पराग पार्ले महोत्सव २ : पत्रकार हेमंत जोशी

पराग पार्ले महोत्सव २ : पत्रकार हेमंत जोशी 

मुंबई भाजपामधले एक हटके उदाहरण येथे खास मुद्दाम तुमच्यासाठी, बांद्र्याचे आमदार आशिष शेलार, पार्ल्याचे आमदार पराग अळवणी, पार्ले पूर्वेला राहणारे पण बोरिवलीचे आमदार, आजचे नामदार विनोद तावडे आणि कांदिवलीचे आमदार अतुल भातखळकर हे चौघेही तसे समवयस्क एकमेकांचे विद्यार्थी परिषदेचे, विद्यार्थी असतांनापासूनचे खास मित्र, हे सारे घडविल्या गेले दिवंगत प्रमोद महाजनाकडून, त्यांचे सर्वांचे एकमेकांशी कौटुंबिक संबंधही, तसे या सर्वांना विनोद तावडे फारतर वयाने चार दोन वर्षे सिनियर असावेत पण ‘ मनाने ‘ सर्वाधिक तरुण, त्यांच्या खालोखाल मनाने सर्वाधिक तरुण कोण, तसा वादाचा मुद्दा, म्हणून येथेच तो सोडून देतो पण चारही मित्र एकाचवेळी लागोपाठच्या मतदारसंघात आमदार म्हणून निवडून यावेत, क्वचित घडते, सतत जे इतरत्र बघायला मिळते ते येथे नाही म्हणजे त्यांचे आपापसात वाद नाहीत, एकमेकांवर जळणे नाही, आहे ती निकोप स्पर्धा, आणि ते कौटुंबिक संबंध ठेवून आहेत तेही एक छान उदाहरण, आशिष शेलार यांना सुरुवातीला तशी राजकीय ताकद नक्कीच विनोद तावडे यांनी दिली पण आपण पायावर धोंडा मारून घेतला असे त्यांना कधी वाटले नाही, प्रसंगी राजकीय स्पर्धेत आशिष पुढे गेले तरी, कुरबुरी त्यांच्यात देखील आहेत, होतात पण त्याचे रूपांतर कधीही जाहीर वाद घालून नाही, ते सारे एकमेकांच्या हातात हात घट्ट पकडून राजकीय मैदान गाजवून मोकळे होताहेत, तसे चौघेही राजकारणातले चांगल्या अर्थाने मास्टरमाइंड, कोण केव्हा कुठे कशात पुढे जाईल त्यांना ते एकमेकांनाही माहित नसते, ठाऊक नाही पण त्यांची यारी निदान आजपर्यंत तरी अबाधित आहे, या समवयस्कांचा आणखी एक मित्र आहे, देवेंद्र फडणवीस, या फडणवीसांनी किंवा मुंबई अध्यक्ष शेलारांनी तिकडे पार्ले पूर्वेचे काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार, दिवंगत रमेश प्रभू यांचे जावई श्रीमान कृष्णा हेगडे यांना भाजपामध्ये सामावून घेतले तरीही काकणभर देखील पराग आळवणी नाराज अस्वस्थ झालेले नाहीत, हेगडे आधी पक्षात नव्हते आणि आज असलेत तरीही कधीही पराग अळवणी त्यांच्याविषयी उगाचच उलटसुलट बोलून मोकळे होत नाहीत, हेगडे यांची रेषा पुसण्यात विकृत आनंद घेण्यापेक्षा आपली रेषा अधिक कशी मोठी, त्याकडे मी लक्ष देतो, अळवणी म्हणाले. तसेही मला वाटते, कृष्णा हेगडे इकडे पार्ल्यात नव्हे तर तिकडे कलीना विधान सभा मतदार संघात पुढल्या निवडणुकीची तयारी करताहेत, जेथे शिवसेनेच्या संजय पोतनीस यांच्यासमोर भाजपचे उमेदवार केवळ बाराशे मतांनी पराभूत झाले होते. असेही आता म्हणता येईल, आधी शेलार, भातखळकर, अळवणी आणि तावडे असे या भाजपामध्ये एकमेकांचे चार मित्र होते, हेगडे आल्याने संख्या पाच होईल, त्यांना दूर ठेवले जाईल, असे हे चारही वागणारे नाहीत, येथे विशेष कौतूक आमदार पराग अळवणी यांचेच, माझ्या डोक्यावर हि काय सवत आणून ठेवली, हे भाव चेहऱ्यावर किंवा तसे विचार मनात आणणारे ते नाहीत, कौतुक वाटते…


बायकोने चार बायकांना संक्रांतीला साधे हळदी कुंकवाला जरी बोलावले तरी घरातल्या सर्वांना खूप थकायला होते, इकडे त्या पार्ल्यात, सत्तेत असतांनाही किंवा नसतांनाही म्हणजे पराग अळवणी आणि ज्योतीवहिनी नगरसेवक होते, किंवा नव्हते, पराग आमदार नव्हते तेव्हाही ज्या भव्य प्रमाणावर पार्ले महोत्सव भरविल्या जातो आणि त्या माध्यमातून केवळ विले पार्ले विधान सभा मतदार संघात नव्हे तर उभ्या मुंबईतून जी क्रीडा, कला, सांस्कृतिक चळवळ जपल्या जाते, सलाम या अळवणी यांनी केवळ ३० दिवसांच्या जन्मलेल्या बाळापासून तर ८५ वय वर्षे असलेल्या वृद्धांपर्यंत साऱ्यांसाठी हे व्यासपीठ ज्या पद्धतीने खुले आहे, त्यावर बोलावे लिहावे तेवढे कमी, म्हणजे ३० दिवसाच्या आतल्या बाळाला आपण घराबाहेर काढत नाही अन्यथा येथे त्यांचीही एखादी स्पर्धा घेतल्या गेली असती, अळवणी दाम्पत्य आणि त्यांचे तब्बल ७००-८०० सहकारी वर्षभर मेहनत घेतात, त्यातून हा महोत्सव मोठ्या दिमाखाने पार पडतो. मला तर वाटते, निवडणूक मग ती कोणतीही असो, अळवणी दाम्पत्याचे मतदार येथेच पक्के होत असावेत, बांधल्या जात असावेत, अत्यंत महत्वाचे म्हणजे, पार्ले महोत्सव पार पडणारे, त्यात स्वयंसेवक म्हणून हिरिरीने भाग घेणारे केवळ भाजपाचेच स्वयंसेवक असावेत असे अजिबात नसल्याने विविध विचारांचे, अनेकविध पक्षांचे कार्यकर्ते येथे कधी स्पर्धक म्हणून तर कधी स्वयंसेवक म्हणून इकडून तिकडे पळतांना दिसतात, फार छान वाटले जेव्हा चक्क पार्ले पूर्वेच्या त्या मैदानावर मी थेट बुरखा घालून स्पर्धेत आपल्या मुलांना घेऊन आलेल्या मुस्लिम महिलाही बघितल्या, अख्या मुंबईतून त्या ७-८ दिवसात जवळपास ६०-७० हजार विविध वयाचे भाग घेतात, त्यांच्या सांगे त्यांचे कुटुंब सदस्य हमखास येतात, हे सारे विलोभनीय आणि अगदी मनापासून दाद द्यावे असे…


पराग म्हणाले ते तर एकदम भन्नाट, येथे मैदानावर विविध स्पर्धा सुरु असतांना, अनेक मान्यवर तिकडे सामान्य प्रेक्षक म्हणून कौतुकाने त्याकडे बघत असतात, वास्तविक त्यांनी आमदारांना साधा निरोप देण्याचा अवधी, थेट बांधलेल्या मंचकावर त्यांना स्थान देण्यात येणे सहज शक्य असते पण तो देखील त्रास या दाम्पत्याला होत नाही, जगप्रसिद्ध चित्रकार सुहास बहुलकर असोत किंवा सचिन खेडेकर यांच्यासारखे चित्रपटातले, विविध क्षेत्रातले दिग्गज जेव्हा सामान्य प्रेक्षक म्हणून ह्या साऱ्या कौतुक सोहळ्याकडे बघतात, हे सारे डोळ्यात आनंदाश्रू आणणारे, मला अळवणी म्हणाले, आजपर्यंत तुम्ही सर्वांनी ज्या ज्या विविध स्पर्धांमधून भाग घेतले असतील मग ते क्षेत्र कोणतेही असो, त्या साऱ्या स्पर्धा येथे एकाचठिकाणी बघण्याचे भाग्य समस्त पार्लेकरांना आणि मुंबैकरांनाही, म्हणून मनापासून धन्यवाद आमदार पराग अळवणी आणि त्यांच्या टीमला…


येथे जागेअभावी शक्य नाही पण पार्ले महोत्सवाविषयी अळवणी यांनी जे मनातले मनापासून मनात न ठेवता सांगितले, ते कान देऊन ऐकण्यासारखे किंवा डोळे सताड उघडे ठेवून वाचण्यासारखे म्हणून माझ्या ऑफ द रेकॉर्ड पाक्षिकातले, आमदार अळवणी यांनी नेमके सांगितलेले वाचायला विसरू नका…


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *