घोळात घोळ : पत्रकार हेमंत जोशी

घोळात घोळ : पत्रकार हेमंत जोशी 

एखाद्या तरुणीचं ज्याच्यावर मनापासून प्रेम असते खडूस बाप तिचे त्याच्याशी लग्न न लावून देता भलत्याच तरुणाशी लग्न लावून मोकळा होतो आणि ज्याच्याशी लग्न लागले तो एवढा नालायक कि मधुचंद्राच्या रात्री तो भरपेट दारू ढोसून येतो वर तिच्यासमोरच घुटका चोळून मोकळा होतो, राज्यातल्या जनतेचे सध्या अशा दुर्दैवी तरुणीसारखे झाले आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस जनतेच्या मनातून उतरलेली होती निदान पुढली पाच वर्षे त्यांनी सत्तेत बसता काम नये अशी तजवीज चाणाक्ष मतदारांनी करून ठेवलेली असतांना फडणवीस व ठाकरे यांचे बिनसल्याने फायदा पूर्वीच्या आघाडीला झाला. लोकांची अजिबातच इच्छा नसतांना त्यांच्याकडे सत्ता आली, काँग्रेसी विचारांचे नेते कसे गेंड्याच्या कातडीचे असतात ते लगेच साऱ्यांच्या लक्षात आले म्हणजे ज्यांना अजिबात मंत्री करता कामा नये त्यांनाच म्हणजे डाकुछाप वृत्तीच्या बहुसंख्य मंडळींना शरद पवारांनी आणि काँग्रेसने पुन्हा संधी दिली मंत्री केले, ठाकरे यांनी देखील नेमकी तीच चूक केलेली आहे चुकीच्या बहुसंख्य मंडळींना मंत्री केले आहे…

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे अलीकडले सारे निर्णय सुनियोजित होते त्या दोघांनीही  कोणताही निर्णय अजिबात अविचाराने घाई गडबडीत विचार न करता अविचारी घेतलेला नाही. गरिबाचे बाप व्हायचे कि श्रीमंतांचे पोर व्हायचे अशी परिस्थिती जेव्हा पवारांच्या बाबतीत निर्माण झाली म्हणजे शिवसेनेबरोबर जायचे कि मोदी यांना सहकार्य करून मोकळे व्हायचे अशी परिस्थिती जेव्हा निर्माण झाली तेव्हा थंड डोक्याने आणि बेरकी मनाने डोक्याने कायम निर्णय घेत आलेल्या पवारांनी गरिबाचे बाप होणे पसंत केले कारण रिमोट कंट्रोल आता त्यांच्या संपूर्ण हाती आहे आणि हेच पवार जर मोदी यांना साथ व साद देऊन मोकळे झाले असते तर तेथे सबकुछ मोदी असतात शरद पवार हे इतर घटक पक्षाचे नेते जसे रांगेत निमूटपणे उभे असतात तेच नेमके शरद पवार यांचे झाले असते, त्यांचाही रामदास आठवले झाला असता आणि पवार हे खमके नेते न होता नेमके कवी म्हणून गाजले नवजोए असते. रांगेत उभे असलेले शरद पवार त्यांना व्हायचे नव्हते म्हणून पवारांनी फार मोठी रिस्क घेतली, मोठा पंगा मोदी यांच्याशी घेतला पुढे त्याचा मोठा फायदा त्यांना झाला आता राज्याचा रिमोट कंट्रोल केवळ त्यांच्या हाती आहे एवढेच काय उद्धव देखील त्यांच्या शब्दाच्या बाहेर नाहीत…

शरद पवार मोठी राजकीय लढाई केवळ सहा महिन्यांच्या कालावधीत जिंकलेले आहेत त्यांनी राज्याच्या आणि देशाच्याही नेतृत्वाला खतरनाक  राजकीय खेळी खेळून मोठा झटका दिला आहे.  राज्याच्या बाबतीत राजकीय भाष्य करायचे झाल्यास भाजपा निदान आजतरी दहा वर्षे मागे गेली आहे त्यांना पुढली दहा वर्षे या राज्यात सत्ता मिळणार नाही अशा अनेक तजविजी पवारांनी मोठ्या खुबीने करून ठेवलेल्या आहेत. सत्ता हे असे व्यसन आहे ते न सुटण्यासाठी नेता काहीही करू शकतो, सत्तेचं गणित या महाआघाडीला जमले असल्याने त्यांच्यात वाद होतील वाद भांडणे आणि कटकटीतून त्यांच्यातल्या एखादा पक्ष बाहेर पडून त्याचा फायदा भाजपाला होईल हे सारे निदान आज तरी मुंगेरीलाल के सपने मला वाटतात. अत्यंत महत्वाचा मुद्दा असा कि अनेकांना वाटते उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचे नव्हते तशी परिस्थिती निर्माण झाली आणि ते मुख्यमंत्री झाले, अनेकांच्या या म्हणण्याला काहीही अर्थ नाही. अहो, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी का उद्धव यांची ती धडपड होती, अजिबात नाही. उद्धव यांचेही सारे काही दूरदृष्टी ठेऊन घेतलेले निर्णय असतात, एवढे ते मुरलेले राजकारणी आहेत त्यामुळे राज्यात अचानक घडले आणि उद्धव मुख्यमंत्रीपदाच्या बोहल्यावर चढले या तुमच्या म्हणण्याला अजिबात अर्थ नाही….

जाता जाता : काल म्हणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात एकाला मिरगी आली, फिट आली पण एकानेही त्याच्या नाकाला कांदा हुंगला नाही शेवटी कोणीतरी चप्पल हुंगवली तेव्हा तो माणूस

शुद्धीवर आला…

तूर्त एवढेच : हेमंत जोशी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *