तापलेले ठाणे ३ : पत्रकार हेमंत जोशी

तापलेले ठाणे ३ : पत्रकार हेमंत जोशी 

शिवसेनेत विशेषतः ठाणे जिल्हा प्रमुख असणे म्हणजे अप्रत्यक्ष आमदार होणे, हे पद नरेश म्हस्के यांनी खेचून आणले आहे, त्यातही काहींची आडकाठी होती, एकनाथ शिंदे यांचा आतून विरोध होता पण नरेश म्हस्के यांनी प्रेस्टिज इश्यू करून जिल्हा प्रमुख पद मिळविले त्यावर ते राजकीय ताकद पणाला लावून विराजमान झाले. विशेष म्हणजे यावेळी गणपती, नवरात्री आणि गोविंदा या ठाण्यातल्या गाजवून सोडणार्या उत्सवात सर्वत्र फक्त आणि फक्त नरेश म्हस्के यांचे पोस्टर्स वर मोठमोठाली छायाचित्रे झळकल्याने हा एकनाथ शिंदे यांना शह कि येणाऱ्या विधान सभा निवडणुकीची तयारी त्यावर मोठी चर्चा अख्य्या ठाणे राजकीय वर्तुळात रंगते आहे, ठाणेकर मोठ्या चवीने हा विषय चघळताहेत…


एकनाथ शिंदे राज्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री आहेत आणि नरेश म्हस्के ठाणे जिल्हा प्रमुख, दोघेही एकमेकांचे जिवलग मित्र आहेत पण एकनाथ हे राजकारणातले अमिताभ असतील तर नरेश हे अभिषेकच्या तोडीचे आहेत, क्रिकेटच्या भाषेत बोलायचे सांगायचे असेल तर एकनाथ हे ठाण्यातले सचिन तेंडुलकर आहेत तर नरेश म्हस्के यांना फार तर आजचा कृणाल पांडे म्हणता येईल. शेफ च्या भाषेत त्यांचे वर्णन करायचे असेल एकनाथ शिंदे हे संजीव कपूर आहेत त्यांच्यासमोर नरेश म्हस्के फारतर मारवाड्याच्या लग्नात बुंदीचे लाडू वळणारे किंवा डाल बाटीचा स्वयंपाक करणारे आचारी ठरावेत. दोघेही कट्टर शिवसैनिक आहेत, जिल्ह्यातली आणि ठाण्यातली शिवसेना वाढविण्यात या दोघांनीही मोलाची कामगिरी बजावली आहे. ज्या अनिल थत्ते यांनी धर्मवीर हा सन्मान आनंद दिघे यांना मिळवून दिला त्या दिघेंच्या पश्चात काही काळ काहीशी सैरभैर झालेली शिवसेना नंतरच्या काळात जोपासली ती या दोघांनीच म्हणजे शिंदे, म्हस्के या जोडगळीने….


आजही ठाण्यात नरेश म्हस्के किंवा अनंत तरे यांच्यासारखे सेनेतले मातब्बर नेते कोणती किमया घडवून आणू शकतात त्यावर रवींद्र फाटक यांचे उदाहरण पुरेसे ठरते. २०१४ च्या विधान सभा निवडणुकीत ठाण्यातून अनंत तरे आणि नरेश म्हस्के या दोघांनाही उमेदवारी हवी होती त्यांना डावलून तेथे त्यावेळेचे विद्यमान नगरसेवक रवींद्र फाटक यांना देण्यात आली, येथे त्या दोघांचीही म्हणे चांगलीच सटकली, त्यातून थेट सेनेच्या बालेकिल्ल्यात रवींद्र फाटक यांच्यासारखा बोलबाला असलेल्या दिलदार स्वभावाचा उमेदवार पराभूत झाला आणि फाटकांसमोर अगदीच कच्चे लिंबू वाटणारे भाजपाचे संजय केळकर पहिल्यांदाच मागच्या दराने नव्हे तर लोकांमधून निवडून आले, फाटक यांना पराभूत करून निवडून आले, हा झटका हा फटका तसा थेट एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यात अंजन घालणारा होता, तेथूनच खऱ्या अर्थाने ठाणे जिल्ह्यातल्या भाजपाने थेट ठाणे शहरात आणि जिल्ह्यातही बाळसे धरले, राष्ट्रवादीला शेकडो कोस दूर लांब ठेवून त्यांची जागा नंतरच्या काळात भाजपाने घेतली आज ठाणे जिल्ह्यात शिवसेनेनंतर दुसर्या क्रमांकावर अगदी शंभर टक्के, भाजपा ला स्थान आहे आणि ज्या भाजपाला शिवसेना कायम बांगला देशाची कमकुवत अशक्त क्रिकेट टीम समजते आहे, हेच भाजपावाले सेनेला धोबीपछाड मारून केव्हा जगज्जेता टीमच्या आवेशात पुढे येतील सांगता येत नाही कारण ठाणे जिल्ह्यातले अनेक मातब्बर निरंजन डावखरे यांच्यानंतर भाजपामध्ये प्रवेश घेण्यास इच्छुक व उत्सुक आहेत. भाजपाच्या बाबतीत जर पुढली पाच वर्षे जमेची असतील हे जर या चाणाक्ष मातब्बरांच्या ध्यानात आले तर सेनेत मोठ्या प्रमाणावर गळती होईल, हे नक्की आहे. तरीही सामान्य ठाणेकरांच्या कायम सुखदुःख्खात धावून जाणारी त्यांना अडीअडचणीत सहकार्य करणारी शिवसेना आणि त्यांचे नेते पदाधिकारी व ठाणे जिल्ह्यातलीभाजपा नेत्यांची मानसिकता यात मोठी तफावत असल्याने वाघ हे मरेपर्यंत वाघ म्हणूनच जगतात त्यांचे अल्पायुषी कमळ होत नसते हे देखील तेवढेच खरे आहे, ठाणे जिल्ह्यातील शिवसेना मोडीत काढणे आज तरी थेट ब्रम्हदेवाला देखील शक्य नाही…

तूर्त एवढेच :


 पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *