कोण कसे : भाग ४ : पत्रकार हेमंत जोशी

कोण कसे : भाग ४ : पत्रकार हेमंत जोशी 


अमुक एखाद्याची शरीरयष्ठी किंवा चेहरा बघून तुम्ही आम्ही हे सांगूच शकत नाही कि समोरची व्यक्ती नेमकी कोण आहे, सांगाल का कि कोणत्या अँगलने श्रीमती विद्या ठाकूर राज्यमंत्री आहेत असे वाटते, बघणार्याला वाटेल, वर्गातल्या सर्वात ढ असलेली हि बाई कुठल्याशा सरकारी इस्पितळात दाइचे काम करणारी असावी, पण प्रत्यक्षात प्रकरण वेगळे आहे, विद्याताई त्यांच्या गोरेगाव परिसरात लोकप्रिय आहेत, त्या किंवा त्यांचे पतीदेव जयप्रकाश तेथे कायम कधी महापालिकेत तर कधी विधानसभेवर निवडून येतात, अलीकडे त्या किंवा त्यांचे नवरोबा विद्याताई राज्यमंत्री झाल्यानंतर नको तेवढ्या भानगडीतुन पैसे लाटण्याचे नको ते उद्योग करतात, त्यातून त्यांची लोकप्रियता घसरतेय, हि वस्तुस्थिती आहे, म्हणून सांगतो एखाद्याच्या चेहऱ्यावर जाऊ नका, एरवी बारमाही अतिसाराचा त्रास होणाऱ्या रोग्यासारखे त्यांच्या चेहऱ्यावरले हावभाव, पण बाई पक्क्या राजकारणी आहेत आणि गोरेगाव परिसरात त्यांच्या या नेतृत्वाला नक्कीच डिमांड देखील आहे….

सदाभाऊ खोत यांच्यावर लिहायचे म्हणून विद्याताई आठवल्या, सदभाउंचेही तेच, चेहरा बावळा, परी अंतरी नाना कळा, असे मी नाही, राजू शेट्टी यांच्या संघटनेतून बाहेर पडलेले तदनंतर बळीराजा शेतकरी संघटना स्थापन करणारे संजय पाटील घाटनेकर हमखास हे असे सदाभाऊ विषयी सांगतात असतात, त्यांनी हेच राजू शेट्टी यांना फार पूर्वी सांगितले होते कि, इतरांचे महत्व कमी करून केवळ चेहऱ्यावर भोळा भाबडा वाटणाऱ्या या सदभाऊला डोक्यावर बसवू नका, हा तुमचा कधीही होणार नाही, तुमच्या पाठीवर आणि पोटावर पायदेऊन केव्हा कोलांटीउडी घेईल, याचा नेम नाही पण त्यावेळी शेट्टी यांनी संजय पाटलांचे ऐकले नाही, सदाभाऊंना त्यांनी घट्ट पकडून ठेवले आणि सतत प्रेमाचा चुंबन वर्षाव जणू त्यांच्यावर केला, पण केव्हा जोराचा झटका त्या शेट्टी यांना देऊन खोत मंत्री झाले, शेट्टीच्या ते लक्षात देखील असले नाही, एखाद्या  बॅट्समनला चेंडू दिसू नये आणि पुढल्याच क्षणी त्याचा त्रिफळा उडावा,शेट्टी हे असे त्रिफळा उडालेले बॅट्समन ठरले….

अर्थात गोड गोड बोलून, नेमका मीच कसा राज्यातल्या शेतकऱ्यांमध्ये नेता म्हणून अव्वल, सदाभाऊ यांची ती समोरच्याला इम्प्रेस करण्याची नेहमीची पद्धत, राजू शेट्टी किंवा शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मी कच्चे खाऊन भाजपा शेतकऱ्यांत लोकप्रिय करवून दाखवेन, सदाभाऊंची हि थाप मुख्यमंत्र्यांनाआणि भाजपाला पचली आणि सदाभाऊ मंत्री झाले, वास्तव मात्र वेगळे होते, ज्या सदाभाऊ यांना शेतकऱ्यांच्या संघटनेत मानाचे पान आणि स्थान राजू शेट्टी यांनीच केवळ मिळवून दिले, खोत त्यांनाच कुक्कुलं बाळ समजले, नेमका अंदाज तिथेच चुकला, पुढल्याच काही महिन्यात शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन राजू शेट्टी यांनी उभे केले ज्याचा प्रचंड ताप, त्रास आणि मनस्ताप आजही मुख्यमंत्र्यांना झाला, आजही होतोय…..

९०-९२ च्या दरम्यान शरद जोशींनी शेतकरी संघटनेत युवा आघाडीचा अध्यक्ष सदाभाऊ खोतांना केले तेव्हा शरद जोशींनाही आधी वाटले, चला, आपला वारसदार गवसलाय, पुढे काही दिवसांनी याच सदाभाऊंच्या युवा नेतृत्वाखाली दौंडला शेतकऱ्यांचे मोठे अधिवेशन भरविण्यात आले, देणग्या गोळा केल्या गेल्या, शेतकऱ्यांनीही खिशातून उत्स्फूर्त पैसे काढून दिले पण घडले भलतेच, त्या पैशांचा घोटाळा झाला आणि जोशींनी मग कठोर भूमिका घेऊन सदाभाऊंना ठणकावले, ज्यांचे आले त्यांचे परत करा, पैसे नसलेत तरी चालेल पण आपली काँग्रेस होता कामा नये, सदाभाऊंनी मात्र शारदरावांचे ऐकले आणि ज्याचे हडपल्या गेले होते त्याचे बऱ्यापैकी परत केल्या गेले. एका उनाड तरुणाला उगाचच मोठे केले म्हणून जोशींनी स्वतःच म्हणे स्वतःच्या थोबाडात मारून घेतले….

सदाभाऊ, मला एक सांगाल का, १९९५-९६ च्या दरम्यान गोपीनाथ मुंडे आणि पाशा पटेलांसारख्या भाजपातील ग्रामीण ढंगाच्या नेतृत्वाला हाताशी धरून, मला आठवते तुम्ही धुळे जिल्ह्यातील साक्री परिसरात, तेथल्या आदिवासी पट्ट्यात देवकीनंदन सहकारी दूध डेअरी काढली होती, पुढे काय हो त्या डेअरीचे झाले, अद्याप डेअरी सुरु आहे कि वाजवलेत त्या डेअरीचेही बारा….? मला फारसे आठवत नाही, त्या भागातल्या सिनियर पत्रकारांना हाताशी धरले तर नेमके सत्य मला कळणे तसे कठीण नाही, पण तेथेही काही घोटाळे झालेत  आणि स्थानिक आदिवासींनी तुम्हाला तेथून हाकलून, हुसकावून लावले होते, आठवून, नेमके काय घडले होते, सांगाल का….? 

एखादा शरद जोशी पुन्हा एकदा जन्माला येणे आवश्यक आहे असे वाटते, ना पैशांचा लोभ ना सत्तेची आस, अन्यथा शरद पवार यांनी केव्हाच त्यांना मंत्रिपद देऊन शेतकऱ्यांच्या आंदोलनातली हवा काढून घेतली असते, पण हे शरद त्या शरद समोर झुकले नाहीत, ते ब्राम्हण असूनही ते साक्षात संभाजी राजासारखे जगले म्हणून अखेरपर्यंत शेतकऱ्यांना त्यांच्यात त्यांचा परमेश्वर दिसला….

अपूर्ण :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *