उद्धवसेना २ : पत्रकार हेमंत जोशी

उद्धवसेना २ : पत्रकार हेमंत जोशी 

महाराष्ट्रातल्या अजितदादा पवारांसारख्या बहुसंख्य नेत्यांच्या बाबतीत त्यांना तंतोतंत लागू पडणाऱ्या माकडाच्या कथेने पुढल्या लिखाणाची सुरुवात करतो. एक राजा असतो त्याच्या सभोवताली अनेक असंख्य खुशमस्करे जमा झालेले असतात, ते इतरांना हाडतूड करतात पण राजाला सतत खुश ठेवतात. खोट्या माहिती पुरवून सबकुछ अलबेल, असे खोटे खोटे सांगून राजाची सतत दिशाभूल करून त्याला कायम अडचणीत आणण्याचे काम करीत असतात. कालांतराने राजाच्या ते लक्षात आल्यावर तो त्या सर्वांना दूर करतो आणि बोगस माणसे जवळ येणार नाहीत याची काळजी घेण्यासाठी एका माकडाला जवळ करतो. राजाला त्रास होईल असे काहीही दिसले घडले कि हे धष्ट्पुष्ट माकड अंगावर धावून जाते, त्यामुळे राजाचा त्रास कमी होतो, राजाची ताकद पाठीशी असल्याने हे माकड एवढे ताकदवान ठरते कि एकदा एक रानडुक्कर राजाच्या अंगावर धावून आल्यानंतर हे माकड जीवाची पर्वा न करता त्या रानडुकराला ठार मारते. राजा ते बघून खुश होतो मग त्या माकडाला कायमस्वरूपी पिंजऱ्याबाहेर काढून थेट आपल्या निवासस्थानी, महालातच आणून ठेवतो, त्या माकडाला कुटुंब सदस्य म्हणून महत्व द्यायला लागतो…


एक दिवस मात्र नको ते घडते, राजा निद्रिस्त असतांना एक माशी राजाच्या नाकावर बसते, ते बघून माकडाची सटकते, वरून त्याला राजास हेही दाखवून द्यायचे असते कि मी एकमेव कसा तुमच्याशी एकनिष्ठ, मग तो जवळ पडलेली राजाचीतलवार उचलतो आणि माशी उडविण्यासाठी तिच्यावर थेट वार करतो पण घडते भलतेच, राजाचेच नाक कापल्या जाते. राजाला त्यादिवसापासून बाहेर तोंड काढणे, तोंड दाखविणे देखील मुश्किल होते. नेते हे राजासारखेच असतात पण मंत्री असतांना त्या माकडासारखी अजितदादांसारखे नेते नको ती माकडे जवळ बाळगतात, काही पुण्यातले, काही कोकणातले, काही विदर्भातले, काही खान्देशातले, अशी विविध माकडे अजितदादांनी मंत्री असतांना जवळ बाळगलीत, पुढे स्वतःची माती करून घेतली ती आजतागायत, आता हळूहळू ते स्वतःला सावरताहेत तो भाग वेगळा पण अशा जवळ बाळगलेल्या माकडांनीच त्यांचे नुकसान केले, दादांना नको ती कामे करायला लावून प्रसंगी त्यांना तुकडा मिळवून दिला आणि या माकडांनी मलिदा दादांच्या नकळत स्वतः हपापला…


नेता मग ते उद्धव ठाकरे असोत कि देवेंद्र फडणवीस, या मंडळींनी सभोवताली ना खुशमस्करे बाळ्गावेत ना अशी माजलेली बिनडोक माकडे, त्यातून प्रचंड राजकीय नुकसान होते. माकडे मग ती कोणत्याही स्वरूपाची असतात हे नेत्यांनी कायम ध्यानात घ्यावे म्हणजे दुसऱ्या फळीतले नेते असतात, दलाल असतात, अधिकारी असतात, पत्रकार असतात, गम्मत म्हणून सांगतो, त्या राधाकृष्ण विखे पाटलांनी देखील आपल्या विधान भवनातील कार्यालयात एक काळ्या रंगाचे घाणेरडे वादग्रस्त तोडपाणी करणारे भ्रष्ट माकड पाळले आहे. हे माकड मला कायम एक तर पंचतारांकित हॉटेल मध्ये राहतांना दिसते आणि देशात किंवा परदेशात देखील विमानातही थेट बिझिनेस क्लासने प्रवास करतांना दिसते, बदनाम मात्र अनेकदा विखे पाटील होतात. तिकडे विधान परिषदेतील धाडसी विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे जेव्हा आमच्यातले ‘ माकड पत्रकार ‘ जवळ बाळगून मोकळे होतात तेव्हा त्यांना हेच सांगणे असते, स्वतःचे नाक कापून घेऊ नका. २८ मार्च रोजी म्हणजे बजेट अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उद्धव ठाकरे विधान भवनाशेजारी असलेल्या शिवालयात अडीच तास ताटकळत बसून देखील त्यांची मुख्यमंत्र्यांशी साधी भेट होत नाही, त्यात चूक कोणाची पण नाव उद्धव यांचे खराब होते किंवा त्यातून कदाचित फडणवीस आणि ठाकरे यादोघांचे आपापसात गैरसमज होऊ शकतात, असे नाक कापण्या सारखे गंभीर प्रकार नेमके कोणकोणत्या माकडांमुळे घडले किंवा घडतात त्यावर ठाकरे आणि फडणवीस दोघांनीही वेळीच सावध होऊन मनस्ताप देणार्यांपासून कायम दूर राहावे, असे त्यांना मनापासून सांगावेसे वाटते…


एकनाथ शिंदे असोत कि दिवाकर रावते, दीपक केसरकर असोत कि गिरीश बापट, विष्णू सावरा असोत कि चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार असोत कि राम शिंदे, संभाजी निलंगेकर असोत कि थेट मुख्यमंत्री कार्यालय, शालिनी शालिनी करीत माकडचाळे करणारे खुशमस्करे हे तुम्हाला तेवढे खुश ठेवतात पण आपल्या माकडचाळ्यांनी इतरांना त्रास देतात, जनतेच्या हातातले लोणावळ्याच्या रस्त्यावर उभे राहणाऱ्या माकडांसारखे या सामान्यांच्या हातातले हिसकावून घेतात, स्वतः फस्त करतात. येथे मेहतांसारख्या सेना, भाजपा आणि मित्र पक्षांमधल्या चार दोन मंत्र्यांची नावे यासाठी टाकली नाहीत कारण हे मंत्रीच दरदिवशी माकडचाळे करून सरकार अडचणीत आणताहेत आणि तीच वस्तुस्थिती आहे. या राज्यात जिकडे पाहावे तिकडे त्या राजाने बाळगले होते तशा माकडांची संख्या फार मोठी आहे, अत्र तत्र सर्वत्र आहे….

क्रमश:


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *