राज्यात देवेंद्र देशात नरेंद्र भाग २ : पत्रकार हेमंत जोशी

राज्यात देवेंद्र देशात नरेंद्र भाग २ : पत्रकार हेमंत जोशी 

जोशी आडनावाला परंपरेला शोभणारे भविष्य येथे वर्तवितो कि एक दिवस देवेंद्र मुंबईतून दिल्लीत जातील, पुढली विधानसभा निवडणूक लागण्याआधी शक्यतो ते भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीयध्यक्ष असतील समजा हे पटकन झटकन घडले नाही तर ते देशाचे अर्थमंत्री असतील, आणि तो दिवस फार दूर नाही, येणारी नवी विधानसभा संपण्याआधीच हे घडलेले असेल अर्थात पुढल्या महिन्यातले या राज्याचे ते नवे मुख्यमंत्री असतील हे तुम्हाला सांगणे म्हणजे लताबाईंना गाता येते हे आशाबाईंच्या कानात सांगण्यासारखे किंवा शार्दूल बायस याने अनेकांना फसविले आहे हे उद्योगपती के के अग्रवाल यांना कानात जाऊन सांगण्यासारखे….


देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय वाटचालीची २७-२८ वर्षे पूर्ण झालीत हे त्यांच्याकडे बघून अजिबात खरे वाटत नाही, जो माणूस पवारांना किंवा राज्यातल्या किंवा त्यांच्याच पक्षातल्या ताकदवान नेत्यांना लीलया चारी मुंड्या चित करून अंगाला साधा ओरखडा किंवा धूळ देखील लागू न देता पुन्हा पुढल्या मोहिमेला हात घालतो, नवख्याला वाटावे फडणवीस हे या राज्यातले सर्वाधिक वयस्क आणि सर्वाधिक अनुभवी नेते असावेत. अर्थात देशसेवा हेच जीवन मानणार्या नेत्याला अनुभवाची जेमतेम वर्षे देखील पुरेशी ठरतात, २७-२८ वर्षे मग त्यामानाने फार मोठे पर्व आहे असे वाटायला लागले आहे. अनेक आमदार मंत्री नेते आम्ही या मुंबईत वावरतांना बघतो, मंत्रालयात किंवा विधानभवनात इकडून तिकडे फिरतांना बघतो पण जवळून गेले तरी ते ओळखीचे नसतात, राजकीय पत्रकारितेत असूनही, असे अनेक मंत्री आसपास उभे असले तरी त्यांना ओळखणे कठीण असते कारण ते लोकांशी मला वाटते सतत लपाछपीचा खेळ खेळत असतात म्हणजे जनता त्यांना भेटायला आली कि हे त्यांच्यापासून दूर पळतात किंवा लपून तरी बसतात…


फडणवीसांच्या बाबतीत असे कधीही घडलेले बघितले नाही कि अमुक एखादा फक्त काही देणारा म्हणजे देवाणघेवाण करणारा माणूस आला कि त्याला पटकन समोर येऊन मिठीत घेतात आणि सामान्य माणूस आला कि साहेब वामकुक्षी घेताहेत त्यांची माणसे बाहेरच्या बाहेर सांगून मोकळे होतात. मुख्यमंत्री या नात्याने त्यांना सर्वसामान्य लोकांना भेटताना अनेकदा काही मर्यादा पाळाव्या लागतात पण मुख्यमंत्री सर्वसामान्य माणसापासून दूर पळताहेत आणि सामान्य माणूस त्यांना शोधून काढण्यासाठी त्यांच्या मागे धावतो आहे असे ना कधी घडले ना कधी घडेल. सतत कायम लोकांमध्ये मिसळणारा हा असामान्य मुख्यमंत्री. आमदार झाले नामदार झाले पण त्यातून नेमके काय मिळविले हा प्रश्न बहुतेक आजी माजी आमदार नामदारांसमोर असतो.कारण त्यांना जे काय जास्तीत जास्त करायचे असते ते प्रामुख्याने त्यांच्या कुटुंबासाठी त्यांना करायचे असते, मिळवून ठेवायचे असते, येथे मात्र तसे अजिबात नाही, अख्खे राज्य हेच आपले कुटुंब मानणार्या मुख्यमंत्र्यांना तुम्ही हो आमच्यासाठी काय केले, विचारायचा अवकाश, तुम्ही थकून ऐकून झोपून जाल पण फडणवीसांनी केलेल्या लोकोपयोगी कामांची यादी संपता संपणार नाही…


अतिशय सूक्ष्म निरीक्षणातून हे सांगतो कि राजेंद्रकुमार अभिनयात दिलीपकुमारची नक्कल करायचा. मनोजकुमार किंवा त्यावेळेच्या अन्य अनेक अभिनेत्यांचे नेमके तेच होते ते बहुदा दिलीपकुमारची नक्कल करायचे येथे यादेशात मला वाटते आपले 

मुख्यमंत्री फडणवीस अनेकदा किंवा विविध वागण्यातून किंवा धडाकेबाज पण अभ्यासू निर्णय घेतांना ते हुबेहूब नरेंद्र मोदी यांची थेट नक्कल करतात असे वाटते, ते मलाही कदाचित तुम्हालाही जाणवत राहते, अर्थात देवेंद्र यांना त्यांच्या अगदी तरुण वयापासून म्हणजे ते २२ वय असतांना जेव्हा पहिल्यांदा नगरसेवक झाले तेव्हापासून मी बघत आलोय त्यामुळे हेही शंभर टक्के माझे सांगणे खरे नाही कि ते प्रत्येक बाबतीत मोदीजींची नक्कल करतात कारण अगदी तरुण वयापासून त्यांनी त्यांच्या वागण्याची बोलण्याची निर्णय घेण्याची एक स्टाईल डेव्हलप केलेलीच आहे पण त्यात मोदींची काही बाबतीत नक्कल करणे, त्यातून अभिनयातल्या अमिताभसारखे त्यांचे राजकीय वर्तुळातले सर्वगुणसंपन्न नेतृत्व आत्तापासूनच घडले आहे, तयार झाले आहे असे मला सतत त्यांच्याकडे एकटक बघतांना वाटत राहते…


आता एका नाजूक विशेषतः भाजपा कार्यकर्त्यांना किंवा संघ स्वयंसेवकांनाही अस्वस्थ करणाऱ्या मुद्द्याकडे मी वळतोय. या मुद्दयांवर यासाठी येथे काही सांगायचे आहे कारण ते मुख्यमंत्र्यांशी संबंधित आहे, फडणवीसांच्या बाबतीत त्या मुद्दयांवर त्यांच्याच पक्षातले किंवा संघातले नाराज असावेत किंवा आहेत म्हणून हे नेमके कसे घडले का घडले सांगतो. हे बघा जेव्हा फडणवीस कोणतीही महत्वाची राजकीय भूमिका घेतात तेव्हा ते शंभर टक्के मोदी, शाह यांच्याशी आणि चंद्रकांत पाटलांसारख्या संघटनेतल्या मात्र या राज्यातल्या काही परिपकव नेत्यांशी आधी सखोल चर्चाच करतात नंतर ते निर्णय घेतात. मनात आले आणि निर्णय घेतले असे कधीही त्यांच्याबाबतीत घडत नाही, नेमकी मला माहिती आहे, म्हणून येथे हे सांगतो आहे….


अलीकडे विधानसभा निवडणूक लागण्यापूर्वी केवळ काही काळ आधी फडणवीसांनी राज्यातले विदर्भ सोडून अनेक विरोधी पक्षातले नेते त्यांच्याकडे आणले, घेतले त्यावर देखील त्यांनी सारे काही नियोजनबद्ध केलेले आहे हे म्हणजे असे नव्हते कि रेल्वेत प्रवास करतांना समोरची मुलगी आवडली आणि काहीही माहिती न घेता तिला आय लव्ह यु म्हणून टाकले, अजिबात असे घाईगर्दीने हे घडलेले नाही विशेष म्हणजे आपला मूळ कार्यकर्ता नेता आणि स्वयंसेवक नाराज होणार नाही त्याच्यावर अजिबात अन्याय होणार नाही त्याची पुरेपूर कोल्हापूर काळजी फडणवीसांनी घेतलेली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा अन्य पक्षांना त्यातील मुजोर जातीयवादी थर्डग्रेड नेत्यांना यशस्वी सामोरे जाण्यासाठी, निवडणुका जिंकण्यासाठी पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी त्यांना याबाबतीत मोदी यांची नक्कल करणे अत्यावश्यक होते ते त्यांनी केले…


यापूर्वी देखील मी लिहून ठेवलेले आहे कि या राज्यात जेथे जेथे भाजपा काहीशी थोडीशी कमकुवत आहे त्यांना वाटत होते तेथेच त्यांनी बाहेरच्या नेत्यांना आत घेतले. आलेले अनेक नेते जेथे शरद पवारांचे किंवा काँग्रेसचे झाले नाहीत ते आपले कधीही कायमस्वरूपी नाहीत हे आपल्याला कळते आणि फडणवीसांना काळात नाही असे नक्की घडलेले नाही, त्यांना पुढला प्रत्येक धोका तंतोतंत माहित असतांना देखील त्यांनी दूरदृष्टी ठेवूनच केलेले आहे, हे ध्यानात घ्यावे. बाहेरून आलेल्या किमान २५ टक्के नेत्यांना, त्यांच्या कार्यकर्त्यांना संघ भाजपाचे महत्व कळले समजले तरी भाजपाचे ते मोठे यश आहे हे ध्यानात घ्या. विशेषतः विदर्भ सोडून काही भागात भाजपा मजबूत करणे अत्यंत महत्वाचे होते म्हणून फडणवीसांनी नेमके सल्ले घेऊन हे आक्रमक पाऊल उचलले आहे…

क्रमश: हेमंत जोशी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *