दादागिरीचा अस्त : पत्रकार हेमंत जोशी

दादागिरीचा अस्त : पत्रकार हेमंत जोशी 

कोणताही मनुष्य लाचार अगतिक बेजार दीन दुबळा निराधार निराश असहाय्य बतंग जेर अस्वस्थ शारीरिक किंवा मानसिक स्वास्थ्य नीटसे न लाभल्याने होतो. जवळ पैसे नसतील किंवा कुटुंबातले सदस्य नालायक निघालेले निपजले असतील किंवा प्रकृतिस्वास्थ्य बिघडलेले असेल तर माणसाला प्रसंगी जगावेसे देखील वाटत नाही. आजारी माणसासमोर अप्सरा जरी उभी केली तरी तो तिच्याकडून राखी बांधून घेईल किंवा भाऊबीजेला तिच्याकडून ओवाळून घेईल. मंत्री गिरीश महाजन किंवा त्यांची रामेश्वर नाईकांच्या संगतीने आरोग्य क्षेत्रात योगदान देणारी चमू त्याकडे बघून हेच कायम वाटत राहते कि असे मंत्री असावेत, अशी माणसे चौफेर पसरलेली असावीत. यशाचे प्रमाण काहीसे कमी आहे पण महाजन यांनी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये या खात्याचे मंत्री म्हणून आणि आयोजित केल्या जाणार्या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून योग शास्त्राला अनन्यसाधारण महत्व देऊन जो योगउपक्रम राबविण्याचा त्यांनी संकल्प हाती घेतला आहे त्यावर करावे तेवढे कौतुक कमी पडावे….


वीणा आठवली कि शिव आठवतो सुरेखा आठवली कि वसंत आठवतो धर्मेंद्र नजरेसमोर आला कि हेमा ऐवजी यदु दिसतो गोटी सोड्यामुळे उदय आठवतो एका राजाला तीन तीन राण्या कथा ऐकली कि मराठवाड्यातला बबन आठवतो किंवा सिनेमातली आसावरी समोर आली कि गावजेवण आठवते तद्वत येथे गिरीश महाजन यांच्यावर लिहितांना पटकन सुरेश दादा जैन आठवले, त्यांची असलेली आणि संपलेली दादागिरी आठवली, त्यांचा सुवर्णकाळ आणि आजचा अशुभकाळ सारे काही पटकन नजरेसमोर तरळून गेले कुठे वाईट वाटले कुठे सुरेशदादा आठवतांना त्यांचे बेधुंद वागणे बोलणे तेवढ्याच तीव्रतेने आठवले. बघा नियती कशी असते, ज्या दोघांची मी नेहमी उदाहरणे देतो ते नेमके एकाचवेळी अडचणीत सापडले आहेत त्यापैकी एक आहेत सुरेशदादा जैन, दुसरे आहेत शरद पवार. दोघांची राजकारण करण्याची खेळण्याची पद्धत एकाच होती, आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणच्या स्थानिक नीच हलकट गुंडांना मोठे करायचे नेते म्हणून पुढे आणायचे त्यांना प्रतिष्ठा द्यायची त्यांचा स्वतःच्या फायद्यासाठी खुबीने वापर करायचा, सामान्य लोकांकडे साफ दुर्लक्ष करायचे आणि स्वतःचे राजकीय उल्लू सीधे करायचे, नियतीने मात्र दोघांवरही त्यांच्या हयातीतच सूड उगवला, एक तुरुंगात गेले दुसरे सध्यातरी राजकीय दृष्ट्या खितपत पडले आहेत…


www.vikrantjoshi.com


मुंबईत माझ्या घराच्या आसपास जळगावचे चार मारवाडी उद्योगपती राहायला आहेत, आम्ही एकमेकांचे कौटुंबिक मित्र आहोत, त्यातले एक आहेत अजय अग्रवाल दुसरे आहेत सुभाष अग्रवाल तिसरे आहेत मनीष ईश्वरलाल जैन आणि चवथे आहेत अंतिम तोतला पैकी माजी आमदार मनीष जैन आणि सुभाष अग्रवाल यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सुरेशदादा जैन व त्यांच्या तुरुंगवासाशी शंभर टक्के संबंध आहे. सुरेशदादा आणि कंपूचे गृहप्रकल्प प्रकरण प्रशासकीय अधिकारी आणि त्या वेळेचे जळगाव महापालिकेचे मुख्याधिकारी श्री प्रवीण गेडाम यांनी उचलून धरले शोधून काढले तरी या प्रकरणात त्यांना ज्या दोघांची मोठी मदत झाली त्यातले एक होते एकनाथ खडसे आणि दुसरे होते सुभाष अग्रवाल. जळगावला एकेकाळी सुभाष अग्रवाल यांचा मोठा व्यवसाय होता त्यादरम्यान कोठेतरी सुभाष यांचे लोकमत व सुरेशदादांशी खटकले आणि सुभाष यांनी “जळगाव टाइम्स” नावाचे दैनिक सुरु केले त्यात पुढे हे दादांचे प्रकरण त्यांनी नेमके शोधून काढून जेव्हा दररोज छापले तेव्हा हे जळगाव टाइम्स वृत्तपत्र अक्षरश: काळ्या बाजारात चढ्या भावाने विकत घ्यावे लागे एवढी त्याला प्रचंड मागणी असे…


सुभाष अग्रवाल यांनी सुरेशदादा जैन यांच्या दहशतीपुढे नमते घ्यावे म्हणून त्याकाळी त्यांच्यावर सतत दबाव येत असे पण सुभाष घाबरले नाहीत, दादांना सरेंडर झाले नाहीत. मात्र दादा या साऱ्या प्रकाराने मनापासून खवळले त्यांनी विविध पद्धतीने मग सुभाष अग्रवाल यांना एवढे नामोहरम केले कि एक दिवस सारे काही विकून सुभाष मुंबईत आले ते कायमचेच. मनीष ईश्वरलाल जैन यांचे राजकीय आणि आर्थिक नुकसान झाले ते त्यांनी त्याकाळी राजकीयदृष्ट्या अतिशय प्रभावी ठरलेल्या एकनाथ खडसे यांच्या दिवंगत मुलास विधानपरिषदेत सुरेशदादा जैन यांच्या मदतीने पराभूत केल्याने. दुर्दैवाने निखिल खडसे यांनी आत्महत्या केली त्यामुळे खडसे हे मनीष जैन आणि सुरेशदादा जैन यांच्यावर अधिकच खवळले त्याची परिणीती वाईटात झाली, राजकीय तीव्र दुश्मनी, आयुष्याची व्यवसायाची आणि राजकारणाची फार मोठी किंमत आज सुरेशदादा जैन आणि मनीष जैन यांना मोजावी लागते आहे. जळगाव जिल्हा हा असाच आहे, एकदा का तिथे एकमेकांशी फाटले कि स्पर्धक एकमेकांचे काय करतील सांगता येत नाही. आज गिरीश महाजन यांचे स्टार बुलंद असतांना त्याचवेळी एकनाथ खडसे हे राजकीय व आरोग्य दृष्ट्या कमकुवत झालेले आहेत म्हणून ठीक आहे पण पुढेही महाजन कायमस्वरूपी सेफ राहतील अजिबात सांगता येत नाही, जळगावात त्यांची आणि येथे राज्यात थेट पवारांशी पंगा घेतलेला असल्याने देवेंद्र फडणवीस यांची मला कायम सतत काळजी वाटते. अतिखतरनाक नेते हे सिनेमातल्या अमरीश पुरी शक्ती कपूर प्रेम चोप्रा यांच्या पेक्षा कितीतरी अधिक खतरनाक असतात, लै डेंजर ठरू शकतात…


क्रमश: हेमंत जोशी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *