इश्य! पवारांची मगरमिठी : पत्रकार हेमंत जोशी

इश्य! पवारांची मगरमिठी : पत्रकार हेमंत जोशी 

यहॉ से पचास पचास कोस दूर, 

जब रात को काई बच्चा रोता है,

तो उसकी माँ कहती है…

झोप मेल्या, नाहीतर..

तुला भाऊ कसा होणार..? 

श्री श्री शरद पवार हे राजकारणातले ‘ गोविंदा ‘ आहेत म्हणजे अभिनेता गोविंदाने यशस्वी होण्यासाठी त्याने प्रेक्षकांच्या नकळत त्याच्या नृत्यात आणि अभिनयात प्रत्येक यशस्वी अभिनेत्याची कायम त्याच्या प्रत्येक चित्रपटात नक्कल केली मग तो अमिताभ असेल, दिलीपकुमार, राजेश खन्ना असे कितीतरी आणि प्रचंड यश व पैसे मिळविले. शरद पवार यांचे देखील ते तसेच आहे अभिनेता गोविंदासारखे, ते या देशातल्या प्रत्येक नेत्याच्या काम करण्याच्या पद्धतीची थोडी थोडी नक्कल करतात आणि त्यांनी राष्ट्र्वादीतही त्या त्या पक्षातले जे जे काय चांगले असेल, चपखल बसवून ठेवले आहे, माझ्या या वाक्यावर तुम्ही अतिशय थंड मनाने शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडे बघा, मी येथे जे सांगितले आहे ते सत्य आहे, खरे आहे, वास्तव आहे, तुमच्या सहज लक्षात येईल…


या राज्यात युती सत्तेत आल्यानंतर त्यांनी अलिकडल्या तीन साडे तीन वर्षात अगदी बेमालूमपणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आणि शिवसेनेची नक्कल केली म्हणजे ते या राज्यातल्या कानाकोपऱ्यात अतिशय सावधपणे पुन्हा एकदा आपली पाळेमुळे रोवताना ते आणि त्यांचे नेते दिसताहेत अगदी ज्या बिदर्भाकडे त्यांनी याआधी फारसे लक्ष दिलेले नव्हते त्या विदर्भात देखील, म्हणजे हि झाली रा. स्व. संघाची नक्कल त्यानंतर ते आणि त्यांचे नेते अधून मधून अचानक खोकल्याची उबळ आल्यासारखी रस्त्यावर उतरून हल्लागुल्ला करून लोकांचे आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यातही यशस्वी ठरताहेत म्हणजे हि झाली शिवसेनेची नक्कल, आणि नक्कल हि अधिक यशस्वी असते जसे प्रत्येक सिनेमात राजेंद्रकुमारने दिलीपकुमारची हुबेहूब नक्कल केली आणि तो अधिक प्रचंड यशस्वी झाला, दिलीपकुमारचे नव्हे राजेंद्रकुमारचे सिनेमे अधिक यशस्वी झाले म्हणून त्याला पुढे ज्युबिलीकुमार असे नाव पडले….


पवारांनी आणखी एका अभिनेत्याची अगदी हुबेहूब नक्कल केली आणि ते अभिनेते आहेत आपले मोहन जोशी, या जोशांना हिंदी सिनेमात मोठे यश मिळाले होते किंवा मोठे यश मिळत असतांना त्यांनी अचानक हिंदी सिनेमाकडे पाठ फिरविली आणि मराठी सिनेमाकडे छाती केली म्हणजे एखाद्या अभिनेत्रीला शूटिंगच्या दरम्यान करकचून कवटाळावे तसे मराठी सिनेमाला कवटाळले थोडक्यात ते पुन्हा एकदा मराठी सिनेमाकडे वळले कायमचे, पुन्हा त्यांनी हिंदी सिनेमाकडे वळून देखील बघितले नाही तेच शरद पवारांचे देखील…


तिकडे दिल्लीत म्हणजे हिंदी सृष्टीत त्यांना प्रचंड यश मिळत असतांना पवारांचे मन तिकडे रमले नाही आणि तेही परतले पुन्हा इकडे आपल्या मायभूमीत. एखादी विवाहित प्रेयसी भलेही प्रियकराला भेटायला जाते त्याला बिलगतेही पण घरी असलेल्या घरी ठेवलेल्या चिल्यापिल्यांची तिला आठवण झाली कि ती प्रियकराला त्याच्या त्या मोहमयी मिठीला जसा झटका देऊन भराभर पावले टाकत घरी येते आणि मुलांना मायेने जवळ घेते, त्यांच्याशी लाड प्यार करते, त्यांचे पटापट मुके घेते, शरद पवारांचे या राज्यातल्या त्यांच्या राष्ट्र्वादीतल्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत कायम त्या विवाहित प्रेयसीसारखेही होत आलेले आहे, त्यांना त्यांच्या येथल्या पिल्लांची आठवण झाली रे झाली कि ते तडक दिल्लीतली मिठी सोडून पुढल्या विमानाने कायमसाठी मुंबईत परततात, विशेष म्हणजे पवारांचे प्रेम अशावेळी एकतर्फी असते म्हणजे त्यांच्या चिल्यापिल्यांना, दुसऱ्या फळीतल्या नेत्यांना रान मोकळे मिळत असल्याने येथे त्यांची फारशी आठवण देखील येत नसते. शरद पवारांच्या या अशा परतण्यावरून मला फार पूर्वी आमच्या शेजारी राहणाऱ्या अब्दुलाची आठवण झाली, हा दुबईत राहायचा आणि त्याची लेकुरवाळी बायको इकडे मुंबईत राहायची, हा अधून मधून आला रे आला कि त्याची बायको धास्ती घ्यायची आणि आमच्या घरात येऊन सांगायची, आला बाई हा अब्दुला, मुलांना खेळवायला आणि मला लोळवायला, पवार इकडे परतले कि येथल्या विरोधी नेत्यांचे तर सोडा पण काँग्रेस मधल्या नेत्यांचे आणि त्यांच्याच राष्ट्रवादी पक्षातल्या दुसऱ्या फळीतील नेत्यांचे किंवा अजित पवारांचे देखील त्या लेकुरवाळ्या बाईसारखे धास्तावलेपण त्या सर्वांच्या डोक्यात शिरते, कारण पवार केव्हा कोणाला खेळवतील आणि केव्हा कसे कोणाला लोळवून संपवतील सांगता येत नाही म्हणून पवार राज्यात परतले रे परतले कि सर्वांची अवस्था त्या अब्दुल्लाच्या बायकोसारखी होते….


सारांश: युतीने किंवा काँग्रेसने किंवा इतर कोणत्याही नेत्यांनी माझे सांगणे अत्यंत अत्यंत काळजीपूर्वक ध्यानात घ्यावे, शरद पवार असे एकमेव नेते आहेत ते पुढल्या निवडणुका जिंकण्याच्या इर्षेने पहिल्या दिवसापासून कामाला लागले आहेत आणि वेळेवर अभ्यास करणारे वार्षिक परीक्षेत कधीही मेरिट मध्ये येत नाहीत, पवारांनी केव्हाच वार्षिक परीक्षेची तयारी सुरु केली आहे, इतर बहुतेक एकतर झोपेत तरी आहेत किंवा मस्तीत तरी आहेत….


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *