पवारांचे योग आणि भोग : भाग २: पत्रकार हेमंत जोशी

पवारांचे योग आणि भोग : भाग २: पत्रकार हेमंत जोशी 

सोशल मीडिया फेसबुक आणि वृत्तपत्राच्या माध्यमातून जगातल्या लाखो वाचकांपर्यंत माझे लिखाण जेव्हा पोहोचते विविध बऱ्यावाईट प्रतिक्रिया त्यावर लगेच माझ्यापर्यंत पोहोचतात, ज्या मला डिलिट करणे आवडत नाही कारण माझ्या भूमिकेशी सारेच कसे सहमत असावेत त्यामुळे टीका मग ती कितीही तिखट जहाल असली तरी सहन करण्याची माझी तयारी असते. चेहरा आणि मुखवटा यापद्धतीने वास्तविक मीडियाने कधीही वागणे लिहिणे बोलणे योग्य नाही, नसते. सारे काही स्पष्ट असावे लागते पण तसे फार कमी घडते, मीडिया मध्ये ढोंग अधिक असते. माझी भूमिका कट्टर हिंदू अशी असल्याने फडणवीस सरकारला नक्की झुकते माप दिल्या जाते पण त्यांचे सारेच सहन करायचे असे अजिबात नाही, पुढल्या विधानसभेला ते तुमच्या लक्षात येईल. एक संधी त्यांना देणे माझे काम होते म्हणून अनेकदा फडणवीस मंत्रिमंडळाला गुणदोषांसहित स्वीकारले…


१९८० ते २०१९ एकही हिवाळी अधिवेशन मी सोडले नाही आणि मंत्रालयात देखील नियमित जाणेयेणे असल्याने तेथले सारेच बारकावे जसेच्या तसे लक्षात ठेवणे शक्य झाले. एवढेच खात्रीने सांगतो आजतागायत जे जे मंत्री मंडळ अस्तित्वात आले सर्वसामान्य जनतेची मंत्रालयातली जी गर्दी फडणवीस मंत्रिमंडळाने बघितली त्यात सातत्य दिसले तसे मी आजतागायत कधीही एकही मंत्रिमंडळादरम्यान बघितलेले नाही. त्या त्या मंत्रिमंडळात अमुक एखाद्या मंत्र्या कडे जमणारी गर्दी मी नक्की बघितलेली आहे म्हणजे रामदास आठवले गोपीनाथ मुंडे मनोहर नाईक गणेश नाईक बॅरिस्टर अंतुले विलासराव देशमुख शरद पवार इत्यादी त्या त्या वेळेच्या मंत्र्यांकडे मुख्यमंत्र्यांकडे लोकांची मोठी गर्दी होत असे पण एकाचवेळी अख्ख्या मंत्र्यांसभोवताली जमणारी गर्दी हे मात्र पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस व त्यांच्या मंत्र्यांकडे बघायला मिळाले येथेही काही मंत्री अपवाद आहेत पण प्रमाण अगदी कमी, माझे खुश होणे आपसूकच आहे कारण जेथे सर्वसामान्य खुश तेथे आपण खुश होतो, आनंद मिळतो…


काल परवा रयत शिक्षण संस्थेच्या कुठल्याशा कार्यक्रमासाठी शरद पवार श्रीरामपूर येथे गेले असतांना त्यांनी तेथे घेतलेल्या पत्रकारपरिषदेत विचारलेल्या एका साध्या प्रश्नावरून त्यांचे आयबीएन लोकमतच्या प्रतिनिधींशी वाजले. सदर प्रतिनिधीने त्या 

ठिकाणी पवारांनी वारंवार सांगूनही त्यांची माफी तर अजिबात मागितली नाहीच उलट त्याने न घाबरता पवारांशी वाद घालणे सुरु ठेवले. आता आणखी एक प्रसंग सांगतो, फार वर्षांपूर्वी याच शरद पवारांनी त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे नागपूरला अधिवेशन घेतले होते त्यावेळी तेथे थेट अधिवेशनादरम्यान आयोजित पत्रकारपरिषदेत मी देखील होतो,पत्रकारपरिषदेत योगायोगाने लोकमतच्याच राही भिडे यांनी कुठलासा खोचक प्रश्न त्यांना जेव्हा विचारला होता त्यावेळी पवार भिडे यांच्यावर असे काही भडकले कि भिडे यांना दरदरून घाम फुटला होता. श्रीरामपूरला ते घडले नाही कारण पवारांचे पूर्वीसारखेमहत्व आणि दरारा न राहिल्याने जो त्यांनी स्वतःच्या कर्मांनी घालविल्याने त्यांचे आता जाळ्यात अडकलेल्या सिंहासारखे झालेले आहे म्हणजे कोणीही यावे आणि सिंहाला तोंडावर खिजवून वाकुल्या दाखवून पुढे निघून जावे…


श्रीरामपूरच्या त्या पत्रकारपरिषदेत पवारांच्या शेजारी दिवंगत गोविंदराव आदिक यांचे चिरंजीव अविनाश आदिक बसलेले होते जे नक्कीच पवारांची हि फजिती अवस्था बघून मनातल्या मनात हसले असतील सुखावले असतील कारण ज्या कारणावरून एकदा गोविंदराव आदिक माझ्याकडे रडले होते ते दुःख ती सल त्यांनी बरोबरीला आलेल्या आपल्या या लाडक्या लेकाला नक्कीच सांगितलेली असेल. गोविंदराव मला म्हणाले, हेमंत, मी जर पवारांच्या मोहाला बळी पडून काँग्रेस सोडली नसती तर आज या राज्याचे मुख्यमंत्री होण्याचे माझे स्वप्न शंभर टक्के पूर्ण झाले असते. पण मैत्रीला मी जागलो पण पवारांनी मात्र मित्राचाच गळा कापला, राजकारणात मला बाजूला सारून माझा अक्षरश: कचरा केला. पुढे गोविंदराव फार जगले नाहीत, लवकर गेले. पवार कधी फार काळ कोणाचे झाले नाहीत आता पवारांचे फार कोणी उरले असे वाटत नाही, दिसत नाही. असे अर्थात घडायला नको होते. पवारांच्या वाट्याला हे असे यायला नको होते, जे आज घडते आहे…


मित्राने पाठविलेल्या या चार ओळी हि चारोळी, खास तुमच्यासाठी, 

वाड्यावरील घड्याळाचे 

टोले आता पडत नाहीत,

आवारातील गर्दीच्या खुणा 

आता दिसत नाहीत, 

आतापर्यंत जवळ होते 

तेही दुरावून गेले…

जाणते पणी डावपेच केले 

सारे आता अंगलट आले…

तूर्त एवढेच : हेमंत जोशी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *