व्यक्तिविशेष ४ : अजित पवार–पत्रकार हेमंत जोशी

दिसायला तो किरकोळ, काहीस नाजूक वाटतो, त्याचे खाणे जेवणे देखील भातुकलीच्या खेळासारखे पण आतून तो मनाने संभाजी म्हणजे पराक्रमी आणि शरीराने एकदम तंदुरुस्त, काटक आहे, त्याला देवाने वाघासारखी डरकाळी फोडणारा आवाज बहाल केला आहे त्यामुळे, कोण आहे रे तिकडे, त्याने म्हणण्याचा अवकाश कि ऐकणार्याची गाळण उडते. अलीकडे तो काहीसा मनाने हिरमुसला असला तरी एरवी तो अत्यंत कडक, कणखर, करारी, खंबीर, जोमदार, दमदार, प्रभावशाली,प्रभावी, शक्तिशाली, धाडसी, प्रचंड कुवतीचा, दिलदार मनाचा, पोलादी, बुलंद, चैतन्य आणि उत्साहाचा झरा आहे, तो एक अपटूडेट, टापटीप, स्वच्छतेचा भोक्ता, बुद्धिमान, भरभक्कम असा या राज्यातल्या प्रभावशाली नेत्यांपैकी एक आहे. वास्तविक त्याच्या वाटेला एरवी कोणाची जाण्याची हिम्मत होणार नाही पण एखाद्या पैलवानाची मुलगी जर स्वत:च आपला हात टवाळखोर तरुणांच्या हातात देणार असेल तर तिचा हात दाबण्याची संधी कोण कशी सोडेल, हे असे त्या एरवी राजासारखा रुबाब असणार्या नेत्याचे झाले आहे म्हणजे त्याच्या वाटेला जाण्याची या राज्यात कोणाचीही हिम्मत झाली नसती पण त्याने स्वत:हून नको त्या नको एवढ्या अजिबात गरज, आवश्यकता नसतांना चुका केल्या आणि तो त्याने जपलेला प्रभाव अलीकडे प्रभावहीन ठरला, एरवी वाघ सिंहासारखा जगणारा हा नेता केलेल्या अक्षम्य चुकातून शेळीच्या भूमिकेत जगतो, बघून कधी त्याचा राग येतो तर कधी मनाला अतिशय वाईट वाटते. आणि हा नेता कोण असेल तुमच्या आतापर्यंत लक्षात आलेच असेल, असून असून असणार कोण, अजित पवार यांच्याशिवाय असे पराक्रमी, अंगावर चालून जाणारे नेतृत्व आहे कोण….

अजितदादा यांना वाटत असेल मी त्यांना शत्रू मानतो पण मी काय या राज्याचा महाराणा प्रताप आहे कि दादांशी पंगा घेऊन दंगा करेल, अजिबात शक्य नाही. त्यांच्यावर लेखणीतून मात्र अनेकदा उलटतो कारण अगदी मनापासून एक धाडसी नेतृत्व म्हणून मला ते भावतात त्यातून त्यांचा घसरत चाललेला पाय, मनाला यातना व्हायच्या, इतर कोणीही बोलण्याची किंवा लिहायची फारशी हिम्मत दाखवायचे नाहीत पण मी मात्र जेथे जेथे संधी मिळेल त्यांच्यावर मनसोक्त टीका करून मोकळा झालो, अजितदादा मला शत्रू समजत असतील त्यातून त्यांनी मला हमखास टाळले आहे पण जे मी बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत, लिहित होतो, नेमके तेच घडले, अजितदादा अजिबात आवश्यकता नसतांना नको त्या ठेकेदारांच्या नादी लागून मागे पडले, आज भलेहि त्यांचे राजकीय अस्तित्व काही प्रमाणात जाणवत असेल पण शरद पवार जसे सत्तेत असले किंवा नसले तरी त्यांचे या राज्यात कधीही महत्व कमी झाले नाही, त्या काकांपेक्षादेखील अजितदादा अधिक प्रभावी या राज्यात ठरले असते आणि पैसा काय, तो खरोखरी मिळविणे दादांना महत्वाचे नव्हते, त्यांच्या काकांनी तो केव्हाही त्यांना बहाल केला असता, पण दादांचे व्यवहार चुकले, प्रेम म्हणून शरद पवार यांनी त्यांच्यावर पांघरून घातले खरे पण त्यांनी पुढला धोका ओळखून म्हणजे पुतण्याच्या बाबतीत आपला गोपीनाथ मुंडे होऊ नये हे लक्षात घेऊन शरदराव यांनी घरातूनच दादांना स्पर्धा निर्माण केली, सुप्रिया यांना राजकारणात नंतर आधी समाजकारणात उतरवून त्यांचे या राज्यात महत्व वाढविले, दादांच्या ते लक्षात आले, काका आपल्याला देखील सोडणार नाहीत, त्यांच्या ते ध्यानात आले, त्या दोघात नक्की बिनसेल, वाटत होते पण दादा चार पावले मागे आले आणि एक मोठा होणारा वाद तेथेच संपला, नंतरच्या काळात अर्थात दादांचे अधिक लक्ष राज्याच्या तिजोरीतून वैयक्तिक मालमत्ता कशी जमा करता येईल,त्यावर होते, हळू हळू त्यातून पुन्हा एकदा या राज्यात शरद पवार हेच अधिक प्रभावी ठरले आणि संधी चालून आलेली असतांना दादा यांना आता पुढली काही वर्षे तरी मान खाली घालून राजकारण करण्याची हि वेळ त्यांच्यावर येउन ठेपलेली आहे. गरज असेल तेवढे पैसे हवेत ते एरवी शरद पवार यांना देखील मान्य असावे, त्यांनी दिल्लीला प्रयाण केल्यानंतर अगदी मनापासून राज्याच्या नेतृत्वाची धुरा अजितदादा यांच्याकडे सोपविली होती पण दादांचे केवळ भूखंड आणि राज्यातल्या तिजोरीच्या श्रीखंडावर लक्ष आहे, त्यांना लक्षात आले, नाईलाजाने मग पुन्हा एकदा काका राज्यातल्या राजकारणावर आणि राज्यातल्या त्यांच्या राजकीय पक्षात लक्ष घालू लागले…..

अजितदादा यांनी नको तो मोह आवरला असता तर तरुण पिढीच्या रांगेत एक ते दहा ते आणि राज ठाकरे हे दोघेच उरले असते म्हणजे दोघांनीही काकाची गादी परफेक्ट वारसदार म्हणून सांभाळली असती, पण दोघांनीही नको त्या चुका केल्या आणि त्यांच्या काकाच्या नावाचा फायदा दोन्हीकडे त्या त्या काकांच्या पोटच्या पुढल्या पिढीला झाला, उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळे पुढे निघून गेले. एखाद्या प्रेयसीने धोका दिल्यानंतर तिच्या प्रियकराला जे अतीव दु:ख होते तसे या राज्यातल्या जनतेचे झाले, ते अजितदादावर एक धाडसी, लोकांना मनापासून मदत करणारा नेता म्हणून प्रेम करायचे पण दादांनी आम्हा सार्यांना धोका दिला, ते स्वत:साठी ज्यादा जगले त्यातून त्यांनी पैसा भलेही मिळविला पण जमविलेला जनता नामक खजिना तूर्तास मात्र त्यांनी गमावला आहे…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *