फडणवीस आडनावाची मिसळ ४ : पत्रकार हेमंत जोशी

फडणवीस आडनावाची मिसळ ४ : पत्रकार हेमंत जोशी 

आज आपण सर्वजण म्हणजे राज्यातले आणि देशातले शरद पवार यांच्या चौफेर धुवाँधार दीर्घायुषी चमकदार दिलदार बेदरकार आणि बहारदार नेतृत्वाकडे त्यांच्यातल्या उत्तुंग नेत्याकडे कधी आदराने तर कधी कौतुकाने बघतो. त्यांची राज्यात किंवा अन्यत्र देशातही असलेली राजकीय पकड दूरदृष्टी विविध विषयात त्यांचे कष्टातून मिळविलेले अगाध दिव्य ज्ञान आणि ज्ञानभांडार त्यांचे अविरत कष्ट आणि तडफ आणि त्यांची कार्यकर्त्यांशी संवाद सुसंवाद साधण्याची अजब आणि आकर्षक पद्धत, राज्याचे देशाचे नेमके प्रश्न किंवा समस्यां समजावून घेऊन त्यांची उत्तरे शोधून त्यावर मार्ग काढण्याची पद्धत त्यावरची त्यांची नेमकी तयारी, अशा कितीतरी विविधांगी बहुढंगी बहुरंगी पैलूंनी श्री श्री शरद पवार आपल्याला मनापासून भावतात मनातून आवडतात म्हणून राज्यातली जनता त्यांना अगदी सुरुवातीपासून त्यांचे कणखर नेतृत्व बघून किंवा अनुभवातून त्यांना कायम त्यांच्या गुणदोषांसहित स्वीकारत आलेली आहे…. 


आता मी हे जे काय वरच्या परिच्छेदात शरद पवार यांच्याविषयी अगदीच थोडक्यात वर्णन केलेले आहे ते वर्णन फक्त नाव बदलवून म्हणजे शरद पवार यांच्याऐवजी देवेंद्र फडणवीस हे नाव टाकून वाचा, फारतर आणखी काही वर्षांनी पवार ऐवजी फडणवीस आडनाव टाकून वरच्या परिच्छेदातले वर्णन अवश्य वाचा, नक्की नजरेखालून घाला तुमच्या ते नक्की १०० टक्के लक्षात येईल कि दोघांमध्येही म्हणजे पवार आणि फडणवीस यांच्या गुणांमध्ये कमालीचे साम्य आहे, येथे मला अवगुणांचे साम्य दाखवायचे नाही, अगदीच तुमचा आग्रह असेल म्हणून सांगतो कि इतरांना वचकून दचकून राहावे किंवा नाही हे तुम्ही तुमचे ठरवावे पण या दोघाना बऱ्यापैकी वचकून राहा कारण भाजपा मध्ये जे चार दोन शरद पवार आहेत त्यात देवेंद्र क्रमांक एक, तुम्हाला घडविण्याची आणि संपविण्याची मोठी हिम्मत फक्त आणि फक्त याच दोघात आहे. जसे प्रत्येकाची अंडी पिल्ली पवारांना ठाऊक असतात आणि योग्य वेळी ते अशा माहितीचा चपखल उपयोग करवून घेतात, आणखी काही वर्षांनंतर फडणवीस त्यात मागे असतील वाटत नाही…


फडणवीसांना शक्यतो अमुक एखाद्या प्रतिस्पर्ध्याच्या म्हणजे एकनाथ खडसे यांच्यासारख्या पक्षातल्या विरोधकांचे देखील आवर्जून नुकसान करायचे नसते पण ते बांगड्या घालून राजकारणात उतरलेले नसल्याने तशी वेळ आलीच तर हेच वरकरणी मवाळ दिसणारे फडणवीस, मला खात्री आहे, ते कठोर होऊन कठीण मनाने शरद पवारांच्या दोन पावले पुढे जातील, हा नेता मनातले सांगतो, तुम्हाला सांगतो तसा तो शाकाहारी नेता नाही म्हणजे काहीही खपवून घेणारा नेता नाही तो पराक्रमी नेता आहे आणि प्रसंगी वज्राहून कठोर होऊन समोरच्याला चारही मुंड्या अगदी सहज चित करू शकतो. त्यांच्याकडे जी या राज्यातल्या स्वतःला निर्भय समजणार्या पण भानगडी करणाऱ्या नेत्यांची कुंडलीतयार आहे किंवा असते,माझी माहिती अशी कि ते या अशा जमविलेल्या असंख्य पुराव्यांमधून अगदी सहजपणे एखाद्या विरोधकाला संपवू शकतात, उध्वस्त करू शकतात पण ते नक्की हलकट स्वभावाचे नाहीत कि जे कोणत्याही व्यक्तिगत फायद्यासाठी हे असे अणवस्त्र काढून अमुक एखाद्याला उध्वस्त करून मोकळे होतील त्यापेक्षा मी हेच सांगतो कि नेता मग तो शरद पवार असो कि देवेंद्र फडणवीस, सावध राहणे केव्हाही चांगले म्हणजे हे देवेंद्र प्रसंगी माधव भंडारी यांना जसे घडवू शकतात तसे क्षणार्धात आस्मान देखील दाखवून मोकळे होऊ शकतात. येथे भंडारी हे अगदी सहज म्हणून उदाहरण दिलेले आहे, उगाच वेगळा अर्थ काढू नका. कारण तुमचा तो स्वभाव आहे कि एखादी चुकून जरी हसली तरी तिला तुम्ही प्रेमपत्र पाठवून मोकळे होता, वास्तविक बहुतेकवेळा तरुणी तुमच्यात राजन पारकर म्हणजे सख्ख्या भावाला बघत असतात, त्यांना तुम्हाला राखी बांधायची असते, गळ्यात तुमच्या वरमाला अजिबात घालायची नसते…

क्रमश:

पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *