दोन मित्र दोघेही गेले १ : पत्रकार हेमंत जोशी

दोन मित्र दोघेही गेले १ : पत्रकार हेमंत जोशी 

दोघेही एकमेकांचे जिवाभावाचे मित्र, एकमेकांशिवाय त्यांचे पान देखील हलत नसे त्यातले एक उद्योगपती तर दुसरे पक्के राजकारणी, दोघांचे स्वभाव भिन्न म्हणजे त्यातले जे वयाने मोठे होते ते काहीसे अबोल आणि शांत थोडक्यात त्यांच्या डोक्यावर कायम बर्फ आणि जिभेवर साखर, दुसरे वृद्धावस्थेतही एखाद्या नटखट मस्तीखोर तरुणासारखे प्रचंड उत्साही, बोलघेवडे आणि कायम लोकांच्या घोळक्यात अडकलेले, दोघेही स्वभाव आणि जीवनपद्धतीच्या बाबतीत परस्पर विरुद्ध टोकाचे पण त्यांची मैत्री दोस्ती यारी नजर न लागो अशी अगदी दोघांच्याही शेवटच्या श्वासापर्यंत, दोघेही वर्षाच्या अगदीच सुरुवातीला जणूकाही अगदी ठरवून एकत्र वर स्वर्गात गेले, त्यातले पहिले म्हणजे सुप्रसिद्ध उद्योगपती दत्तात्रय म्हैसकर ३ जानेवारीला गेले आणि दुसरे या राज्याचे मान्यवर नेते वसंत डावखरे ४ जानेवारीला गेले. वसंत डावखरे जाणारच होते पण त्यांचे आज उद्या आज उद्या असे गेल्या काही महिन्यांपासून चालले होते, ते वर्षभरापासून खूपच आजारी होते त्यामुळे त्यांचे हे जाणे तसे आम्हा सर्वांना अपेक्षित होते पण दत्तात्रय म्हैसकर मात्र अगदी चालता बोलता गेले, आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत ते कामातच होते आणि काम करता करताच गेले, ३ तारखेला दुपारपर्यंत त्यांनी म्हैसकर फौंडेशनचे कामकाज बघितले, घरी आले, काही तास फक्त श्वसनाच्या त्यांच्या नेहमीच्या त्रासाने व्याकुळ झाले आणि गेलेही, अर्थात लागोपाठ गेले दोघेही, एक दिवस आधी म्हैसकर आणि लगेच दुसरे दिवशी डावखरे, सर्वांच्या मनाला कायमची हुरहूर लावून….


मी म्हैसकरांमधल्या वैयक्तितक आयुष्यात प्रेमळ आणि व्यवसायात मात्र अतिशय कणखर असलेल्या उद्योगपतीला आणि डावखरेंमधल्या नटखट चंचल प्रेमळ दिलदार कष्टाळू तडफदार दमदार नेत्याला अनेकदा अगदी जवळून बघितले आहे, अनुभवले आहे, त्यामुळे त्या दोघांवर खूप काही लिहिता येईल असे खूप खूप, अति प्रचंड मटेरियल माझ्याकडे आहे, त्यातले जास्तीत जास्त येथे जसेच्या तसे मला मांडायचे आहे. अत्यंत अत्यंत अत्यंत महत्वाचे म्हणजे माझी दत्तात्रय म्हैसकर यांच्याशी पहिली ओळख खुद्द वसंत डावखरे यांनीच विधान भवनात विलासराव देशमुखांच्या दालनात करवून दिली होती, केवढा हा विचित्र योगायोग आज त्या दोघांच्या मरणावर मला येथे लिहायचे आहे, डोळ्यात पाणी तर दाटून आलेच आहे, त्या सुमधुर आठवणींनी….


एकच सांगतो, एकदा मी, वसंत डावखरे आणि दत्तात्रय म्हैसकर सिंगापोरला मिफ्ता कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र होतो, तेथे गप्पांच्या ओघात म्हैसकरांना म्हणालो, तुम्ही म्हणजे त्या अवतार सिनेमातले राजेश खन्ना, त्या चित्रपटातला हिरो निवृत्तीच्या वयात आपले वैभव पुन्हा उभे करतो, तुमचेही तेच, म्हणजे आयआरबी हि पब्लिक लिमिटेड कंपनी, ती मोठ्या मुलाच्या म्हणजे वीरेंद्रच्या ताब्यात दिल्यानंतर धाकट्या जयंतसाठी देखील उद्योगाचे साम्राज्य उभे करतांना तेवढ्याच म्हणजे अगदी पूर्वीच्या उत्साहाने उभे राहिलात आणि एमईपी कंपनी देखील ‘ पब्लिकलिमिटेड कंपनी ‘ म्हणूनच थेट नावारूपाला आणली त्यावर ते फक्त त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने गालातल्या गालात हसले आणि विषय बदलवून पुढल्या गप्पात रमले, ते स्वस्तुतीत फारसे रमायचे नाहीत, ते दोघेही खूपच वर्कोहोलिक होते म्हणजे म्हैसकर आणि डावखरे देखील, दोघात हे एक साम्य होते. अर्थात उद्योगाचे जाळे उभे करतांना दत्तात्रय म्हैसकरांच्या दोन्हीही कर्तबगार मुलांची नावे येथे घेणे क्रमप्राप्त ठरते, व्यवसायात दोघेही वडिलांच्या नक्कीच काही पावले पुढे आहेत, मोठे वीरेंद्र आणि धाकटे जयंत हे दोघेही आपापल्या जागी अत्यंत चोख कामगिरी ती देखील दत्तात्रय म्हैसकर यांच्या हयातीतच बजावून मोकळे झाले आहेत, एवढेच सांगतो, सिनियर म्हैसकर खूप समाधानी होते, त्यांनी खूप पुण्य जमा करून ते वर गेले, थेट स्वर्गात पोहोचले, अधेमधे त्यांना कोणीही नक्की अडविले नसेल.

क्रमश:


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *