गल्लीत गोंधळ दिल्लीत वेंधळे : भाग २: पत्रकार हेमंत जोशी

गल्लीत गोंधळ दिल्लीत वेंधळे : भाग २: पत्रकार हेमंत जोशी 

शाळेत असतानांचे दिवस आठवा, वर्गातली जे विद्यार्थी टापटीप वरून श्रीमंत किंवा प्रतिष्ठित कुटुंबातले, मॅडम अशांचे कित्ती कित्ती म्हणून लाड करायच्या, कुठे त्यांचे गाल ओढ कुठे त्यांची पप्पी घेणे अशांकडे बघून गोड गोड मंद मंद स्मित करणे, भरलेल्या अख्या वर्गात त्यांचे जाहीर कौतुक करणे, विशेष म्हणजे या अशा विद्यार्थ्यांनाही नेमके कळायचे कि कुठे लाजायचे कुठे लाजत लाजत हसायचे, कोणी बघत नाही असे पाहून मॅडमला पप्पी कशी द्यायची त्यांच्याकडून लाड कसे करून घ्यायचे कुठे बागडायचे केव्हा शांत बसायचे केव्हा उनाडक्या करायच्या कोणाशी डॉक्टर डॉक्टर खेळायचे, विशेष म्हणजे या अशा लाडक्या विद्यार्थ्यांसमोर गिरा दे अपना पल्लू असेही झाले तरी मॅडम दुर्लक्ष करायच्या. पुढे  असे विद्यार्थी फारतर शाळामास्तर व्हायचे, वर्गातले उनाड दांगट हुशार मात्र आयुष्यात फार मोठे झाल्याचे चित्र आपण कायम पाहत आलो आहोत. भाजपमध्ये पण असा विद्यार्थी होता, देवेंद्र फडणवीस त्याचे नाव मात्र श्रेष्ठींना वाटले आता हा देखील उनाडक्या करायला लागलाय, ज्या उनाडक्या श्रेष्ठींसाठी डेंजरस स्पर्धा ठरू शकतात मग श्रेष्ठींनी लाडक्या विद्यार्थ्यांची जागा आता फडणवीस ऐवजी विनय सहस्त्रबुद्धे नामक हुशार पण उनाड नाही या विद्यार्थ्याने घेतली आहे, विनयजींचे लाड ते तसेच होतात जे शाळेतल्या त्या विद्यार्थ्यांचे व्हायचे…

महत्वाचा मुद्दा हा कि नरेंद्र मोदी आणि अमित शाह या जोडगळीने विशेषतः राजकारणातल्या अत्यंत तल्लख ताकदवान दूरदर्शी कठोर प्रसंगी अतिशय पाषाणह्रदयी अशा या जोडगळीने नेमके काय करून ठेवले आहे हे राज्यातल्या कुठल्याही पक्षाच्या कोणत्याही विचारांच्या नेत्यांच्या लक्षातच आले नाही कि या दोघांनी अति खुबीने दिल्लीत महाराष्ट्रातले सर्वपक्षीय नेतृत्व धीम्या गतीने पण आश्वासक पद्धतीने सुपडासाफ केले आहे. आता तर दिल्लीत महाराष्ट्र औषधाला पण आक्रमक होतांना दिसतांना सापडत नाही आणि हि  सारी शाह व मोदी या जोडगळीची किमया आहे त्यासाठी त्यांना त्यांच्या अत्यंत लाडक्या जवळच्या म्हणाल तर शिष्याचा म्हणाल तर नेत्याचा म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय बळी घ्यावा लागला आहे जे मोदींना रुचले नाही पण अमित शाह यांना नक्की मनातून मनापासून आवडलेले आहे. वर दिल्लीत शाह यांच्यापेक्षा मोदी यांचाच वरचष्मा असल्याने कोणत्याही क्षणी राज्यात किंवा कदाचित केंद्रात अगदी शंभर टक्के देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय पुनर्वसन निश्चित होईल अगदी शंभर टक्के होईल पण केव्हा केले जाईल आज कोणालाही ते सांगता येणे अशक्य आहे. आणि हे असे दिल्लीत महाराष्ट्राच्या कोणत्याही नेतृत्वाला नोव्हेअर करणे केवळ राज्यातल्या एकाच नेत्याच्या थोडेसे उशिरा का होईना लक्षात आले होते पण तेव्हा वेळ निघून गेलेली होती आणि ते नाव आहे श्री श्री शरद पवार…


www.vikrantjoshi.com

सर्व श्री विनय सहस्त्रबुद्धे प्रकाश जावडेकर किंवा तत्सम राज्यातल्या पण दिल्लीत जाऊन बसलेल्या कोणत्याही अन्य पक्षीय किंवा भाजपा नेत्यांची या जोडगळीला अजिबात काळजी चिंता स्पर्धा भीती वाटत नाही, जावडेकर तर पुण्यातले हुशार ब्राम्हण त्यांना आपल्या राजकीय मर्यादा तंतोतंत पाठ आहेत आणि त्यांचे तसेही महाराष्ट्रात मन लागत नसल्याने त्यांनी आपले स्थान अबाधित ठेवण्यासाठी अगदी सुरुवातीपासून स्वतःचा कुडमुड्या जोशी कडे असणारा पिंजऱ्यातून बाहेर येऊन नेमकी पोपटपंची करणारा विठू विठू पोपट करून घेतला आहे. सांगतील तेवढे मुखोद्गत बोलून मोकळे व्हायचे आपले स्थान अबाधित राखायचे हे त्यांना नेमके जमले आहे आणि हे असे वागण्यात त्यांची चूक आहे वाटत नाही विशेष म्हणजे त्यांनी स्वतःचा कधीही मुंडे महाजन गडकरी करून घेतला नाही. एकेकाळी मिसेस हेगडे कशा छान छान साडया नेसून पती डॉ जगन्नाथ हेगडे यांच्याबरोबर मंत्रालयात मिरवून घ्यायच्या, प्रकाश जावडेकरांना दिल्लीतल्या नेमक्या त्या त्या वेळेच्या प्रभावी नेतृत्वासमोर स्वतःचा मिसेस हेगडे करवून घेण्यात यश आले आहे मग ते श्रेष्ठी पूर्वीचे अडवाणी महाजन असतील किंवा आजचे शाह मोदी किंवा उद्याचे अन्य इतर असतील….

माझा या आधीचा लेख वाचा तो ज्यांच्यावर आधारित आहे ते आहेत श्रीमान नितीनजी गडकरी, ज्यांची माझी म्हणाल तर मैत्री आहे पण जवळीक यासाठी नाही कि 1995 मध्ये गडकरी जेव्हा राज्यात सार्वजनिक बांधकाम व उपक्रम या खात्याचे मंत्री झाले त्यानंतर वर्षभरातच ते नेमके कसे मी त्यांना ओळखले आणि लिहिलेही त्यामुळे तेव्हापासून गडकरी यांना माझा जो राग आला तो आजतागायत टिकून आहे आणि जे मी गडकरी यांना सांगितले होते कि तुमच्या या लोभामुळे सवयीमुळे वृत्तीमुळे तुमचे मोठे राजकीय नुकसान होईल, मी हे त्यांना तेव्हाही आजही अतिशय पोटतिडकीने सांगत असे किंबहुना तुम्हाला मुंडे महाजन यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याची अजिबात गरज नाही आवश्यकता नाही सांगत असे त्यांना माझा राग येतो यायचा पण त्यांच्या त्याच पैशांच्या लोभातून पुढे मुंडे महाजन झाला. ते गेले हे राहिले तेवढाच काय तो फरक. अर्थात गडकरी  यांची देशाला गरज आहे त्यामुळे ते शंभर वर्षे जगावेत पण माझे त्यांनी मनावर घेतले नाही माझ्या स्पष्ट सांगण्याची त्यांनी ब्लॅक मेलर म्हणून बदनामी केली, कर नाही त्याला डर कशाला त्यामुळे या अशा बदनामीची मी आयुष्यात चिंता केली नाही पण गडकरी यांना आपले कुटुंब श्रीमंत करण्यात असलेला लोभ शाह मोदी या जोडगळीने नेमका हेरला गडकरी यांचे पुरावे जमा केल्या गेले, आजही जातात, ज्यातून या महान तडफदार दिलदार उत्तम वक्त्याला आणि कुशल संघटकाला या ग्रेट मराठा नेत्याला नेतृत्व स्थानबद्ध केल्यासारखे कायम जखडून ठेवण्यात आले आहे आणि अशा अस्वस्थतेतूनच नितीन गडकरी आपले प्रकृती स्वास्थ्य गमावून बसलेले आहेत…

शरद पवार असोत कि उद्धव ठाकरे आणि राज्यातली भाजपा किंवा दिल्लीत नेतृत्व करणारे राज्यातले अन्य नेते, देश केवळ स्वतःच्या हातात ठेवण्यासाठी शाह मोदी या जोडगळीने भलेही राज्यातली भाजपाची सत्ता अगदी जाणून बुजून गमावली हातची घालवली पण त्यांनी महाराष्ट्रातले दिल्लीत जड ठरू शकते असे सारे नेतृत्व अख्खे नेते येथे महाराष्ट्रात आपापसात झुंजत ठेवण्यात पूर्ण यश मिळविलेले आहे ज्यात त्यांची अजिबात चूक नाही कारण तो राजकीय गेम खेळी यशस्वी करण्याचा एक भाग आहे त्यांना ते जमले आणि आमच्या मराठी नेत्यांनी इतिहास ज्यापद्धतीने घडला आहे नेमके तेच यावेळी देखील केले, आपापसात भांडत बसले आणि राज्याचे मोठे नुकसान त्यातून करवून घेतले. शरद पवार यांच्यासारख्या देशपातळीवरच्या बलाढ्य नेत्याला येथे गल्लीत बांधून ठेवले, नितीन गडकरी यांची कोंडी करून ठेवली, निदान आजतरी शिवसेना बऱ्यापैकी खिळखिळी करून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाविषयी खुबीने प्रश्नचिन्ह निर्माण करून ठेवले आणि देवेंद्र फडणवीस महापराक्रमी हुशार नेत्याचा पार अभिमन्यू करून ठेवला. राज्याची केंद्रावर पकड नसल्याने कोरोना नावाची महामारी रोखण्यात राज्याला संपूर्ण अपयश आले आहे ज्याची फार मोठी किंमत उद्धव ठाकरे यांना नक्की नजीकच्या भविष्यात मोजावी लागणार आहे. मनाला वेदना होतात पण माझ्यासारखा सामान्य पत्रकार काय करू शकतो ? 

तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

Comments 2

  1. Avatar Pramod Choudhari says:

    सर नमस्कार, अत्यंत अभ्यासपूर्ण लेख. एकदम खर आहे. मी नेहमी तुमचे लेख वाचतो. विक्रांतच्या पोस्ट पण खूप आवडतात. धन्यवाद !

  2. Avatar Pramod Choudhari says:

    सर नमस्कार, अत्यंत अभ्यासपूर्ण लेख. एकदम खर आहे. मी नेहमी तुमचे लेख वाचतो. विक्रांतच्या पोस्ट पण खूप आवडतात. धन्यवाद !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *