इतना सन्नाटा क्यो है भाई : पत्रकार हेमंत जोशी


इतना सन्नाटा क्यो है भाई : पत्रकार हेमंत जोशी 

खूप दिवसांनी मंत्रालयात पाय ठेवला आणि शोले चित्रपटातला तो प्रसिद्ध संवाद डायलॉग  आपोआप तोंडातून बाहेर पडला, “इतना सन्नाटा क्यो है भाई”?, जशी अख्य्या राज्याची रया  गेलेली आहे ज्याचा त्याचा चेहरा पडलेला आहे त्या देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री न  होण्याने आणि काँग्रेस राष्ट्रवादी सत्तेत अचानक बसल्याने तेच दुःखच तीच निरव शांतता स्मशानासारखी भयाणता मला मंत्रालयात जागोजागी दिसली, जणू आपल्या घरातले  कोणीतरी अचानक गेल्यासारखे ते शांत वातावरण मला तेथे आढळले. लोकांना शिवसेना सत्तेत आल्याचे  दुःख नक्की नाही पण ज्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मंत्र्यांना लोकांनी  अगदी मनातून मनापासून झिडकारले धुत्कारले होते त्यांचेच मंत्री पुन्हा  पवित्र मंत्रालयात येऊन राज्याला अपवित्र करणे जनतेला अजिबात आवडलेले नाही, सार्यांचाच मूड एकदम ऑफ आहे, पवारांनी आणि सोनिया यांनी निदान बाळासाहेब थोरातांसारख्या बऱ्यापैकी सुसंस्कृत आमदारांना मंत्री केले असते तर निदान जनतेचे काही एक म्हणणे राहिले नसते  पण हे काय केले महाआघाडीने थेट आधीच्या बदनाम करप्ट जवळपास साऱ्याच नेत्यांना  रिपीट केले, विस्तारात देखील नेमके तेच घडणार आहे, शी शी शी… 

श्रीमान उद्धव ठाकरे यांचा शपथविधी पार पडेपर्यंत महाआघाडीचा ओसंडून वाहणारा उत्साह त्यांना देखील आता झपाट्याने विकास साधायचा आहे असे दर्शवित होता म्हणजे मधुचंद्राच्या रात्री नवपरिणीत जोडप्याने जसे विविध आवाजांनी परिसर दुमदुमण्याची जी अपेक्षा असते तसे काही न घडता जर नवदाम्पत्य एकमेकांकडे पहिल्या अर्ध्या तासात पाठ करून गाढ झोपत असेल ठाकरेंच्या शपथविधीनंतर हे असेच नेमके वाटायला लागलेले आहे. अहो, आज तीन महिने झालेत, शासन प्रशासन आधी निवडणुकांमुळे आणि नंतर घडलेल्या घृणास्पद राजकीय उलाढालींमुळे तसेही ठप्प आहे ठप्प होते, एकदाचे नवे मंत्रिमंडळ निदान अस्तित्वात आल्यानंतर तरी पवारांच्या अनुभवी मार्गदर्शनाखाली तडफेने जोमाने जोराने वेगात कामाला लागायला हवे होते पण असे घडते आहे अजिबात दिसत नाही. ज्या लायक व काही नालायक मंडळींना महाआगाडीने मंत्री केलेले आहे निदान त्यांना त्यांची खाती सोपवून कामाला लागण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्र्यांनी त्वरेने देण्याची नितांत गरज असतांना केवळ मंत्रिमंडळ विस्ताराच्या नावाखाली माजलेला सावळा गोंधळ अजिबात समर्थनीय नाही… 


www.vikrantjoshi.com

अत्यंत महत्वाचे म्हणजे उद्धव ठाकरे यांना त्यांच्या कार्यालयात आणि निवासस्थानी जवळपास १४६ प्रशासकीय शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अतिशय तातडीने नेमणे गरजेचे आहे. कोणताही शासकीय अधिकारी आणि कर्मचारी त्याची बांधिलकी त्या त्या वेळेच्या मुख्यमंत्री व मंत्री कार्यालयाशी असते त्यामुळे सध्या आपला कोण आणि आधीच्या मुख्यमंत्र्याचा कोण हा जो अभूतपूर्व गोंधळ काही उद्धव यांच्या फंटर  मंडळींनी घालून ठेवलेला आहे ज्यामुळे लोकांची राज्याची कामे खोळंबलेली आहेत तसे अजिबात घडता कामा नये. अत्यंत अत्यंत महत्वाचे म्हणजे सुधीर नाईक यांच्यासारख्या मुंबई महापालिकेत गोंधळ घालणाऱ्या वादग्रस्त अधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे यांनी अजिबात आणू नये, मंत्रालयाची जर मुंबई म्यून्शिपाल्टी झाली तर त्याचे दूरवर वाईट परिणाम शिवसेनेला विशेषतः उद्धवजींना भोगावे लागतील, सेनेची मोठी बदनामी होईल. आजतरी उद्धव ठाकरे यांच्या एकंदर देहबोलीवरून आणि वागण्या बोलण्यावरून त्यांना हे राज्य खंडणीखोरांचे असे बिरुद मागे अजिबात लावून घ्यायचे नाही असे दिसते आणि हे जे दिसते आहे त्यावर उद्धव यांचे करावे तेवढे कौतुक कमी पण त्यांनी मनाशी आखलेले हे धोरण कायम टिकवून सर्वांना हवीहवीशी महाआघाडी असे चित्र निर्माण करावे एवढी त्यांच्याकडून तूर्त माफक अपेक्षा आहे, मनात आणले तर हेडमास्तर बनून पवार आणि ठाकरे ते करवून दाखवतीलही… 

तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *