आपले मुख्यमंत्री २ : पत्रकार हेमंत जोशी

आपले मुख्यमंत्री २ : पत्रकार हेमंत जोशी 

भुजबळ आणि फडणवीस दोघांमध्येही दोन बाबतीत कमालीचे साम्य आहे, माझ्या या वाक्यावर उगाच डोळे मोठे करून वाचू नका..मी माहिती आणि जनसंपर्क खात्याच्या भुजबळांविषयी म्हणतोय,एकतर या दोघांच्याही नावात ‘ देवेंद्र ‘ आहे आणि दुसरे साम्य म्हणजे दोघांचाही माहिती आणि जनसंपर्क खात्याशी संबंध आहे, एक या खात्याचे संचालक आहेत तर दुसरे या खात्याचे मंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत…


हे साम्य येथे त्या ‘ रवींद्र ‘ या नावावरून येथे अगदी सहजच आठवले. अलीकडे माझ्या दोन लेख वाचण्यात आले, विशेष म्हणजे दोन्ही लेख लिहिणारे ‘ रवींद्र ‘ आहेत आणि या दोन्ही रवींद्र यांनी दोन वेगवेगळ्या पण या राज्यातल्या जबरदस्त बऱ्यापैकी म्हणाल तर फेमस म्हणाल तर वादग्रस्त व्यक्तींवर लिहिले आहे, तुमची उत्सुकता येथे आणखी ताणून धरत नाही. श्री 

रवींद्र गोळे यांनी शिवधर्माचे संस्थापक श्री पुरुषोत्तम खेडेकर सपत्नीक पांडुरंगाचे दर्शन घेतानाचा फोटो विविध माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर जे लिहिले आहे ते संग्राह्य ठेवण्यासारखे आहे…


दुसरे रवींद्र आहेत, ठाण्यातले पत्रकार रवींद्र पोखरकर, त्यांनी बिग बॉस मध्ये गेलेल्या अनिल थत्ते यांचा जो इतिहास नेमक्या शब्दात सांगितला आहे, तो लेख किंवा ते लिखाण देखील संग्रही ठेवण्यासारखे. हे दोन्ही लेख तुम्हाला एकत्र उद्यापासून नक्की वाचता येतील त्यासाठी तुम्हाला एक करावे लागेल, माझे ऑफ द रेकॉर्ड पाक्षिक व ऑनलाईन वाचावे लागेल


श्रीमान पुरुषोत्तम खेडेकर आणि अनिल थत्ते हे दोघेही वादग्रस्त माणसे मला तशी जवळून परिचयाची आणि कोणाला आवडो अथवा न आवडो, मला मात्र अतिशय आवडलेली. होते काय, आपण अमुक एखाद्या आभाळा टेकलेल्या व्यक्तीचे नेमके दोष तेवढे बघत असत, माझे मात्र तसे नाही, त्यांचे नेमके गूण कोणते, ते मी पारखतो आणि पुढे जातो. अमुक एखाद्या नावाजलेल्या व्यक्तीचे महत्व जर कालांतराने कमी झालेले असेल तर त्याने आपले नेमके काय चुकले, त्यावर स्वतःचे अवलोकन करायला हवे. खेडेकर आणि थत्ते या दोघांनाही मला नेमके हेच सांगायचे आहे, त्यांनी आपण कुठे चुकलो, तेवढे बघायचे आहे आणि मी मात्र नेमका स्वार्थी, त्यांच्यातले गूण तेवढे पारखतो, त्या गुणांची नक्कल करून यश मिळविण्याचा प्रयत्न करतो..


श्रीमान पुरुषोत्तम खेडेकर पांडुरंगाच्या दर्शनाला गेले म्हणजे ते आणि त्यांचा शिवधर्म संपला म्हणून त्यांनी पराभव पत्करला, असे मला अजिबात वाटत नाही कारण अगदी अलीकडे मी कुठल्याशा कामानिमित्ताने अकोल्याला राज्यमंत्री रणजित पाटलांना जेव्हा भेटायला गेलो होतो, त्यांनी त्यादिवशी जे शिवधर्माचे अधिवेशन होते त्याच्या सांगता समारंभाला मला मुद्दाम नेले, खेडेकर माझे मित्र, मी बघितले, त्या भव्य मंडपात पाय ठेवायला देखील जागा नव्हती, म्हणून सांगतो, त्यांचे महत्व संपले असे वाटत नाही पण त्यांचे हृदयानंतर झाले असेल तर सर्वांनी त्याचे स्वागत करायला हवे….


दुसरे आमचे पत्रकार मित्र अनिल थत्ते, पोखरकर यांनी नेमके लिहिले आहे कि थत्ते यांनी आपल्या ओघवत्या लेखन शैलीचा सकारात्मक उपयोग केला असता तर वेगळे काहीतरी घडले असते. मी तर म्हणतो, आणखी एक व. पु. पु. ल. किंवा अत्रे महाराष्ट्राला मिळाले असते पण ते दुर्दैवाने घडले नाही, थत्तेंच्या विकृत लिखाणाने त्यांचा घात केला ज्याचाप्रचंड त्रास ताप त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला देखील झाला. एखाद्या सुंदर स्त्रीच्या वक्षस्थळांकडे निरखून बघत बसण्यापेक्षा तिचे नेमके सौंदर्य पारखण्यासाठी तिच्या चेहऱ्याकडे एकटक बघावे, मनस्वी आनंद मिळतो. माझे थत्तेंच्या बाबतीत तेच झाले, त्यांच्या विकृतीकडे किंवा त्यांच्या वादग्रस्त स्वभावाकडे मी दुर्लक्ष केले आणि नक्कल केली ती त्यांच्यातल्या लेखन शैलीची, त्यामुळे थत्ते जरी लिखाणातले दिलीपकुमार होते आहेत, मी मात्र राजेंद्रकुमार झालो म्हणजे त्यांच्यापेक्षा लिखाणात कमकुवत असतांनाही राजेंद्रकुमार ठरलो, अधिक यशस्वी झालो….


लक्षात ठेवा, आपण मोठ्या माणसांचे गूण तेवढे पारखायचे असतात आणि त्या गुणांचे प्रसंगी अगदी जाहीर कौतुक देखील करायचे असते, तेवढे मी केले. दोष तर माझ्यातही खूप आहेत, दोषांकडे कानाडोळा करणे अधिक चांगले, समाजाला वठणीवर आणण्याचा आपण ठेका घेतलेला नाही…

क्रमश:


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *