मुख्यमंत्री फडणवीस २ : पत्रकार हेमंत जोशी

मुख्यमंत्री फडणवीस २ : पत्रकार हेमंत जोशी 

अनेकदा आपण बघतो अमुक एखाद्याला खुश करण्यासाठी त्या व्यक्तीचे हुजरे त्याच्यासमोर तोच तो बकाल बेशिस्त बकवास विभत्स नागीन डान्स करून त्या त्या व्यक्तीला खुश करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतांना दिसतात. अहो, तुम्हाला अमुक एखाद्याला खुश करायचेच असेल तर त्यासाठी अनेक उत्तमोत्तम नृत्य प्रकार आहेत, ते करावेत, असे भलते सलते करू नये असे निदान मला तरी वाटते. ते तसेच कविता किंवा एखाद्या स्तुतीपर लिखाणाच्या बाबतीत, अमुक एखाद्याला खुश करण्यासाठी त्याच्यावर कविता करणारे अनेक नवकवी आपण सभोवताली बघतो, विशेष म्हणजे जसे प्रत्येकाला आरशात बघतांना वाटते आपण छान दिसतो किंवा बाथरूम मध्ये गाताना वाटते आपण डिट्टो लता रफी आहोत तेच नवकवींचे असते, नवकवींच्या साऱ्याच कवितांना कंपलसरी दाद द्यावी असेही त्यांना कायम वाटत असते. अमुक एखाद्याला खुश करण्यासाठी मग जे काय हे नवकवी लिहून मोकळे होतात, ते वाचून वारंवार वाटते कि हि मंडळी समोर आली रे आली कि त्यांना कायम बदडून काढत राहावे. तुम्हाला अमुक एखाद्याचा बदला घ्यायचा असेल तर त्याच्या घरी एकाचवेळी तीन चार नवकवींना स्वखर्चाने पाठवून द्यावे, तुमचे बदला घेण्याचे काम आपोआप होते. एकदा एकनाथ शिंदे किंवा प्रताप सरनाईक यांनी मुद्दाम हे करावे त्या जितेंद्र आव्हाड यांच्याकडे काही नवकवींना तेही भरपेट दारू पाजून पाठवावे,नाही आव्हाडांनी राजकारण सोडले तर मला हेमंत जोशी म्हणू नका, वाटल्यास, पुढारी दैनिकाशी पंगा घेणारे प्रमोद हिंदुराव म्हणा….


वरील परिच्छेदात हे असे मला पुण्याचे पत्रकार आशिष चांदोरकर यांच्या नागीन डान्स वरून, माफ करा, त्यांच्या ‘ मॅन ऑन मिशन महाराष्ट्र ‘ पुस्तकावरून लिहावेसे वाटले म्हणजे एखादया रटाळ नवकवीने अमुक एखाद्याला खुश करण्यासाठी त्याच्यावर रचलेल्या रटाळ कवितांसारखे चांदोरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचावर भले मोठे भरगच्च पुस्तक लिहून काढले आहे. ते पुस्तक वाचल्यानंतर मला आणि ज्यांनी वाचले त्यांनाही हे असेच वाटले. अर्थात अरुण टिकेकरांचे लिखाण जसे त्यांच्या पत्नीला आवडायचे ते तसे आशिष चांदोरकरांच्या बाबतीत होऊ शकते, त्यावर मात्र माझ्याकडे इलाज नसेल. मनातले सांगतो, राष्ट्रवादी सत्तेत असतांना शरद पवारांना खुश करण्यासाठी अनेक पुस्तके काढल्या जायची पण ती सारी पुस्तके संग्राह्य आणि वाचनीय ठरली त्यातल्या कुठल्याही पुस्तकाचा ‘ मॅन ऑन मिशन महाराष्ट्र ‘ झाला नाही म्हणजे एखादे सरकारी पुस्तक आपण वाचतोय असे पवारांवर काढलेल्या पुस्तकांचे झाले नाही…


दुर्दैवाने ज्यादिवशी सदर पुस्तकाचे दिमाखदार आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत त्या विजया रहाटकर बाईंनी उदघाटन म्हणजे प्रकाशन समारंभ घडवून आणला तेव्हा मी तेथे म्हणजे सह्याद्री या विशेष शासकीय अतिथी गृह येथे कोणाला तरी भेटायला गेलो होतो, त्यामुळे नेमके कोणाला मुख्यमंत्र्यांना खुश करायचे आहे ते लक्षात आले, पैसे खर्च करायचेच होते तर ते असे वाया घालवायचे नव्हते, त्याच चांदोरकरांना खुसखुशीत लिखाण करून सदर पुस्तक वाचनीय करावे असे जर रहाटकर बाईंनी सांगितले असते तरीही ते आशिष यांनी केले असते, हे असे रटाळ आणि नजर टाकून बाजूला ठेवण्यासारखे फडणवीसांवरील पुस्तकाचे झाले नसते…


परफेक्ट नागीन डान्स कसे करावेत, सॉरी, अमुक एखाद्याला खुश करण्यासाठी त्याच्यावर नेमके कसे वाचनीय लिहावे हे जर आधी चांदोरकर आणि रहाटकर यांनी बुजुर्ग आणि त्यातले तद्न्य, पत्रकार मधुकर भावे यांच्याकडून समजावून घेतले असते तर या दोघांचे रटाळ नृत्य झाले नसते म्हणजे नजर टाकून पुस्तक बाजूला ठेवावे असे ‘ मॅन ऑफ मिशन महाराष्ट्र ‘ या पुस्तकाचे झाले नसते, केलेला अमाप खर्च वाया गेला नसता. पुस्तक नक्की वाचनीय आणि संग्राह्य झाले असते, महाराष्ट्र टाइम्स मध्ये काम करणाऱ्या आशिष चांदोरकर यांचाही नेमका भारतकुमार राऊत झाला म्हणजे लिखाण कंटाळवाणे ठरले दुर्दैवाने…


या पुस्तकाची प्रस्तावना साहित्यिक सदानंद मोरे यांनी लिहिल्याने त्यांच्यात यानिमीत्ते आचार्य अत्रे बघायला मिळाले म्हणजे अत्रे कसे एखाद्या मुर्दाडाला देखील प्रसंगी दारासिंग करून त्यांच्या जादुई शब्दातून वाक्यातून जिवंत करायचे ते तसे हुबेहूब मोरे यांचे झाले त्यांनी प्रस्तावना लिहिल्याने निदान ती तेवढी तरी नक्की वाचनीय ठरलेली आहे. आमचे पत्रकार मित्र उदय तानपाठक हे जेव्हा विद्या बालन चा डर्टी पिक्चर रिलीज झाला तेव्हा त्यातले एक गाणे तेवढे बघून लगेच बाहेर पडायचे,ज्या गाण्यात तेवढा एक क्षण शाळा मास्तरीण विद्याच्या साडीचा जो पदर ढळतांना दाखविलेला आहे, तेथेच पैसे वसूल होतात, ते तसेच या पुस्तकाच्या बाबतीत झाले आहे म्हणजे मोरे यांची प्रस्तावना तेवढी वाचावी आणि पुस्तकातून लगेच तानपाठक यांच्यासारखे बाहेर पडावे. बोरिंग पुस्तक नेमके कसे असते त्यासाठी केवळ बघावे, मॅन ऑन मिशन महाराष्ट्र..

पुस्तकातील मजकूर पुढल्या भागात…

क्रमश:


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *