खासदाराचा अल्टिमेटम : पत्रकार हेमंत जोशी

खासदाराचा अल्टिमेटम : पत्रकार हेमंत जोशी 

ते सतत दगड फेकून मारताहेत, कोण असतो जो विनाकारण दगडं फेकून मारतो…ते चारचौघात, जाहीर अपमान करताहेत, ते अद्वातद्वा बोलताहेत, ते घालून पाडून पाणउतारा करताहेत, ते वाटेल तसे आरोप करीत सुटले आहेत, अवमान करण्याची एकही संधी त्यांनी सोडलेली नाही, आता फक्त हात उगारण्याचे त्यांनी तेवढे सोडले आहे, बाकी ठेवले आहे म्हणजे त्रास देण्याची, ते राज्यमंत्री असूनही त्यांचा पाणउतारा करण्याची एकही संधी त्या मामा भाच्यांनी सोडलेली नाही तरी तो राज्यमंत्री शांत आहे, गृहराज्यमंत्री असूनही त्याने संयम सोडलेला नाही, सभयतेच्या चाकोरीबाहेर जाण्यास त्याचे मन आणि तन धजावत नाही, तो खऱ्या अर्थाने उच्चशिक्षित आणि सुसंस्कृत आहे. ते राज्यमंत्री झाल्यादिवसापासून त्यांच्यामागे यांनी सतत काहीतरी शुक्लकाष्ठ लावून ठेवलेले आहे अगदी ईडी मार्फत देखील यांची चौकशी करण्यात ते आघाडीवर होते आणि हे सारे भाजपामधले एक ज्येष्ठ सिनियर नेते आपल्याच पक्षातल्या आपल्याच जिल्ह्यातल्या एका हरहुन्नरी उत्साही आणि त्यांच्यासमोर मोस्ट ज्युनियर असलेल्या नेत्याला, राज्यमंत्र्याला विनाकारण छळत आले आहेत, सतत छळताहेत. या नेत्याचा, या राज्यमंत्र्याचा गुन्हा काय तर त्यांना फडणवीसांनी मंत्रिमंडळात घेऊन त्यांच्याकडे राज्यमंत्री म्हणून अतिशय महत्वाची खाती दिलीत, विशेष म्हणजे मिळालेल्या खात्यांना न्याय देणारा फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील सर्वाधिक यशस्वी राज्यमंत्री म्हणून त्यांच्याविषयी पक्षात किंवा इतरत्र देखील सतत सांगितल्या जाते, कारण सरळ आणि स्पष्ट आहे, या गटाला मंत्रिपद न मिळाल्याने त्यांनी जणू कायम आपल्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्याला आणि राज्यमंत्र्याला सतत बदला घेतल्यासारखी वागणूक दिलेली आहे..

सध्या विदर्भातील अकोला शहरातल्या, अकोला जिल्ह्यातल्या भाजपामधले वातावरण तेथील उन्हासारखे, उन्हाळ्यासारखे तापले आहे. भाजपचे खासदार संजय धोत्रे त्यांचे भाचे आमदार रणधीर सावरकर आणि अकोला शहरातील भाजपाचेच विद्यमान आमदार गोवर्धन शर्मा आणि महापौर विजय अग्रवाल विद्यमान यशस्वी राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या अगदी उघड विरोधात गेले आहेत, धोत्रे यांनी त्यांच्या पक्षश्रेष्ठींना जाहीर धमकी किंवा अल्टिमेटम दिला आहे कि पुढल्या पंधरा दिवसात पाटलांची राज्यमंत्रीपदावरून हकालपट्टी करा, अन्यथा आम्ही आमचे बघू…त्यांच्या या धमकीवर अकोल्यातले राजकीय जाणकार म्हणतात, सांगताहेत कि धोत्रेंचे ऐकले नाही तर ते सरळ उठतील आणि शरद पवारांना म्हणजे त्यांच्या या आवडत्या मित्राला कम नेत्याला जाऊन बिलगतील, थोडक्यात धोत्रे खासदारकीचा राजीनामा देऊन त्या पटोले यांच्या सारखे भाजपमधून बाहेर पडतील, राष्ट्रवादीमय होतील. धोत्रे आणि त्यांचे गोवर्धन शर्मा यांच्यासारखे कट्टर पाठीराखे कोणत्याही क्षणी राष्ट्रवादी मध्ये जातील, भाजपा सोडतील, कदाचित या उघड चर्चेमुळे कि धमकीमुळे मला वाटते भाजपा आणि संघ परिवार अगदी ठाम राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यापाठीशी उभा आहे, संघ आणि भाजपाचे अकोल्यातले अंबटकर यांच्यासारखे सन्मानीय सदस्य, नेते किंवा शेजारच्या जिल्ह्यातले भाजपाचे अतिशय प्रभावी नेते या राज्याचे कृषी मंत्री श्रीमान भाऊसाहेब फुंडकर, चिंता करू नका असे डॉ. रणजित पाटलांना सांगून मोकळे झाले आहेत….

होय, शरद पवारांची भाजपा खासदार संजय धोत्रे यांच्यावर खास मर्जी आहे आणि धोत्रे भाजपाचे यावेळी तिसऱ्यांदा खासदार होऊनही त्यांचे पहिले प्रेम श्री शरद पवार आहे म्हणूनच पवार केंद्रात कृषी मंत्री असतांना त्यांनी अकोल्यातले कृषी विज्ञान केंद्र त्यांच्या राष्ट्र्वादीतल्या नेत्याला म्हणजे तुकाराम बिरकड यांना न देता थेट संजय धोत्रे नामें भाजपा खासदाराला दिले होते. कृषी बिज्ञान केंद्र अनेक नेत्यांनी लाटलेली मिळविलेली आहेत, या कृषी विज्ञान केंद्रांना फार मोठ्या रकमेचे आर्थिक अनुदान दरवर्षी केंद्र सरकारकडून मिळते, बहुतेकांनी अनधिकृतपणे कृषी विज्ञान केंद्रासाठी मोठ्या प्रमाणावर सरकारी जागा देखील बळकावलेल्या आहेत. धोत्रे यांचे कृषी विज्ञान केंद्र कसे सुरु आहे माहित नाही, ते व्यवहारात नक्की व्यवस्थित असावे पण ज्यांना ज्यांना हि अशा कृषी विज्ञान केंद्रे मिळालेली आहेत त्यातले अनेक हिशोबात वादग्रस्त असल्याची माझी माहिती आहे…बघूया…बापरे, रणजीत पाटलांना शिव्या देत देत जर संजय धोत्रे आणि त्यांचा गोवर्धन शर्मा, विजय अग्रवाल यांच्यासारखा मित्रपरिवार जर भाजपमधून अचानक बाहेर पडला तर अकोला जिल्ह्यातली भाजपा नक्की खिळखिळी होईल, अल्टिमेटम चा अर्थ तोच निघतो जर रणजित पाटलांची पुढल्या पंधरा दिवसात मंत्री मंडळातून हकालपट्टी केली नाही झाली नाही तर…धोत्रे यांचे हे अल्टिमेटम मानले तर हि थेट त्यांच्या पक्षश्रेष्ठींना अगदी उघड धमकी आहे. अकोल्यातले राज्यपातळीवरचे भाजपामधले एक ज्येष्ठ मान्यवर नेते यांनी एक प्रयोग करून बघण्यास हरकत नाही, त्यांनी त्यांच्या पक्षश्रेष्ठींचे मन वाळवावे आणि धोत्रे यांच्या मनातले त्यांचे राज्यसभेवर जाणे, त्यांच्या चिरंजीवाला म्हणजे अनुप धोत्रे यांना अकोट मधून विधानसभेची उमेदवारी आणि भांजे रणधीर सावरकर यांना अकोल्यातूनच लोकसभेची उमेदवारी देण्याचे मान्य करावे, कदाचित एकाच घरात सारे पदरात पडले तर धोत्रेंच्या मनातले कदाचित रणजित पाटलांविषयीचे जळमट नक्की दूर होईल….

अवदसा कशी आठवते त्यावर अकोला जिल्ह्यातील भाजपा नेते हे उत्तम उदाहरण, खासदार संजय धोत्रे या जिल्ह्यातले अतिशय प्रभावी नेते, थेट प्रकाश आंबेडकरांना कायम पुरून उरलेले. धोत्रे यांनी राज्यमंत्री पाटलांना सोबतीला घेऊन एकत्र प्रगतीची मोट बांधली असती तर येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत भाजपा हमखास विजय प्राप्त करून मोकळी झाली असती दुर्दैवाने धोत्रे यांनी पक्षाचे हित बघितले नाही, मोठे  नुकसान त्यातून भाजपाचे होते आहे आणि हि ताकद घेऊन जर स्थानिक जे म्हणताहेत, धोत्रे आणि कंपू पक्ष सोडून बाहेर पडले तर भाजपाचे तेथे काही खरे नाही…

क्रमश:


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *