वाईट वाटले : पत्रकार हेमंत जोशी

वाईट वाटले : पत्रकार हेमंत जोशी 

मला वाईट वाटलं जेव्हा नवाकोरा साबण तेही अंघोळ करता करता टॉयलेट मध्ये पडला होता, जेव्हा एका अत्यंत महत्वाच्या मीटिंग मध्ये माझ्या पॅन्ट ची झीप उघडी राहिली होती, जेव्हा माझा टॉवेल मित्र भेटीला आले असतांना त्यांना मी बाथरूम मधून बाहेर येऊन शेकहँड केला नि टॉवेल अचानक गळून पडला होता तेव्हा, हायवे वर लघवी करतांना जेव्हा पोलिसांनी हटकले होते तेव्हा, नेमके सुचत देखील नव्हते कि त्यांच्याकडे पाहावे कि खाली वाकून पाहावे तेव्हा, मला वाईट वाटले जेव्हा ऐन मंडपात माझ्या मित्राने बोहल्यावर चढण्यासाठी म्हणून नेसलेले पितांबर भावी सासूच्या समोर गळून पडले तेव्हा, मला नेहमीच वाईट वाटते जेव्हा नेमका एखादा पदार्थ मनापासून आवडलेला असतो किंवा खूप भूक लागलेली असते आणि नेमका पहिल्या दुसऱ्या घासालाच भला मोठा केस निघतो तेव्हा, अनेकदा तर हेही लक्षात येत नाही कि केस नेमका कोणाचा आहे किंवा कुठला आहे, तोंड वाकडे करणे एवढेच आपल्या हाती असते. मला वाईट वाटले जेव्हा माझा अतिशय जवळचा मित्र शेवंता मोलकर्णीशी प्रेमाने गप्पा मारत बसला असतांना अचानक त्याची संशयी बायको स्वतःच लॅच उघडून आत शिरली तेव्हा…

आणि मला मनापासून वाईट वाटले जेव्हा भाजपाने पूर्वानुभव असतांना किंवा मी त्यांना त्याची कल्पना दिलेली असतांनाही त्यांनी जेव्हा २००० दरम्यानची अवस्था ओढवून घेतली तेव्हा. त्यांना त्यांच्या नेत्यांना आणि वाचकहो तुम्हालाही सांगितले होते कि समोर शरद पवार आहेत फडणवीस किंवा भाजपा सेनेच्या नेत्यांनी अजिबात बेसावध राहता कामा नये कारण नारायण राणे मुख्यमंत्री झाले नि लगेच काही महिन्यात जेव्हा विधानसभा निवडणूक लागल्या तेव्हा देखील सेना आणि भाजपा दोघांनाही वाटायचे कि पुढल्यावेळी आपणच पुन्हा सत्तेत येणार आहोत पण तेच नेमके घडले समोर शरद पवार होते त्यानंतर पुढे सतत पंधरा वर्षे त्यांनी युतीला सत्ता दिली नाही २०१४ मध्ये युतीला सत्ता मिळाली पण आता २०१९ मध्ये तेच घडले म्हणजे शरद पवार नडले आणि त्यांनी युतीचे विशेषतः भाजपाचे वाटोळे केले. सत्तेत कदाचित उद्या शिवसेना असेलही पण उद्धव ठाकरे असोत  अथवा देवेंद्र फडणवीस, सत्तेच्या राजकारणात दोघेही आणि त्यांचे पक्ष खूप मागे पडले आहेत…

वास्तविक सेना आणि भाजपाने युती करण्याची अजिबात गरज नव्हती, दोघांनीही विधानसभा निवडणुका वेगवेगळ्या लढविणे अत्यंत अत्यंत गरजेचे होते आवश्यक होते पण ते त्यांनी केले नाही, आणि आता बसले आहेत भांडत. हे तर असे झाले कि सुस्वरूप बायकोचे नवऱ्याशी भांडण व्हावे आणि शेजारी राहणार्याने नर्वस झालेल्या शेजार्याच्या बायकोला पटवावे. दोघांनीही पार आपापले थेट वाटोळे नुकसान करून घेतले. युती केली खरी पण सेना आणि भाजपाने प्रत्येक मतदारसंघात जेथे त्यांचा विनाकारण पराभव झाला आहे तेथे प्रत्येक ठिकाणी एकमेकांचे उमेदवार पाडले, भलेही त्यांनी एकमेकांचा त्या त्या ठिकाणी निवडणूक प्रचारादरम्यान उघड किंवा जाहीर प्रसार प्रचार केला नसता तरी चालले असते पण जे घडले ते महाभयंकर घडले, एकमेकांचा प्रचार करणे तर फार दूरची गोष्ट, पण त्यांनी जे केले ते करायला नको होते, भाजपा उमेदवार कसा पडेल हे स्थानिक सेना नेत्यांनी बघितले आणि भाजपा नेत्यांनी कार्यकर्त्यांनी देखील तेच केले, त्याचा फायदा शरद पवार यांनी अतिशय खुबीने करवून घेतला. वाचक मित्रहो, अत्यंत महत्वाचे म्हणजे पवारांनी केवळ त्यांच्या पक्षाचे उमेदवार निवडून आणले नाहीत तर काँग्रेस उमेदवार निवडून आणण्यात देखील त्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली, सर्वोतपरी पवारांनी  काँग्रेसच्या नेत्याना, उमेदवारांना देखील सहाय्य केले.  एखाद्या हिंदी चित्रपटात म्हातारा अमिताभ कसा पेटून उठलेला दाखवतात, राजकारणातले यावेळचे म्हातारे पेटून उठलेले अमिताभ शरद पवार ठरले…

तूर्त एवढेच : हेमंत जोशी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *