बावनकुळे तुमच्यामुळे,फिटे अंधाराचे जाळे ४ : पत्रकार हेमंत जोशी

सांगतो ती वस्तुस्थिती आहे, २००१ ते २०१५ अखेरपर्यंत या राज्याच्या 
वीजखात्यात हुकूमत दहशत दादागिरी सत्ता होती ती फक्त आणि 
फक्त अजित पवार आणि त्यांच्या मूठभर कंपूची. हा कंपू म्हणजे 
सुनील तटकरे यांच्यासारखा केवळ ‘ होयबा ‘ म्हणणारा, किंबहुना 
अजित पवार सोडल्यास विद्युत खात्यात ढवळाढवळ करण्याची इतर 
कोणत्याही नेत्याची हिम्मत नव्हती अगदी सुप्रिया किंवा शरद पवार 
यांचीही. सामान्य माणसाला तर राज्याच्या वीज खात्यात नेमके काय 
सुरु आहे, डोकावून बघणे देखील शक्य नव्हते, हम करेसो कायदा, हे 
असे वागणे अजित पवार आणि कंपूचे होते त्यात काही अधिकारी, 
संचालक, उच्च पदावर काम करणारे बाहेरून आलेले अधिकारी आणि 
जी हुजूर म्हणणारे काही कंत्राटदार यांचा समावेश होता, ज्याच्यावर 
कृपा ते सुनील तटकरे यांच्यासारखे वीज मंडळाला पोखरून आणि 
अजित पवार यांच्या आशीर्वादाने मालामाल झाले….
२०१५ मध्ये शिवसेना भाजपा युतीचे सरकार सत्तेत आले आणि या 
क्षेत्रात प्रचंड बरा वाईट अनुभव पाठीशी असलेल्या श्रीमान चंद्रशेखर 
बावनकुळे यांना माननीय मुख्यमंत्र्यांनी वीज खाते सुपूर्द केल्यानंतर 
बावनकुळे यांचा जो सिनेमातला अमिताभ किंवा नायक सिनेमातला 
अनिल कपूर होऊन त्यांनी ज्या पद्धतीने वीज खात्यातील अंदाधुंदी 
सुपडासाफ करायला सुरुवात केलेली आहे, भीती वाटते कधीकधी 
कि बावनकुळे यांचा तुकाराम मुंडे तर करण्याचा प्रयत्न या खात्यात 
धुडगूस घालणारे तर करणार नाहीत ? सुदैवाने बावनकुळे कमी 
बोलणारे पण हरामखोरांना पुरून उरणारे आहेत, ते देखील असा 
विरोध झालाच तर तक्रार करणाऱ्यांची लक्तरे जगजाहीर करून मोकळे 
होतील. एक मात्र नक्की, आता तुम्ही कोणीही असा, विद्युत मंडळ असो 
कि बावनकुळे यांचे मंत्रालयातील कार्यालय, अजितराज संपल्याने अगदी 
बिनधास्त तुम्ही कोठेही जाऊन वीज खात्याची नेमकी माहिती, हवी ती 
माहिती अगदी सहज मिळवू शकता, मागच्या राजवटीचे वाभाडे मागायचे 
झाल्यास, बिनधास्त कामाला लागा. मागे मी एकदा लिहिले होते कि या 
राज्याला जे चांगले मुख्यमंत्री लाभले त्यात वरच्या क्रमांकावर नक्कीच 
पृथ्वीराज चव्हाण होते म्हणजे चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर सतत सर्वदूर 
आणि त्यांच्या मंत्रिमंडळात भ्रष्टाचाराचा भस्मासुर झाला होता, चव्हाण 
यांनी त्यावर वचक् ठेवला नसता तर पतंगराव, अजितदादा, शिवाजी 
मोघे सारख्या मंत्र्यांनी आणि त्यांना सामील झालेल्या शासकीय व 
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उरले सुरले गेट वे ऑफ इंडिया देखील 
आमच्याच मालकीचे आहे असे सांगून असे हे महाभ्रष्ट तेही विकून मोकळे 
झाले असते. मात्र बऱ्यापैकी वाईटाचे कर्दनकाळ पृथ्वीराज आले आणि 
त्यांनी आणखी विकल्या जाऊ पाहणारे हे राज्य वाचविण्याचे काम 
मनापासून, कोणालाही न घाबरता, अजिबात डगमगून न जाता, बिनधास्त 
केले पण याच पृथ्वीराज चव्हाण यांना देखील कधीही अजितदादा आणि 
कंपूने वीज मंडळांमध्ये घुसू दिले नाही, एवढी प्रचंड मोनोपली २००१ नंतर 
थर्डग्रेड लोकांची येथे निर्माण झाली होती…..
मी अगदी जवळून अनुभवतो आहे म्हणून आत्मविश्वासाने सांगतो, गेल्या 
अनेक वर्षांपासून विविध विचारांच्या राजकीय पक्षांचे बलाढ्य कंत्राटदार 
वीज खात्यात राज्यभर ठाण मांडून आणि फारशी कामे न करता फक्त 
आणि फक्त अमाप समाप पैसे ओरबाडत होते, बावनकुळे मंत्री झाल्यानंतर 
त्यांनी या मंत्र्याला म्हणजे बावनकुळे यांना देखील विकत घेण्याचा प्रयत्न 
केला, पूर्वीसारखेच चालू द्या, आम्ही तुम्हालाही मालामाल करतो, तुमचाही 
तटकरे करतो, तुम्ही अजितदादांच्या भूमिकेत शिरून रान मोकळे करा, असे 
विविध प्रेशर आणून बावनकुळे यांचा तटकरे करण्याचा प्रयत्न केला पण 
कोणत्याही राजकीय दबावाला भीक न घालता, मला काम करून दाखवा 
आणि योग्य कामाचे तेवढे पैसे घेऊन मोकळे व्हा, बावनकुळे यांनी हि 
अशी अत्यंत कणखर भूमिका घेऊन भ्रष्ट अधिकारी असोत कि कंत्राटदार, 
भल्याभल्याना त्यांनी वठणीवर आणून ठेवले आहे. दलालांना तर सळो कि 
पळो करून सोडले आहे….
बावनकुळे अलीकडे मला म्हणाले, भाऊ मी मंत्री होण्यापूर्वी या राज्यातले 
वीज खाते प्रत्येकाला विशेषतः प्रत्येक ग्रामस्थाला अक्षरश: करंट मारणारे, 
शॉक देणारे होते, आपले राज्य पिछाडीवर राहण्यात जी प्रमुख करणे 
आहेत त्यात एक वीज खातेही. मी ग्रामीण भागातून तेही विदर्भातल्या 
खेड्यातून लहानाचा मोठा झाल्याने आम्ही ग्रामस्थ वीज खात्याच्या 
अनागोंदी कारभारातून कसे होरपळले गेलो आहोत, मला चांगले ठाऊक 
आहे म्हणून आजही मी एखाद्या खेड्यात मुक्काम ठोकतो आणि आमच्या 
खात्याशी संबंधित समस्या आधी जाणून घेतो नंतर लगेच त्यावर कायमस्वरूपी 
तोडगा काढून मोकळा होतो. मागच्या सरकारने या राज्यातल्या शेतकऱ्याला 
विज न उपलब्ध करून दिल्याने त्याची पार वाट त्यांनी लावून टाकली. ग्रामीण 
भागात वीज परिवर्तन करण्याची मी शपथ घेतली आहे, आमचे सरकार या 
राज्यातल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर नक्कीच समाधान आणून सोडतील. 
चंद्रशेखर जे बोलतात ते करून दाखवतात, वीज खात्याचा पारदर्शी कारभार 
नक्कीच लोकांच्या जीवनात यापुढे आनंद आणून सोडेल…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *