अग्ग्बाई ! असे केले तर होईल का ? पत्रकार हेमंत जोशी


अग्ग्बाई ! असे केले तर होईल का ? पत्रकार हेमंत जोशी 

एकदा माझा मित्र सांगत होता कि त्याने फेसबुकवर त्याचा फोटो टाकला तेव्हा ६० लाईक्स आले आणि ७ कमेंट्स आल्या, नंतर त्याने त्याचा व पत्नीचा फोटो टाकला तेव्हा ३०० लाईक्स आले आणि ४० कमेंट्स आल्या, त्यानंतर त्याच्या बायकोने किंचितसा पदर ढळलेला फोटो टाकला, गेले सहा महिने झाले आजही त्या फोटोला लाईक्स येतात आणि कमेंट्सचा तर पाऊस पडतोय. ह्याला म्हणतात भारतीय पुरुषांची लैंगिक, विकृत मानसिकता त्यामुळे अमुक एखाद्या पुरुषावर विश्वास ठेवतांना स्त्री मग ती १६ वर्षांची असो अथवा ६० वर्षाची शंभर वेळा तरी विचार करते कारण तिला हे नेमके माहित आहे कि काही थेट विचारतील आणि काही वेळ घेतील पण भारतीय पुरुषाचा विषय शंभर टक्के लैंगिक विकृतीवरच येऊन ठेपतो. आज करोना व्हायरस मूळे आपण सारेच मृत्यूच्या दारात उभे आहोत, सारे घरात बसून आहेत त्यामुळे काही स्त्रियांना तुम्हा पुरुषांकडे एखादे महत्वाचे काम पडू शकते, अडचण येऊ शकते पण अमुक एका ओळखीच्या पुरुषाची मदत घ्यावी किंवा नाही त्यावर त्या खूप विचार करून तुम्हा पुरुषांकडे अप्रोच होतील हे नक्की आहे…

कोणत्याही प्रकारचे सहकार्य लागले तर या कठीण दिवसात मी आपल्या पाठीशी आहे असे आव्हान मी माझे भ्रमणध्वनी देऊन केले होते त्याला छान रिस्पॉन्स मिळाला, अप्रोच होणारे सुरुवातीला मला पण भीत भीतच अप्रोच झाले असावेत पण माझा हेतू निर्मल आहे हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते बिनधास्त त्यांच्या अडचणी सांगून मोकळे झाले. त्यातले जवळपास

पाच काहीसे वयस्क स्त्री पुरुष तर एकटे असल्याने त्यांना टेन्शन घालवायचे होते, माझ्याशी सतत गप्पा मारण्यातून त्यांचे मन बऱ्यापैकी हलके झाल्याचे त्यांनी सांगितले. वास्तविक अनेक वादग्रस्त विषय लिखाणासाठी माझ्याकडे पेंडिंग आहेत पण आपण थेट मृत्यूच्या दारात उभे असल्याने, विरोधात लिखाण करून अमुक एखाद्याचे मन दुखवावे, वाटत नाही तेव्हा माझे नेहमीचे तिखट वात्रट जहाल लिखाण हे करोना संकट संपल्यानंतरच तुम्हाला वाचायला मिळेल….

परवा एका पत्रकार मित्राचा नाशिक वरून फोन आला तो म्हणाला कि त्याच्या जवळचे एक जोडपे भोपाळला अडकले आहे आणि त्यांचा लहान मुलगा येथे नाशिक मध्ये म्हाताऱ्या आजी आजोबांबरोबर आहे त्यामुळे त्यांना कोणत्याही परिस्थितीत नाशिकला पोहोचणे गरजेचे आहे. पण महाराष्ट्रात त्यांनी प्रवेश केल्या केल्या त्यांना धुळे जिल्हा पोलीस नक्की अडवतील. त्याला डिटेल्स मला व्हाट्सअप करायला सांगितले, नंतर त्याने पाठविलेला व्हाट्सअप मी जसाच्या तसा हेमा आणि अनिल गोटे दाम्पत्याला धुळ्याला फॉरवर्ड केला आणि त्या जोडप्याचे काम झाले, ते वेळेत सुखरूप नाशिकला पोहोचल्याचा मला मित्राचा फोन आला. यादिवसात अशी छोटी छोटी पण त्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची कामे अडून  पडतील, किमान या संकटात तरी मला अमुक केले तर काय मिळेल, हा नेहमीचा स्वभाव विकृती बाजूला ठेवून या अतिशय गंभीर कठीण प्रसंगी इतरांसाठी धावून जावे. विशेषतः जे घाबरले आहेत त्यांचे समुपदेशन करणे आपले कर्तव्य आहे, समजून काम करावे, सहकार्य करावे…

छान वाटते बघितले किंवा कानावर आले कि जसे पत्रकार अभय देशपांडेने भाजी कापताना त्याचा फोटो फेसबुक वर असा काही पोज देऊन टाकला आहे कि जणू काही याआधी त्याला घरी कधी अशी कामे करावीच लागली नाहीत. लब्बाड कुठला, गणपतीच्या दिवसात घरी येणाऱ्यांना देण्यासाठी चिवडा असो कि वहिनींच्या कपड्यांना इस्त्री, हैमावहिनींच्या केवळ एका इशाऱ्यावर झटपट सेवा देणारे हे महाशय उगाचच असा खोटा खोटा फोटो टाकून मोकळेझाले आहेत. थांबा थोडे, अजितदादा पोळ्या लाटताहेत, छगन भुजबळ वरण  भाताचा कुकर लावताहेत, राधेश्याम मोपलवार झाडू पोछा करताहेत असे अनेक विविध फोटो तुम्हाला नक्की बघायला मिळणार आहेत…

तूर्त एवढेच : हेमंत जोशी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *