फेसबुक तुम्ही आणि आम्ही : पत्रकार हेमंत जोशी

फेसबुक तुम्ही आणि आम्ही : पत्रकार हेमंत जोशी 


बहूतेकांसाठी फेसबुक चे फॅड म्हणजे वेळ वाया घालविणे, आयुष्यातील अमूल्य वेळ खर्च करून अधोगती हाताने करून घेणे, जसे दारू सिगारेट ड्रग्स चे व्यसन लागणे म्हणजे आयुष्याचा खेळखंडोबा करून घेणे तसे एखाद्या कर्तृत्ववान व्यक्तीला मग ती स्त्री असो कि पुरुष फेसबुकचे व्यसन तसे बरबाद करणारे, महत्वाचे क्षण वाया घालविणारे. मी मात्र अशा व्यवसायात प्रोफेशन मध्ये आहे कि टवाळक्या आणि फेसबुक हे दोन्ही माझ्या व्यवसायात, प्रोफेशनमध्ये प्रचंड फायद्याचे आहे. दिवसभरात जेवढे म्हणून मला फेसबुक हाताळता येईल किंवा जेवढ्या अधिक वेळ टवाळक्या करता येतील, तेवढा अधिक फायदा मला आयुष्यात करवून घेता येईल. होय ! पत्रकारिता हा एकमेव असा प्रोफेशन आहे कि जेवढ्या ठिकठिकाणी बसून टवाळक्या करता येतील, चकाट्या पिटता येतील, फोन वर बोलता येईल, फेसबुक वर सतत चॅटिंग करता येईल किंवा त्यावर फ्रेंड्स नी टाकलेली दिलेली लिहलेली माहिती वाचता येईल तेवढा अधिक फायदा माझ्या प्रोफेशन मध्ये होतो, म्हणून मी फेसबुकवर जगभरातले मित्र जमा करतो आणि जगभरातल्या मित्रांना गाठून त्यांच्यासंगे गप्पा मारतो, वेळ खर्च करतो. अर्थात मी म्हणजे माझ्या प्रोफेशन मधले कोणीही, जेवढा आमचा जनसंपर्क मोठा तेवढा आम्हाला, आम्हा पत्रकारांना, मीडियात काम करणाऱ्यांना अधिक फायदा, हेच आमच्या धंद्याच्या यशाचे गमक आहे, गुपित आहे, सत्य आहे…सकाळी पाच वाजता झोपेतून उठल्यापासून तर रात्री ९ पर्यंत म्हणजे अंथरुणावर पडेपर्यंत आमचे हे रिकामटेकडे उद्योग सुरु असतात, म्हणून मनापासून सांगतो, ज्यांना आयुष्यभर माझ्यासारख्या चकाट्या, टवाळक्या करायच्या आहेत त्यांनी खुषाल पत्रकारितेत यावे, पैसे मिळतील प्रसिद्धी मिळेल आणि वाट्टेल तसे अख्खे आयुष्य काढता येईल, जगता येईल. पूर्वी म्हणायचे, मागता येईना भीक तर मास्तरकी शिक, मी पुढे जाऊन म्हणतो, टवाळखोरांनो पत्रकार व्हा मस्त जगा…

माझे तीन विविध नावाने फेसबुक आहे, पहिले पत्रकार हेमंत जोशी दुसरे हेमंत जोशी पत्रकार आणि तिसरे फक्त हेमंत जोशी या नावाने, पैकी नुकतेच पत्रकार हेमंत जोशी ह्या फेसबुक ने ५००० मित्रांचा म्हणजे फेसबुक फ्रेंड्स चा टप्पा पूर्ण केल्याने त्यावर यापुढे तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्टपाठवता येणार नाही, अन्य दोन पर्याय तुम्हाला अद्याप खुले आहेत…. 

आता एका महत्वाच्या मुद्द्याकडे वळतो, आम्हा जोशी कुटुंबाचा विशेषतः आमचे पत्रकारितेतले नेते कम बंधू यदु आणि माझा नागपुरातील एक नेता कम पत्रकार राजू हिंदुस्थानी अतिशय जवळचा मित्र आहे, बोलायला एकदम फटकळ, न घाबरणारा, आमच्यावर अतिशय प्रेम करणारा त्याचवळी माझ्या लिखाणावर स्पष्ट प्रतिक्रिया देणारा, अलीकडे त्याने फेसबुकवरील माझ्या लिखाणावर प्रतिक्रिया देतांना म्हटले, लिहिले कि भाऊ, तुम्हाला कधी एखाद्याविषयी चांगले लिहिणे जमत नाही का, सतत टीका करता…वास्तविक राजुच्या म्हणण्याला तितकासा अर्थ नाही, नव्हता कारण अमुक एखाद्या चांगल्या कामावर मी मनापासून तारीफही करतो पण लिखाणातून टीका अधिक होते हे राजुचे म्हणणे पटले, आणि फेसबुक विषय आठवला. विचार केला आपल्याला असंख्य फेसबुक फ्रेंड्स आहेत त्यातले बहुतेक प्रत्यक्ष जीवनातही मित्र मैत्रिणी आहेत, घनिष्ठ आहेत, जवळचे आहेत, सलोख्याचे आहेत, जिवाभावाचे आहेत, सुरुवात या फेसबुक फ्रेंड्स पासूनच केली तर, म्हणजे त्यांच्यातले जे गुण भावले तेवढे लिहून मोकळे व्हायचे, म्हणून हि लेखमाला लिहायला घेतली, जे फेसबुक फ्रेंड्स आहेत ते त्यांच्या क्षेत्रातले नामांकित आहेत जसे अमेरिकेतले प्रसाद गारखेडकर, तेथेही अगदी उघड राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला वाहून घेतलेला हा अवलिया, मला खात्री आहे, तुम्ही अमेरिकेत असतांना प्रसाद शी ओळख नसतानाहि तुम्ही त्यांच्याशी अगदी थेट संपर्क साधा, तो तुमच्या मदतीला मनापासून मनःपुर्वक मनातून धावून येईल किंवा योग्य तो सल्ला किंवा योग्य त्या माणसांशी भेट घालून देईल. अर्थात मी भाग्यवान यासाठी कि केवळ लिखाणाच्या म्हणजे पत्रकारितेच्या माध्यमातून राज्यातले देशातले जगातले हे असे दिग्गज मला ओळखतात, थोडक्यात अमिताभ बच्चनला तर सारेच ओळखतात, अमिताभने तुम्हाला ओळखायला हवे, अर्थ सरळ आहे, मी या अशा बड्या मंडळींना ओळखतो त्यापेक्षा ते मला ओळखतात, हे माझे भाग्य, सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या खेड्यातून आलेल्या सामान्य कुटुंबातून आलेल्या या हेमंत जोशीला तुम्ही लाखो ओळखता, माणसाला आयुष्यात आणखी काय हवे…?  मित्र जोडणे तसेही फारसे कठीण नसते, तुमची नजर आणि नियत साफ असली कि कौटुंबिक मित्र आपोआप मिळतात, एकदा एखाद्याला मित्र म्हटले कि गुण दोषांसहित त्यांना स्वीकारायचे असते, त्यांच्या पाठीमागे देखील त्यांचे गुणगान तेवढे गायचे असते म्हणजे मित्र आयुष्याच्या अखेरपर्यंत टिकून राहतात. एकदा कुत्र्याच्या आणि गाढवात पैज लागत्ते कि, गावापलीकडल्या महालातील सिंहासनावर बसेल तोच त्या सिंहासनाचा मानकरी ठरेल. अर्थात कुत्र्याला वाटते मीच जिंकेन कारण गाढवापेक्षा मी जोरात धावू शकतो. शर्यत सुरु होते पण नेमके उलट घडते, गल्लीतले कुत्रे त्याच्या अंगावर धावून येतात, त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करतात, कसाबसा कुत्रा जेव्हा सिंहासनाजवळ पोहोचतो, बघतो तर काय, गाढव तेथे आधीच विराजमान झालेले असते. मानकरी ठरलेले असते. कुत्रा मनाशी म्हणतो, कि जर माझ्याच लोकांनी मला मागे ओढले नसते तर आज गाढव सिंहासनावर आरूढ झाले नसते, बघा, गाढवही जिंकले. मित्रहो, जोडलेल्या मित्रांशी, असे आपापसात कुत्र्यासारखे वागू नका….

क्रमश :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *