महादेव जाधव, नावात काय आहे? भाग ३ -पत्रकार हेमंत जोशी

महादेव जाधव, नावात काय आहे? भाग ३ -पत्रकार हेमंत जोशी 

नाव काहीही असले तरी चालते पण आडनावे, ढुंगणहलवे, हागे, झावरे सारखी चित्र विचित्र असतील तर अवश्य बदलवून घ्यावीत. कधी कधी आपले नाव आपल्याशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष निगडीतही असते म्हणजे दिवंगत खलनायक अजित आणि बारामतीकर अजितदादांच्या आवाज बराचसा मिळता जुळता आहे किंवा जितेंद्र आव्हाड आणि अभिनेता जितेंद्र, दोघांची भांग पाडण्याची पद्धत जवळपास सारखी आहे, आ. आव्हाडांना कोणीतरी त्यावर विचारलेही त्यावर ते नेहमीप्रमाणे पटकन बोलून गेले, जितेंद्र माझ्या भांग पाडण्याची नक्कल करतो जसे ते अलीकडे पटकन बोलून गेले कि त्यांना भगवतगीता पाठ आहे म्हणून, वास्तविक त्यांना म्हणे कुराण तोंडपाठ आहे सांगायचे होते…


जर हेतू शुद्ध असेल तर प्रसंगी शासनाने देखील अगदी मनापासून महादेव जाधव यांच्यासारख्या तळागाळातकाम करणाऱ्या, गोरगरीब महिला व सामान्य शेतकरी यांच्यासाठी विविध उपक्रमातून काम करणाऱ्या अशा उद्योगपतींना उघड पाठिंबा देऊन त्यांना अधिकाधिक प्रोत्साहित केले पाहिजे, आपल्याकडे नेमके असे होत नाही, अमुक एखाद्या उपक्रमातून मला काय मिळणार आहे याचाच आधी विचार होत असल्याने ऑन मेरिट म्हणजे स्वतःच्या हिंमतीवर निर्णय घ्यावे लागतात,या मंडळींना काम करावे लागते. अतुल्य ग्रुपचे महादेव जाधव नेमके नक्की काय करतात तर, अतुल्य निर्माण मायक्रो फायनान्स असोसिएशन, आपल्या पहिल्या उपक्रमाद्वारे दारिद्र्य रेषेखाली जगणाऱ्या गरजू महिलांना अल्प व्याज दराने पत पुरवठा ते करतात, हे जाळे देशाच्या अनेक भागात पसरलेले आहे, विशेष म्हणजे कंत्राटी शेतीसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे जाळे विणलेले आहे आणि शेतकऱ्यांची उत्पादने अतुल्य ग्रुप च्या माध्यमातून देश परदेशातून विकली जातात. डिजिटल तंत्रज्ञान आणि सौर ऊर्जा या क्षेत्रात ते नजीकच्या काळात नक्की भरारी घेतील असे दिसते…


नवनवीन कल्पना त्यांना सुचल्या कि ते त्यावर आधी सखोल अभ्यास करतात, त्यासाठी प्रसंगी जगभरात फिरतात. त्यांना आपला वर्षा सत्पाळकर किंवा गाव तेथे कुटुंब निर्माण करणारा मोतेवार करवून घ्यायचा नाही, उद्योगात ओतलेला प्रत्येक पैशांचे चीज व्हावे, नुकसान होऊन करून त्यांना या अशा मंडळींच्या मार्गावर पाऊल देखील ठेवायचे नाही, त्यांचा हेतू शुद्ध असल्यानेच, त्यांच्या सभोवताली देशातले, राज्यातले, जगातले अनेक मान्यवर उत्स्फूर्त उभे आहेत. अनेक मान्यवरांना देखील त्यांच्या विविध उपक्रमात सहभागी व्हायचे असते, मला वाटते हे जाधव यांचे मोठे यश आहे. तळागाळातल्या, ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबांसाठी किंवा आर्थिक दृष्ट्या कमकुवत महिलांसाठी कार्पोरेट जगताची द्वारे, कवाडे, दारे उघडून देणे किंवा उपलब्ध करून देणे तसे अतिशय त्रासाचे आणि कटकटीचे काम म्हणजे या उतरत्या वयात गोपाल अग्रवालांना कत्थक नृत्य शिकविण्यासारखे, पण जिद्द आणि मेहनत, जाधव यांच्या प्रयत्नांना यश देते…


अतुल्य ग्रुप आणि महादेव जाधव या दोन्हींवर खूप काही लिहिण्यासारखे किंवा बोलण्यासारखे, विशेषतः महिलांना त्यांच्या छोट्या व्यवसायासाठी म्हणजे स्वयं रोजगारासाठी कर्ज देतांना या कंपनीने अतिशय सोपी पद्धत विकसित केलेली आहे. कर्जासाठी एखाद्या महिलेकडून अर्ज मिळताच त्या अर्जदाराची पार्शवभूमी तपासून दोनच दिवसात कर्ज वाटप करण्यात येते. हि रक्कम साधारणतः दोन ते पंचवीस हजार रुपयांपर्यंतची असते, मुख्यत्वे त्यावरील व्याज अल्प दराने घेतले जाते. कर्ज परतावा वेळेवर करणारी व्यक्ती एकापेक्षा जास्त वेळ कर्ज घेऊ शकते. अतुल्य ग्रुप ला अल्प पत पुरवठा करण्याचा कायदेशीर परवाना आहे..मित्रहो, गोरगरिबांसाठी मनापासून झटणारे बघितलेत कि माझे उर आनंदाने भरून येते. वास्तविक अतुल्य ग्रुप आणि महादेव जाधव या दोन्हींवर एवढ्यात सारे सांगणे शक्य नाही, पुढे नक्की कधीतरी त्यांच्यावर आणखी खूप खूप काही…

तूर्त एवढेच.


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *