळ च्या बाबतीत त्यांच्या लाखो वाचकांच्या लक्षात आले आणि निळूभाऊंच्या लिखाणाची म्हणाल तर जादू म्हणाल तर विश्वासहर्ता संपली आणि खपाच्या बाबतीत ज्या वेगाने नवाकाळ सरसर वर चढला होता दुप्पट वेगाने खाली आला, खप काही हजारांवर आला. भाजपाच्या श्वेता शालिनी किंवा राष्ट्रवादीचे हेमंत टकले तुम्हाला त्यावर विस्तृत नक्की सांगू शकतील कि निवडणुकांच्या काळात बहुतांश दैनिकांना आणि वाहिन्यांच्या बातम्या मुलाखती या जाहिराती समजून कसे पैशांचे वाटप करावे लागते, किंवा कोणी रामेश्वर कि परमेश्वर आडनावाचा भामटा तर यातला तद्न्य मानल्या जातो त्याला विविध निवडणुकांच्या काळात त्याला प्रचंड मागणी असते. तोही मस्त कामवतो आणि मीडियाला थोडेफार कमावून देतो…


एकेकाळी दैनिकांचे संपादक कोण, त्यावर त्या वृत्तपत्राचा दर्जा ठरत असे. नीलकंठ खाडिलकर यांना तर अग्रलेखाचा बादशाह म्हटल्या जायचे पुढे बादशहाचे संस्थान त्यांच्या वाचकांनीच खालसा केले तो भाग वेगळा. माधव गडकरी, गोविंद तळवलकर, निळूभाऊ खाडिलकर इत्यादी महान संपादकांचा जमाना केव्हाच इतिहासजमा झाला आहे मला तर कधी कधी हेच वाटते कि त्यातले शेवटचे शिलेदार कुमार केतकर हेच ठरावेत कारण यापुढे वृत्तपत्रांच्या मालकांनी वृत्तपत्र केवळ पैसे मिळविण्याचे साधन ठरविले असल्याने आकड्यांचे गणित जमवून आणणारे संपादक महत्वाचे ठरतील. हल्ली हल्ली तर कोणीही वाहिन्यांचा प्रमुख होतो किंवा दैनिकांचा संपादक होतो. ज्यांना हिशेबांचे गणित जमले ते यशस्वी ठरले, अशोक पानवलकर, गिरीश कुबेर इत्यादी चार दोघांना ना हिशेब जमले ना माधव गडकरी गोविंद तळवलकर होता आले त्यामुळे त्यांच्या काळात खपाच्या बाबतीत महाराष्ट्र टाइम्स किंवा लोकसत्ता ज्या वेगाने खाली आले किंवा खप वाढलाच नाही, त्याचे वाईट वाटते. या दोन्ही दैनिकात बातम्या लेख मुलाखती संपादकीय इत्यादींकडे जाहिरात म्हणून बघितले जात नसतांनाही त्यांना वाचकांचा विश्वास आणि लोकप्रियता टिकवून ठेवता आली नाही, हे पानवलकर आणि कुबेर या दोन बोअरिंग संपादकांचे मोठे अपयश आहे, भलत्याच विषयांना प्राधान्य दिल्या गेले, दैनिकात काम करणारे अनेक वार्ताहर वाईटाकडे भरकटले आणि लोकसत्ता तसेच महाराष्ट्र टाइम्स या दोन्ही दैनिकांची जवळपास वाट लागली, खूप वाईट वाटते…


एखादा बाप जेव्हा पोटच्या पोराला विडी विकत आणायला सांगतो, चार दोन वेळा हे घडले कि तो मुलगा देखील कुतूहलापोटी एखादी विडी रस्त्याने ओढून बघतो, पुढे मग त्यालाही विडी ओढण्याचे व्यसन लागते किंवा एखादी आई जेव्हा पोटच्या तरुण झालेल्या वयात आलेल्या पोरीलाच नको त्या ठिकाणी पाठवते, पुढे तीच मुलगी मग स्वतःचे देखील एखादे ग्राहक शोधते आणि वेश्या म्हणून बदनाम होते. बहुतेक दैनिकात काम करणाऱ्या वार्ताहराचे देखील तेच झालेले आहे, त्यांना मालकच सांगतात कि माझे अमुक काम तमुक मंत्र्यांकडून अधिकाऱ्याकडून करून आण, पुढे मग तोच वार्ताहर त्यात स्वतःची देखील चार कामें घुसडतो आणि वार्ताहारकी राहिली बाजूला, दलाल म्हणूनच अधिक पुढे येतो, बहुतेक दैनिकातून हे अगदी उघड सुरु झाल्याने ज्यांना आदर्श ठरविता येईल असे केवळ देशभक्तीपोटी वार्ताहारकी करणारे किंवा संपादक देखील फार कमी आहेत पण नाहीत असेही नाही त्यामुळे वाचकांनी अगदीच निराश होण्याचे कारण नाही, एकच सांगतो, दैनिके काढणे वाहिन्या काढणे हा आता धंदा आहे, गंदा धंदा झालेला आहे. जसे काही पोलिसांना पगाराची गरज नसते तसे अनेक वार्ताहराचे देखील, त्यांना त्यांचा मिळणारा पगार लाईक या पीनट असतो…

क्रमश:


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *