गोंधळी भाजपा वेंधळी सेना : पत्रकार हेमंत जोशी


गोंधळी भाजपा वेंधळी सेना : पत्रकार हेमंत जोशी 

बुद्धीची देवता आपल्यावर प्रसन्न आहे समजणाऱ्या राज्यातल्या भाजपा नेत्यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी जनमत लोकमत आपल्या बाजूने फारसे नाही हे अजिबात लक्षात आले नाही याचे आश्चर्य वाटते. राजकारण किंवा निवडणूक हा काय हिंदी सिनेमा कि शरद पवारांना म्हणे चंद्रकांत पाटलांना हे दाखवून द्यायचे होते  कि ते कोल्हापुरातून नव्हे तर पवारांच्या पुणे जिल्ह्यातून म्हणजे बालेकिल्ल्यातून निवडणूक जिंकून येऊ शकतात. केवळ या हट्टापायी राज्याचा एका प्रमुख पक्षाचा तेही फडणवीसांनंतर प्रभावी ठरलेला प्रदेशाध्यक्ष केवळ एका अशा मतदारसंघात अडकून पडतो जेथे मेधा कुलकर्णी अगदी सहज निवडून येणे शक्य होते, मेधा कुलकर्णींविषयी मतदार संघात नक्की नाराजी होती पण त्या पराभूत होणे अशक्य होते, झाले काय चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष असूनही पुण्यात अडकून पडले साहजिकच त्यांना ना राज्यात फिरता आले प्रचाराला जाता आले ना त्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यात त्यांना ठाण मांडून बसता आले…

चंद्रकांत पाटील पुण्यात अडकून पडलेले मग प्रदेशाध्यक्ष ऐन विधानसभा निवडणुकीदरम्यान कोण, भाजपा नेते जेव्हा या गोंधळात अडकलेले आहेत जेव्हा हे फडणवीसांच्या लक्षात आले, त्यांनी मग एक केले आपले विश्वासू साथीदार प्रसाद लाड यांना भाजपा कार्यालयात अप्रत्यक्ष प्रदेशाध्यक्ष म्हणून आणून बसविले. जरी प्रसाद लाड एक आमदार किंवा युवा नेते म्हणून काहीसे अनुभवी असले तरी नवख्या भाजपा मध्ये त्यांना विधानसभा निवडणूक सांभाळणे नक्की जड जाणार होते, नेमके तेच घडले, प्रसाद लाड यांनीं प्रचंड मेहनत घेतली पण चंद्रकांत पाटलांची बरोबरी करणे त्यांना शक्य नव्हते, भाजपाकडून हे असे बेशिस्त नियोजन अपेक्षित नव्हते. असे वाटते फडणवीसांनी पार पडलेली विधानसभा निवडणूक फार मोठ्या प्रमाणावर तेही अगदीच कच्च्या लिंबूंना घेऊन अंगावर घेतली आणि स्वतःचे मोठे नुकसान करवून घेतले. असे नाही कि देवेंद्र फडणवीस आता राजकारणातून संपले, नेव्हर, ते संपणारे नेते नाहीत याउलट ते यापुढे अधिक सावध पवित्रा घेत नक्की पुढे जातील, पुन्हा राज्यात किंवा त्यांच्या पक्षात भल्याभल्यांना मागे टाकतील…

आता काय फडणवीसांचे महत्व संपले आहे, व्हा त्यांच्यापासून बाजूला असा क्षणिक स्वार्थी विचार करणारे नेते किंवा मित्र नक्की पुढे पश्चाताप करतील याची खात्री बाळगावी. जत्रेत कमावलं नि तमाशात गमावलं अशी मात्र आज भाजपाची या राज्यातली अवस्था आहे कारण सतत पाच वर्षे फडणवीस यांना प्रत्येक ठिकाणी राजकीय दृष्ट्या यश मिळत गेले पण अगदी शेवटच्या टप्प्यात त्यांना हुशार शरद पवारांनी मागे खेचले, खिंडीत गाठून जनमत शरद पवारांनी मोठ्या खुबीने आपल्या बाजूला नेले. विशेषतः अनेक योजना आणूनही राज्यातली ग्रामीण जनता फडणवीसांच्या बाजूने उभी न राहता त्यांनी पुन्हा पवारांना जवळ केले. ज्या फडणवीसांकडे आम्ही उद्याचे देशाचे नेते केंद्रातले महत्वाचे अधिकारी म्हणून बघत होतो ते या क्षणी नक्की काहीसे मागे पडले आहेत पण मला शंभर टक्के खात्री आहे कि फडणवीस हे अतिशय सच्चे नेते असल्याने, त्यांचे सारे हेतू प्रामाणिक असल्याने ते नक्की पुन्हा एकवार फिनिक्स पक्षाच्या भूमिकेत शिरून भरारी घेतील, पुढे जातील. विधानसभा निवडणुकांपूर्वी जसे जनमत फडणवीसांच्या भाजपाच्या विरोधात गेले होते आज तीच वेळ उद्धव ठाकरे यांच्यावर येऊन ठेपलेली आहे, त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीला जाऊन बिलगणे मिठी मारणे राज्यातल्या एकालाही आवडलेले नाही, उद्धव यांनी आपली लोकप्रियता मोठ्या प्रमाणावर गमावलेली आहे. एक मात्र बरे घडले पवारांच्या तोडीस तोड नेता त्यांना जेरीस आणू शकणारा नेता फडणवीसांच्या रूपाने या राज्यात आता तयार झाला आहे…

तूर्त एवढेच : हेमंत जोशी. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *