व्यक्ती तेवढ्या प्रकृती : पत्रकार हेमंत जोशी

व्यक्ती तेवढ्या प्रकृती : पत्रकार हेमंत जोशी 

तुम्ही हे करून बघा, म्हणजे कधीही इतरांविषयी वाईट बोलू नका किंवा कोणाचेही विनाकारण वाईट चिंतू नका, निकोप स्पर्धा करून बघा, एखादी भूमिका घेऊन जगणे प्रत्येकाकडून अपेक्षित असते पण भूमिके पलीकडे अमुक एखाद्याविषयी कायमस्वरूप राग द्वेष क्रोध ठेवून जगू नका, प्रत्येकाविषयी ममता आणि बंधुता बाळगून तर बघा, नक्की मजा येईल हा बदल जर स्वतःमध्ये घडविता आला तर….

जाऊद्या उगाच त्या भय्यू महाराजांसारखी येथे न कळणारी भाषा वापरून मी तुम्हाला गोंधळात टाकतो आहे. अनेक डॉक्टर मंडळींचे म्हणे अनेकदा असे होते कि त्यांना त्यांचेच अक्षर कळत नाही, मला वाटते महाराजांचेही असे होत असावे म्हणजे त्यांनी केलेले प्रवचन पुढे त्यांनाच ते काय बोलले हे कळत नसावे. आणि ते जे बोलतात ते तसे स्वतः वागत नाहीत याचे अधिक वाईट वाटते. अनेक वेळा मी विरोधात लिहितो पण भूमिका मांडल्यानंतर हि माणसे भेटलीत किंवा समोर आलीत कि त्यांच्याकडे रागाने बघावे असे कधीही वाटत नाही, उलट आपणहून त्यांच्या जवळ जातो, आदराने प्रेमाने त्यांची विचारपूस करतो कारण ज्यांच्या विरोधात मी लिहिलेले असते तो सामान्य माणूस नसतो असतो तो एक खूप मोठा माणूस…

या राज्यात ज्यांना ज्यांना असामान्य बुद्धिमत्ता आणि अद्वितीय लेखणी लाभलेली आहे त्यात गुरुस्थानी मानावे असे भाऊ तोरसेकर असतील, अनेक असतील पण आजही ज्यांचे कित्येक वर्षे आधी केलेले लिखाण मला जसेच्या तसे आठवते ते पत्रकार अनिल थत्ते, मनातून हृदयातून निघता निघत नाही, वास्तविक त्यांनी पाक्षिक गगनभेदी बंद केले नसते तर मला पुढे जातांना स्पर्धा म्हणून नक्की खूप कठीण गेले असते पण जेवढे त्याचे वाईट वाटले नसते, तेवढे अधिक दुःख त्यांनी गगनभेदी बंद केल्याचे आहे किंवा ग. वा. बेहरे गेल्यानंतर “सोबत” साप्ताहिक बंद पडल्याचे आहे. थत्तेंशी किंवा तोरसेकरांशी फोनवर किंवा प्रत्यक्ष भेटल्यानंतर बोलतांना आधी माझ्या डोळ्यासमोर त्यांचे पाय येतात. आणि हो मोठ्या माणसांच्या चेहऱ्याकडे नव्हे तर पायाकडे बघून बोला, अधिक आनंद तुम्हाला त्यातून मिळेल. व्यक्ती म्हणून गुण दोष प्रत्येकात असतात पण गुणांची संख्या तेवढी मोजून मोठ्या माणसांकडे बघावे, आनंद मिळतो…

त्या ऊर्जा मंत्र्यांचे नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, शरद पवार, रामदास आठवले, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, अमीर खान, नाना पाटेकर इत्यादींसारखे झाले आहे म्हणजे हि अशी मंडळी अमुक एखाद्या ठिकाणी बसली रे बसली कि पुढल्या पाच मिनिटात त्यांच्या सभोवताली गर्दी जमा होते, समजा ते या जागेवरून उठून त्या जागेवर बसलेत कि लगेच गर्दी पुन्हा त्यांच्याकडे सरकते. मी या मंडळींच्या रांगेत थेट त्यांना नेऊन बसवत नाही, पण या राज्याच्या ऊर्जा मंत्र्यांचे म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे यांचे हे असे झाले आहे, त्यांची काम करण्याची सकारात्मक भूमिका आणि या ऊर्जा मंत्र्याला लाभलेली प्रचंड शारीरिक ऊर्जा, खोटे नाही खरे सांगतो, हा माणूस जेथे जेथे पोहोचतो, त्याच्या सभोवताली पुढल्या पाच मिनिटात प्रचंड गर्दी झालेली असते….

बावनकुळे यांचा विषय येथे यासाठी कि कदाचित ते असे एकमेव मंत्री असावेत जे बढत्या बदल्या किंवा अन्य कोणत्याही लाभाच्या कामात त्यांच्या खात्यातील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांकडून पैसे घेत नाहीत त्यामुळे त्यांच्या कडे असलेल्या खात्यातील अधिकारी त्यांच्यासमोर येतांना मी चळाचळा कापताना बघितले आहेत, थोडक्यात बावनकुळे यांचा नागपुरात पालक मंत्री म्हणून किंवा या राज्याचे ऊर्जा आणि उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री म्हणून आदरयुक्त दरारा आहे आणि हे असे अलीकडे क्वचित घडते. विशेष म्हणजे या मंडळींकडून पैसे खाणे नाही हे त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्यादिवसापासून ठरविले आहे, त्यांचे संघ शिस्तीचे सहकारी श्री विश्वास पाठक यांनी हे असे वाचन त्यांच्याकडून घेतले आहे, तसेच घडते आहे, विश्वासाने सांगू शकतो, श्रीमान चंद्रशेखर बावनकुळे बढत्या बदल्यांमध्ये किंवा खात्यातील कर्मचाऱ्यांकडून पैसे न खाणारे मंत्री आहेत. हे बघा, बढत्या बदल्या करवून घेणारे मधले दलाल इतके तयारीचे असतात कि ते पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतांना त्यांना पैसे द्यावे लागणार आहेत, हे त्यांच्यासारख्या करड्या शिस्तीच्या मुख्यमंत्र्यांचेही नाव सांगून पैसे उकळायचे, वास्तविक या अशा प्रकारात चव्हाण दूरदूरपर्यंत सामील नव्हते…

येथे मला कोणालाही कमी लेखायचे नाही, ज्यांचा उल्लेख केला ती माणसे नक्की फार मोठी आहेत. अलीकडे मी विवाह पत्रिका देण्याच्या निमित्ताने माननीय उद्धव ठाकरे यांना भेटलो, हि भेट अर्थात मित्रवर्य हर्षल प्रधान यांनी घडवून आणली. जेव्हा सेना भवनात गेलो, तेव्हा माझे अतिशय लाडके मंत्री दिवाकर रावते, खऱ्या अर्थाने उद्धवजींचे उजवे हात श्री मिलिंद नार्वेकर, माझा एकेकाळचा सहकारी आदेश बांदेकर, श्री विनायक राऊत इत्यादी सेनेची दिग्गज मंडळी बाहेरच्या हॉल मध्ये बसलेली होती आणि आत केबिन मध्ये उद्धवजींबरोबर एकमेव हर्षल प्रधान होते, उद्धवजींच्या काही मिटींग्स सुरु होत्या, पुन्हा सांगतो, या मंडळींना कमी लेखायचे नाही पण हर्षल प्रधान यांचे कौतुक येथे यासाठी कि कामातले डिव्होशन एखाद्याला किती मोठी उंची गाठून देते त्यावर हर्षल प्रधान हे अप्रतिम उदाहरण ठरावे. प्रधान असोत कि नार्वेकर, मातोश्रीवर अमुक एखाद्याचे महत्व उगाच वाढत नाही, मोठ्या कष्टातून ते साध्य होते…

मी चिरंजीव हर्षल यास अगदी जवळून गेली २२-२५ वर्षे जवळून बघत आलोय, त्याने कधी आराम केला केल्याचे कधी आठवत नाही, मला वाटते तो घरी केवळ झोपायला जात असावा, अर्थात पत्नी अंजली आणि एकत्र कुटुंबाची त्याला लाभलेली उत्तम साथ हेही त्याच्या यशाचे नक्की एक गमक आहे, त्याची पत्नी हसत खेळत घर एकत्र बांधून ठेवते, हेही कौतुक करावे असे, त्याचे एक बरे आहे, तो पुढे गेलाय खरा, पण जुन्या सहकाऱ्यांना विसरलेला नाही, ते नेहमी सेनाभवनातल्या त्याच्या केबिन मध्ये अनेकदा तहान मांडून बसलेले असतात…

मित्र मोठे झालेत कि आपण आपोआप मोठे होत जातो, खूप खूप मित्र जोडावेत, असावेत, धम्माल आयुष्य जगणे सहज शक्य होते, तुम्हीही हा प्रयोग करून पहा..

पत्रकार हेमंत जोशी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *