थापेबाज मीडिया २ : पत्रकार हेमंत जोशी

थापेबाज मीडिया २ : पत्रकार हेमंत जोशी 


राज्यातले इतर सारे प्रश्न संपले आहेत या अविर्भावात सतत आठ दिवस मुंबईतल्या पाचही बातम्या देणाऱ्या प्रमुख वाहिन्या आणि या राज्यातले लोकमत, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, इत्यादी प्रमुख मराठी आणि इंग्रजी वृत्तपत्रे एकमेव बातमीवर आपले लक्ष केंद्रित करून होते, शिवसेनेचे सध्याचे काही मंत्री वगळून नव्याने इतरांना संधी, हि ती बातमी मराठी वाहिन्या आणि विविध वृत्तपत्रे घोळून घोळून दाखवून, लिहून मोकळे होत होते अगदी निर्लज्ज होऊन, कोणतेही पुरावे हाती नसतांना, गम्मत म्हणजे जे ह्या बातम्या लिहून आणि दाखवून मोकळे झाले, त्यातले कित्येक स्वतःला उद्धव किंवा आदित्य यांचे जवळचे आहोत, असे सांगून लोकांचे मनोरंजन करतात. उदाहणार्थ मुंबई मिरर मधली ह्या संदर्भातली बातमी वाचा, नेमका संदर्भ जाणकारांच्या लक्षात येईल….

महत्वाचे असे कि जर अमुक एखादी बातमी सोडणारे जर खरोखरी उद्धव किंवा आदित्य यांच्या जवळच्या मित्र, गोतावळ्यातले असतील तर सेनेतले वातावरण अस्थिर करण्यात त्यांनी अजिबात पुढाकार घेता कामा नये जसे मुंबई मिरर चा बातमीदार जर, मी आदित्यचा क्लोज फ्रेंड आहे, सांगून हवे ते साधत असेल तर शिवसेनेत खोट्या बातम्या छापल्याने अस्थिर वातावरण निर्माण होणार नाही, याचे किमान भान त्याने राखायला हवे, अर्थात येथे मुंबई मिरर हे सहज म्हणून उदाहरण दिले आहे, असे अनेक थापाडे आमच्या मीडिया मध्ये जागोजाग आहेत. लोकमत मधल्या सेना मंत्रिमंडळाला बाबतच्या बातम्या तर हसून हसून पुरेवाट करणाऱ्या होत्या. आपण मंत्रिमंडळ विस्ताराच्या थापा मारतोय, टेबल न्यूज तयार केली आहे, हे श्रीमान यदु जोशी यांच्या लक्षात आल्यानंतर, लिहिली बातमी कशी खरी आहे हे पटविण्याचा नंतर जोशी यांनी आणखी दोन वेळा प्रयत्न केला, सामान्य माणूस अशा बातम्यांना फसतात पण जाणकार मात्र या अशा खोटारड्या बातम्यांमधून नेमक्या सुपारीबाज वार्ताहराचे मूल्यांकन करून मोकळे होत असतात…..

शिवसेना मंत्र्यांमध्ये फार मोठे फेरबदल, हि थाप माझ्या माहितीनुसार सर्वात आधी सेनेत अस्थिरता निर्माण करण्यासाठी मुद्दाम मीडिया मध्ये भाजपाच्या गोटातून सोडण्यात आली, त्यानंतर हि बातमी मातोश्रीवर ज्या सेने नेत्यांची दररोजची उठबैस आहे, जवळीक आहे आणि ज्यांना सध्या असलेले जे मंत्री नको आहेत, त्यांनी हि बातमी खरी आहे, असे मीडिया मधून विचारणाऱ्यांना म्हणजे लागलेल्या आगीत अधिक तेल ओतून सांगितली, आपसूकच मंत्रिमंडळ बदलाची हि बातमी मोठ्या प्रमाणावर भडकली, पेटली आणि पुढले आठ दिवस जणू दुसरी सारी कामे संपलेली आहेत या थाटात सेनेतील बदलाच्या या बातम्या विष्ठा चघळावी तसे अनेक, विविध विरोधक चघळत होते….

बातमी दाखविणाऱ्यांचा आणि लिहिणार्यांचा केवढा मोठा आत्मविश्वास, जणू उद्धव किंवा आदित्य यांनी त्यांना आपणहून सांगितले आहे कि 

सेनेच्या मंत्र्यांमध्ये पुढल्या चारआठ दिवसात नक्की फेरबदल आहे. अमुक एखादी खोटी बातमी हॅमर करून प्रसंगी मीडिया चे अजिबात नुकसान होत नाही पण लक्षात घ्या, या अशा तद्दन थापेबाज बातम्या मधून त्या त्या राजकीय पक्षात प्रसंगी अख्य्या राज्यभर गोंधळाचे, अस्वस्थतेचे, निराशेचे वातावरण निर्मण होऊन मोठ्या प्रमाणावर त्यातून त्या त्या पक्षाची हानी होते. या अफवेमुळे राजेश क्षीरसागर यांच्यासारखे अनेक, विनाकारण मनोरथ रचण्यात गुंतलेले होते, प्रमोशन मिळणार म्हणून गुलाबराव पाटलांसारखे काही जागच्या जागी उंच उड्या मारत होते, रावते असोत कि रामदास कदम असे काही घरातले कोणीतरी गेले पद्धतीचा चेहरा करून बसले होते. हे असे घडता कामा नये, या अशा फोकनाड बातम्या सोडणाऱ्यांना सुपारीबाज म्हणतात आणि हे असे सनसनी निर्माण करणारे यथावकाश आपली विश्वासहर्ता गमावून बसतात….

मी मात्र एकमेव असा होतो, लिहून मोकळा झालो कि शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये अजिबात बदल होणार नाहीत, जेव्हा या राज्यातली अख्खी मीडिया छातीठोकपणे ओरडून सांगत होती कि बदल आहेत, मी एकमेव असा, तुम्हाला सांगून मोकळा झालो कि विस्ताराची हि बातमी अतिशय खोटी आहे, त्यावर याचठिकाणी लिहिलेला लेख आपण पुन्हा एकदा अवश्य बारकाईने वाचावा. अमुक एखाद्यासाठी सुपारी घेण्याची आमची पद्धत नसल्याने जे सत्य होते ते छापून मोकळा झालो….

अपूर्ण :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *