फडणवीस आडनावाची मिसळ : पत्रकार हेमंत जोशी

फडणवीस आडनावाची मिसळ : पत्रकार हेमंत जोशी 

अनेक उत्कृष्ट गायक गायिकांमधून एकच महागायक किंवा महागायिका निवडल्या जाते, सौंदर्य स्पर्धा तर मोठी कठीण, जगातल्या अनेक सुंदर तरुणींमधून मिस वर्ल्ड निवडल्या जाते, मुख्यमंत्री होणे हेही तसे अतिशय कठीण काम, अनेक महाभाग मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असतात पण त्यातल्या एकाचीच निवड होते. मला आठवते विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे या दोघांचे कायम लग्नानंतर दहा बारा वर्षांनी मुलं होणाऱ्या स्त्रीसारखे व्हायचे म्हणजे जरासे फुगलेले पोट दिसले कि आजू बाजूच्या बायका जशा दिवस गेले वाटते, पद्धतीने कुजबुज करून मोकळ्या होतात आणि नंतर त्यांना कळते कि गॅस पोटात साचल्याने अमुक एका बाईचे पोट फुगलेले दिसत होते ते तसे जिवंत सुशीलकुमार शिंदे आणि दिवंगत विलासराव देशमुख यां दोघांच्याही बाबतीत व्हायचे म्हणजे यावेळी फक्त आणि फक्त सुशीलकुमार किंवा फक्त आणि फक्त विलासराव अशी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत अगदी बेट लावून चर्चा रंगायची पण ऐनवेळी भलतेच नाव पुढे यायचे, माझ्या ओळखीच्या एका बाईंना लग्नानंतर तब्बल पंधरा वर्षांनी मुलं झाले जेव्हा त्या बाईचा नवरा वर्षभर तिच्यापासून दूर गेला तेव्हा. 

मला तर कधीकधी असे वाटायचे काँग्रेस हायकमांड प्रसंगी संजय जोग प्रकाश अकोलकर संजीव खांडेकर नाना मोने मधुकर भावे प्रताप आसबे भारतकुमार राऊत वैजयंती आपटे इत्यादींपैकी एखाद्याला मुख्यमंत्री करून मोकळे होतात कि काय पण ते घडले नाही, अगदीच त्यांनी राज्याचे वाटोळे केले नाही. अधून मधून तर शिवाजीराव निलंगेकरांना मांडीवर घेऊन बसणाऱ्या चाळीसगावच्या शांतिलालबापू जैनांना देखील मुख्यमंत्री झाल्याचे स्वप्न पडायचे…


माझे एक ठरलेले आहे जो कोणी मुख्यमंत्री होईल त्याचे त्याच्या कामांचे त्याने घेतलेल्या निर्णयांचे शक्यतो तोंडभरून कौतुक करायचे अपवाद एखादाच त्या अशोक चव्हाण यांच्यासारख्या अति वादग्रस्त मुख्यमंत्र्यांचा, नाही कधी यांच्यावर चार वाक्ये चांगली लिहावीत माझ्या मनाला वाटले. उद्या जर या राज्याचे मुख्यमंत्रीपद प्रसंगी एखाद्या नालायक पत्रकाराला किंवा एखाद्या भ्रष्ट मीडिया पर्सनला जरी चालून आले तरी मी त्याचे तोंड भरभरून कौतुक करेल, सांगता येत नाही या राज्याचे मुख्यमंत्रीपद कोणाच्या नशिबात मांडून ठेवलेले आहे, उद्या अमुक एखादा सजा भोगून तुरुंगातून सुटून आलेला देखील मुख्यमंत्री होऊ शकतो, भुजबळांना तर अद्याप तशीही सजा लागलेली नाही…अनेकांच्या मते फडणवीस ब्राम्हण नसते आणि मराठा असते तर त्यांना आज जो त्रास होतो तो झाला नसता, माझे नेमके याउलट मत आहे, एकतर फडणवीस यांना त्यांच्या जातीमध्ये मुख्यमंत्री होतांना फारशी स्पर्धा नव्हती एक गडकरी सोडले तर याउलट फडणवीसांच्या ऐवजी एखाद्या पाटलाचे नाव पुढे आले असते तर क्षणार्धात त्याला पाटलांमधूनच असंख्य प्रतिस्पर्धी निर्माण झाले असते, नेमके विलासरावांच्या बाबतीत हेच घडायचे, प्रत्येकवेळी भलत्याच पाटलाचे मराठ्यांचे नाव पुढे यायचे आणि त्यांना मुख्यमंत्रीपद हुलकावणी द्यायचे. देवेंद्र फडणवीस नेमके कसे हा अनेकांना पडलेला प्रश्न त्यावर मी अनेकांना म्हणतोही जेथे हे महाशय त्या अमृता यांना नीटसे कळलेले नाहीत तेथे तुम्ही कोण हो सांगणारे कि फडणवीस नेमके कसे. एक मात्र नक्की जसे पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असतांना केंद्र सरकारच्या पावलावर पाऊल टाकून त्यांचे सरकार पुढे पुढे सरकवत न्यायचे कारण त्यांनी पंतप्रधान कार्यालयात काम केलेले असल्याने आणि त्यांच्या आयुष्यातली अनेक वर्षे त्यांनी दिल्लीत घालविली असल्याने त्यांना नेमके समजायचे हे लक्षात यायचे कि केंद्राला साजेशे सरकार कसे हाकायचे त्यामुळे खुद्द शरद पवार देखील पृथ्वीराज चव्हाण यांना टरकून असायचे. मात्र फडणवीसांच्या बाबतीत मला नेमके हे कळत नाही हे महोदय हुबेहूब पृथ्वीराज चव्हाणांच्या पावलावर पाऊल ठेवून कसे काय केंद्र सरकारशी आणि थेट पंतप्रधानांशी जुळवून घेत त्या सर्वांच्या गळ्यातले ताईत बनून वावरताहेत आणि वस्तुस्थिती अशी कि याच फडणवीसांनी कधीही दिल्लीत बसून राजकारण केले आहे किंवा भाजपा पदाधिकारी म्हणून काम केलेले आहे, मला वाटते सततचा राजकारणावरला अभ्यास, दिल्लीतला मित्रांचा गोतावळा, बोलका स्वभाव आणि अफाट वाचन त्यातून हे असे व्यवस्थित घडून आले असावे, घडून येत असावे, घडून आले असावे…

क्रमश :

पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *