लाडावलेली नाही लाडके लाड : पत्रकार हेमंत जोशी

लाडावलेली नाही लाडके लाड : पत्रकार हेमंत जोशी 

प्रसाद लाड फडणवीसांचे हनुमान आहेत, बघता बघता त्यांनी हे थेट फडणवीसांकडे अंगच्या मेहनतीतून अवगत असलेल्या राजकीय कलागुणातून स्वभावातून संभाषणाच्या उत्तम अवगत लकबीतून आणि प्रचंड मेहनत करण्याच्या सवयीतून थेट जवळचा विश्वासू सवंगडी हे नाते निर्माण केले आहे. प्रसाद लाड यांचे भाजपामधले वजन, वर्षा वर असलेला त्यांचा अगदी सहज वावर म्हणजे असे नाही कि भाजपा मध्ये किंवा फडणवीसांकडे येण्यापूर्वी प्रसाद लाड नेता म्हणून झिरो होते आणि फडणवीसांनी त्यांना सवंगडी हनुमान म्हणून जवळ केले त्यातून ते अचानक मोठे झाले, प्रसिद्धीला आले. नाही, प्रसाद आधीही मोठे होते भाजपा मध्ये आले, फक्त पूर्वीपेक्षा अधिक मोठे झाले एवढेच कारण भाजपाने त्यांना काम करण्याची पक्षासाठी मनसोक्त बागडण्याची संधी दिली, लाड यांनी फडणवीसांनी दिलेल्या संधीचे सोने केले. आता हेच प्रसाद लाड तिकडे रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन इत्यादी नेते निवडणूक प्रचारात अतिव्यस्त असतांना इकडे मुंबईत भाजपा मुख्यालयात ठाण मांडून पक्ष प्रचारासाठी, विधान सभा निवडणुकीसाठी नेमके राज्यात साऱ्याच उमेदवारांना काय हवे आहे काय आवश्यक आहे जातीने राबून वरून राज्यभर वेळ मिळताच सर्वत्र जातीने संचार करून सारे काही ठीक चालले आहे किंवा नाही बघताहेत, त्यांच्या भाजपाला आवडणाऱ्या नियोजन करून निर्णय घेण्याच्या क्षमतेचे मोठे कौतुक होते आहे. प्रसाद लाड यांना फडणवीसनेते म्हणून का भावले का मनापासून आवडले त्यांच्याच शब्दात…

“ मला वाटते, सुरवातीला म्हणजे देवेन्द्रजी मुख्यमंत्री झाल्या झाल्या त्यांच्या डोक्यात समृद्धी महामार्ग उभारण्याचे आले आणि तेथेच राज्यातल्या विशेषत: प्रस्थापित अनुभवी नेत्यांचे माथे ठणकले आणि धाबे दणाणले, प्रस्थापित नेत्यांच्या ते लक्षात आले कि हा बाबा आता आपली मोनोपली मोडीत काढणार आपले दिखाऊ नेतृत्व खालसा करणार, नेमके पुढे तेच घडले, या पाच वर्षात त्यांच्यावर संकटे आणण्याचे विविध प्रयोग कधी स्वकीयांकडून तर कधी काही प्रस्थापित नेत्यांकडून दरदिवशी व्हायचे पण देवेन्द्रजी मला कुठेही विचलित झाले आहेत घाबरले आहेत त्यांना काही सुचत नाही, असे कधीही दिसले नाही किंवा त्यांनी कोणत्याही संकटात आपले हसू ढळू दिले नाही, ते आलेल्या प्रत्येक आपत्तीतून मार्ग काढायचे मार्ग निघायचे आणि विरोधक हात चोळत बसायचे. नंतर राज्यातल्या साऱ्याच अनुभवी प्रस्थापित बड्या नेत्यांच्या लक्षात आले  कि देवेंद्रजी यांचे नेतृत्व दमदार कसदार कर्तबगार तडफदार दिलदार आहे आपण यापुढे त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायला हवे, उगाच आपला इगो जपून राज्याचे आणि आपले नुकसान होईल असे वागणे योग्य नाही, बघता बघता मग जो तो नेता त्यांना भेटायचा आणि यापुढे मला तुमच्या मार्गदर्शना खाली काम करायचे आहे, सांगून मोकळा व्हायचा. दर्यादिल फडणवीसाना ज्यांना जवळ घेता आले त्यांनी त्या सर्वांना मायेने प्रेमाने विश्वासाने मोठ्या मनाने जवळ घेतले…

नागपूर आणि मुंबई या दोन शहरांना वेगाने जलद गतीने जोडणारा महामार्ग म्हणजे समृद्धी. मी बघितले आहे, त्यांनी कसे झपाटल्यागत निर्णय घेऊन जातीने लक्ष घालून विविध परवानग्या प्रसंगी स्वतः मिळवून केवढ्या तत्परतेने समृद्धी महामार्ग उभारण्याचे मोठ्या पुण्याचे लोकोपयोगी काम सुरु केले. आज जेव्हा केव्हा हा महामार्ग पूर्ण होण्याच्या विविध बातम्या कानावर पडतात, ज्यांना मी राम मानले त्यांचा मी हनुमान केवढा भाग्यवान कि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला खूप काम करायची संधी मिळते आहे. ज्या नागपूरला रखडत रखडत जाण्यासाठी तब्बल १६ तास लागायचे त्या ठिकाणी यापुढे केवळ काही महिन्यानंतर केवळ आठ तास लागणार आहेत, ऐकून अंगावर अत्यानंदाचे शहारे येतात.” प्रसाद लाड एकदा का वेळ काढून देवेंद्र फडणवीसांवर सतत बोलायला लागले कि त्यांनी घेतलेल्या निर्णयांवर मोठ्या अभिमानाने सांगतात. मला त्यांच्या इतर कोणत्याही खाजगी बाबींवर यासाठी बोलायचे नसते कारण त्यावर काही बोलण्यासारखे नाही, असेही प्रसाद लाड आवर्जून सांगतात…

तूर्त एवढेच : हेमंत जोशी .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *