पवारांचा पार्थ : पत्रकार हेमंत जोशी

पवारांचा पार्थ : पत्रकार हेमंत जोशी 

आम्ही भारतीय नेमके कसे त्यावर अलीकडे माझ्या अमेरिकेतल्या पाठक आडनावाच्या मैत्रिणीने पाठवलेला छान किस्सा सांगतो. नंतर पुढल्या महत्वाच्या विषयाला हात घालतो…कॅनडा देश पर्यटनासाठी फार प्रसिद्ध आहे. ( माझा धाकटा मुलगा विनीत तेथे शिकायला होता. मी खूप वेळ कॅनडा बघितले, निसर्गरम्य देश आहे. नायगरा धबधबा अमेरिकेतून नव्हे आर कॅनडातून अधिक सुंदर दिसतो, डोळ्याचे पारणे फेडतो) तिकडच्या नागरी सुधारणा कशा उत्तम त्यावर मिसेस पाठक यांनी पाठवलेला हा किस्सा…अलीकडे एकदा उन्हाळ्याच्या सुट्टीत जामनगरहून एक गुजराथी कुटुंब कॅनडा फिरायला निघाले होते. त्यात पती पत्नी, त्यांची दोन मुले आणि एक वृद्ध जोडप्याचा समावेश होता. एकदा ते आपल्या कार मधून फिरत असतांना त्यांच्या मागे एका कॅनडियन स्त्रीची गाडी होती. अचानक त्या स्त्रीने पाहिले कि पुढील गाडीतील त्या गुजराथी आजोबांनी बाहेर तोंड काढून रक्ताची उलटी केली. लगेच त्या स्त्रीने ९११ क्रमांकावर फोन केला. बघितले ते सांगितले…काही क्षणातच तेथे ऍम्ब्युलन्स हेलिकॉप्टर हजर झाले. आजोबांना त्यात टाकून त्वरित ऑक्सिजन लावून इस्पितळात हलविण्यात आले. डॉक्तरांनी अत्यंत लक्ष ठेवून आजोबांच्या जीवाचा धोका टाळला त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्या जागृत स्त्रीचे आभार मानण्यात आले. नंतर इस्पितळाने लगेच आजोबांच्या मुलाकडे कॅनेडियन डॉलर ४५०० असे बिलही दिले. पण या अनपेक्षित बिलाने मुलगा बिथरला आणि बापावर खेकसून म्हणाला, पान खाऊन बाहेर पिचकारी मारायची काय गरज होती…? 

आता नेमक्या विषयाकडे वळतो, 

देवाने माझे अनेक हट्ट आयुष्यात पूर्ण केले. एखादी नटी तेही अतिशय तोकड्या कपड्यांनिशी जवळून बघायची होती. थेट आलिया भट आणि मी कित्येक महिने जुहूच्या सन अँड सॅण्ड मध्ये एकत्र स्विमिंग करीत असू फरक एवढाच त्यावेळी तिचे अवघे वयोमान वय वर्षे चार होते. हेही वाटायचे कि एखाद्या नटीशी एकांत चार घटका गप्पा माराव्यात. अलीकडे कुठल्याशा कामानिमित्ते उषा नाडकर्णी माझ्या ऑफिस मध्ये येऊन बसल्या होत्या. छान गप्पा झाल्या. २९ मे ला माझा आणखी एक हट्ट देवाने पूर्ण केला. कुटुंबवत्सल तेही थेट अजित पवार मला बघायचे होते, देवाने माझे तेही स्वप्न पूर्ण केले. अजितदादा आणि पार्थ पवार दोघेही एकत्र खूप प्रसन्न मूड मध्ये मुंबईत आंतरराष्ट्रीय विमान तळावरील बिझिनेस लाउंज मध्ये भेटले आणि डोळ्याचे पारणे फिटले…


आता देवाने आणखी एक इच्छा पूर्ण करावी. माझ्या ओळखीच्या एखाद्या तरुणीशी आमचा अविवाहित पत्रकार मित्र राजन पारकर याचे लग्न व्हावे मग त्याने संसाराची सारी जबाबदारी माझ्यावर सोपवावी. त्यावर तो म्हणतो, मी अविवाहित राहीन पण तुमच्या ओळखीच्या तरुणीशी लग्न करणार नाही. नको रे राजन असा हट्ट धरून बसू. मोठ्यांचे ऐकावे. २९ तारखेला मी न्यू यॉर्कला निघालो आणि हि अशी अचानक भल्या पहाटे अजितदादा आणि पार्थ शी म्हणाल तर भेट झाली म्हणाल तर गाठ पडली. मनाशी लगेच म्हणालो, चला एक विषय मिळाला लिहायला कि इकडे राज्यात जनता दुष्काळाशी सामना करते आहे आणि तिकडे अजितदादा निघालेत फडणवीस मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांसारखे बेशरम होऊन निवडणूक संपताच परदेशात सहलीला पण ते तसे 

नव्हते, अजितदादा असे निर्लज्ज नाहीत….

तिकडे दुबईत अजितदादांचा धाकटा जय उत्तम व्यवसाय करतो आहे, लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत त्याच्याशी भेट नाही, फारसे बोलणे झाले नव्हते म्हणून दादा आणि पार्थ त्याला केवळ दोन दिवस भेटायला गेले होते. मला नेमके जे अपेक्षित आहे होते ते त्यादिवशी मनासारखे घडले. तरुण मुलांशी गप्पा मारणारे त्यांच्या नेमक्या अडचणी त्यांचे स्वप्न समजावून घेणारा बाप मला अजितदादांमध्ये बघायचा होता तो बघितला. पार्थ आणि दादा दोघे ज्यापद्धतीने दहा पंधरा मिनिटे माझ्याशी गप्पा मारल्या. त्यादरम्यान त्या दोघांचे एखाद्या मित्रांसारखे ट्युनिंग बघून मी मनोमन सुखावलो. अतिशय हळुवार स्वभावाच्या म्हणजे काका शरद पवारांच्या घराण्यात अजिबात न शोभणाऱ्या पार्थ पवार नामक भावनाप्रधान तरुण नेत्याला जे वाटायचे कि त्याच्या बाबांनी त्याला समजावून घ्यावे, तो देखील राजकारणात किंवा व्यवसायात पुढे जाऊ शकतो, हे लोकसभा निवडणुकीनिमित्ते दिसून आले. अजितदादा आणि पार्थ सतत तीन महिने प्रचारानिमित्ते जे एकत्र फिरले, बसले उठले, त्याने आता नजीकच्या काळात नक्की फरक पडणार आहे, त्यातून त्याचे एकटेपण नक्की दूर झाले आहे, पार्थ मनापासून शंभर टक्के खुश आहे…


निवडणूक हरलो, पराभूत झालो, थोडा डिस्टरब झालोय, पार्थ म्हणाला. डिस्टरब का, कशासाठी, तुला जी लाखो मते मिळालेली आहेत ते सारे मतदार तुझे आणि तुझ्या बाबांचे, आजोबांचे फॉलोअर्स आहेत, पराभूत झाल्याने त्यांना वाऱ्यावर सोडून जाणार आहेस का, तसे असेल तर ते अजिबात योग्य नाही. हारजीत होतच असते, त्याने अजिबात खचून जायचे नसते, जिद्दीने आणखी पुढे जायचे असते, मी त्याला म्हणालो. नम्र पार्थला ते मनापासून पटले असावे. तेवढ्यात विमानाची वेळ झाली म्हणून त्यांना बोलावणे आले, दादा निघाले, पार्थचा पाय निघत नव्हता. अरे आज तुझ्यासोबत प्रॉम्प्ट बाप आहे, दादा आहेत, पळ लवकर मग तो निघाला. मी जे अजितदादांना म्हणालो कि पार्थ माझा आणि विक्रांत चा अतिशय लाडका आहे, तेच खरे आहे, पार्थ अतिशय वेगळा हळुवार तरुण नेता आहे…


शरद पवारांनी नेहमीप्रमाणे घरातही शक्यतो भेदभाव करू नये. त्यांनी अलीकडे रोहित पवारला जवळ घेतले आहे, नक्की चांगले घडले आहे पण आजोबांना दोन्ही नातू सारखे असावेत जसा त्यांनी रोहित पवारांवर विश्वास टाकला आहे ती भूमिका त्यांनी पार्थबाबत पण घ्यावी. वर्गातली सारी मुले अभ्यासाच्या बाबतीत सारखी नसतात पण जे अस्सल गुरु गुरुजी असतात ते अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यांकडे देखील लक्ष पुरवतात, लक्ष ठेवून असतात. शरदरावांनी गुरुजींच्या भूमिकेत शिरावे आणि उजव्या खांद्यावर रोहितला घेतले आहे, डाव्या खांद्यावर पार्थ ला देखील उचलून घ्यावे, त्यालाही नेमके राजकारण समजावून सांगून पुढली त्याची राजकीय दिशा त्याला ठरवून द्यावी, पार्थ नक्की ऐकेल. या लोकसभा पराभवाच्या निमित्ताने बाबा आणि आबा दोघांचे ऐकणे कसे आवश्यक आहे, असते हे एव्हाना त्याच्या नक्की लक्षात आले आहे. पार्थ देखील पुढे जाणारा आहे…

तूर्त एवढेच :


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *