पवार बोले उद्धव डोले : पत्रकार हेमंत जोशी

पवार बोले उद्धव डोले : पत्रकार हेमंत जोशी 

माझ्या पुढल्या वाक्यावर तुमच्यातले काही मला शिव्या हासडतील शिवीगाळ करतील दोष देतील टोमणे हाणतील शिव्याशाप देतील वेडा म्हणतील गाढव ठरवतील. माझे वाक्य असे कि उद्धव ठाकरे शिवसेनाप्रमुख म्हणून दिवंगत बाळासाहेबांपेक्षा अधिक यशस्वी आहेत, बाप से बेटा सवाई आहे, बाळासाहेब हे सेनेतले दिलीपकुमार होते पण उद्धव हे अमिताभ आहेत, बाळासाहेब हे सचिन तेंडुलकर होते पण उद्धव तर थेट विराट कोहली आहेत ते धोणीच्याही पुढे निघून गेले आहेत म्हणून सेनेतील जो तो बुजुर्ग किंवा राज्याच्या राजकारणातला जो तो अनुभवी अगदी बेंबीच्या देठापासून ज्याला त्याला हेच सांगत सुटलाय कि उद्धव सेनाप्रमुख म्हणून अधिक योग्य अधिक उजवे त्यांनी मंत्रालयात कधीही पाय ठेऊ नये, याउलट अख्खे मंत्रालय उद्धव यांच्या एका हाकेवर मातोश्रीवर धावत पळत यावे. पुढले  वाक्य तर आणखी डेंजरस आहे त्या वाक्याने कदाचित माझ्या घरावर मोर्चे निघतील मला तोंड लपवत रस्त्याने फिरावे लागेल किंवा बेमालूम वेषांतर करून एखाद्याला भेटायला जावे लागेल किंवा कुठेतरी लपून बसावे लागेल थोडक्यात तोंड लपवत पुढले काही दिवस जगावे राहावे लागेल….

वाक्य असे कि, पत्रकारितेत मी अगदीच ज्युनियर होतो तेव्हापासून अगदी लहान वयात असतांना मी पत्रकारितेत आलो आणि अंतुले ते ठाकरे सारेच्या सारे मी ओळखत होतो म्हटल्यापेक्षा मला अंतुले  ते ठाकरे सारेच्या सारे मुख्यमंत्री जवळून ओळखत होते माझी पत्रकारिता ते जवळून पाहत आले किंवा  न्याहाळत आले, अंतुले ते ठाकरे यादरम्यान जे जे मुख्यमंत्री झाले त्यांच्यात सर्वाधिक यशस्वी सवाई पराक्रमी मुख्यमंत्री म्हणून कोण असे मूल्यमापन करणे नक्की शक्य नाही अशक्य आहे सांगणे कठीण आहे, काही अयशस्वी कोण होते कदाचित एखाद्याला सांगताही येईल पण माझी भीती फार वेगळी आहे याक्षणी माझा पत्रकारितेतला प्रदीर्घ अनुभव निदान माझ्या मनाला वारंवार हेच सांगतो आहे कि आजवर अंतुले यांच्यासहित ठाकरे यांच्यापर्यंत जे जे मुख्यमंत्री झाले त्यात सर्वाधिक अपयशी फेल्युअर मुख्यमंत्री  असा ठप्पा असा कायमस्वरूपी नापास शेरा उद्धव ठाकरे यांना बसू शकतो निदान आजतरी असेच नेमके  त्यांच्याबतीतले चित्र आहे जे त्यांना समस्त शिवसैनिकांना त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या तमाम मराठी बंधू व भगिनींना धक्का देणारे अस्वस्थ करून सोडणारे आहे. उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री होणे त्याचे वर्णन नेमक्या एका वाक्यात सांगायचे झाल्यास कावळा बसला आणि नेमकी त्याचवेळी फांदी तुटली… 


www.vikrantjoshi.com

एखाद्या बागेत प्रेमी युगुलांनी झाडाच्या आड चुंबन घेण्यासाठी ओठाचा चंबू करावा आणि त्याचवेळी पाठीमागून पोलिसांनी त्यांच्या कानात शिट्टी फुंकावी किंवा मागच्या दाराने प्रियकराने दबकत दबकत प्रेयसीच्या घरात प्रवेश करावा नेमका त्याचवेळी पुढल्या दराने तिच्या बाउंसर असलेल्या नवऱ्याने घरात प्रवेश करावा तसे उद्धव यांना मुख्यमंत्री होणे महागात पडले आहे अजिबात ध्यानी मनी नसतांना कोरोना व्हायरस ने उद्धव यांना मोठा दगा दिला त्यांच्या जणू मानगुटीवर येऊन बसला आहे अशाप्रकारे हनिमूनला निघालेल्या जोडप्याच्या जणू गाडीचे चाक हॉटेल येण्यापूर्वीच रस्त्यात पंचर झाले आहे. अलीकडले आघाडीचे आपापसात लागलेले भांडण किंवा उद्धव यांच्या विरोधातले बंड केवळ वरकरणी शांत झाले आहे अशी माझी खात्री आणि माहिती आहे. एवढेच सांगतो, काका पहेलवानांनी या पिटुकल्या बंडाच्या माध्यमातून थोडक्यात सांगायचे झाल्यास एकाच दगडात अनेक पक्षी तेही काँग्रेसच्या खांदयावर बंदूक ठेऊन अनेक शिकारी केल्या आहेत. पुण्याचे भोसले आणि मंत्रालयातले मेहता तुम्हा दोघांना मी याक्षणी हेच सांगतो यापुढे तुम्ही दोघे नव्हे तर शरद पवार सांगतील आणि उद्धव हो अशी मान डोलावतील… 

तूर्त एवढेच : हेमंत जोशी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *