फडणवीसांची युक्ती वाढली शक्ती : पत्रकार हेमंत जोशी

फडणवीसांची युक्ती वाढली शक्ती : पत्रकार हेमंत जोशी 

एखाद्याला कमी लेखणे, टोमणे मारणे, खाली बघणे, अपमानित करणे, किस झाड कि पत्ती समजणे अत्यंत वाईट कारण कोण केव्हा कोणती उंची गाठेल कधीही सांगता येत नाही. म्हणून संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाशी गोडीगुलाबीने राहावे असे मला वाटते. विरोध तात्विक असावा जेलसीतून असूयेतून नसावा. मातोश्रीप्रमुख किंवा ठाकरे कुटुंबियांचे म्हणाल तर उजवे हात म्हणाल तर जीव कि प्राण मिलिंद नार्वेकरांना ज्यांनी ज्यांनी नोव्हेअर करण्याचा मातोश्रीवरून बाहेर घालविण्याचा प्रयत्न केला, प्रयत्न करणारेच उलट संपले, मातोश्रीवरून बाहेर पडले, शिवसेनेतले स्थान घालवून बसले, अनेकांना शिवसेना सोडावी लागली तशी वेळ नार्वेकरांच्या विरोधकांवरच आली वरून अधिकाधिक महत्व वाढत गेले ते मिलिंद नार्वेकर यांचे…


मुख्यमंत्री फडणवीसांच्या आधी शिवसेनेतर्फे राज्यातल्या कानाकोपऱ्यात आदित्य ठाकरे जनसंपर्क अभियान राबवताहेत त्यावरूनच मला नार्वेकर यांची प्रकर्षाने आठवण झाली. माझी माहिती अशी कि जेव्हा हे संपर्क अभियान काढायचे ठरले तेव्हा नार्वेकर सहकुटुंब युरोप वारीवर होते ते जर येथे असते तर त्यांनी नक्की आदित्य यांना समजावून सांगितले असते कि हे असे एवढ्या घाईने आणि तुमच्या वयाच्या नेत्याने करू नये पण काही अति हुशार नेत्यांच्या सल्ल्याला लहानगे आदित्य बळी पडले आणि नको त्या वयात नको ते करून बसले. कम्पेअर टू फडणवीस आम्हीही कमी नाही किंवा आम्ही देखील पुढल्या मुख्यमंत्रीपदाचे दावेदार कदाचित हे दाखविण्याच्या नादात आदित्य यांच्याकडून हि संपर्क मोहिमेची चूक मुद्दाम राबविल्या गेली…


आदित्य ठाकरे यांची ती चांगली सवय आहे कि ते अधूनमधून राज्याचा फेरफटका मारून मोकळे होतात पण सभा किंवा एकाचवेळी हजारो माणसांचा घोळका जिंकण्याएवढे अद्याप त्यांचे वय नाही अनुभव नाही वक्तृत्व नाही, त्यासाठी आणखी काही काळ जाऊ देणे योग्य ठरेल. हे म्हणजे असे झाले एखादी लहान मुलगी अमुक एखाद्या स्पर्धेत आईची साडी नेसून नृत्य करते आणि ओंग्यापेक्षा बोन्गा मोठा झाल्याने धपकन जमिनीवर पडते. शाळेत असतांना माझा एक मित्र त्याच्या मोठ्या भावाची हौशेने पॅन्ट घालून आला आणि पिटी करतांना कमरेचा बेल्ट अचानक तुटल्याने त्याची घसरून पडलेली पॅन्ट आणि आत घातलेली अंडरपँट, ओंगळ दर्शन साऱ्यांना झाले. हे असे आदित्य यांच्या जनसंपर्क यात्रेचे झाले आहे, त्यांना चुकीचे सल्ले दिल्या जाऊ नये असे मनापासून वाटते. आदित्य यांच्या कानात ‘ तुम्हीच पुढले मुख्यमंत्री ‘ हे भरवून दिल्या जाणे म्हणजे आदित्य यांचे राजकीय नुकसान जाणूनबुजून करण्यासारखे…


www.vikrantjoshi.com

शिवसेनेच्या बाबतीत आणखी एका मुद्द्यावर यायचे झाल्यास, गणेश नाईक यांचे शिवसेनेऐवजी भाजपामध्ये जाणे, सेनेच्या दृष्टीने चुकीचे झाले असे म्हणता येईल. गणेश नाईक मंत्री असतांना एक दिवस माझ्यासमोरच त्यांना कुठल्याशा कामासाठी थेट बाळासाहेबांचा फोन आला. त्या दोघांचे त्यावेळेचे झालेले संभाषण एवढे चांगले, पोटतिडकीने होते कि क्षणार्धात माझ्या लक्षात आले, बाळासाहेबांच्या मनातला राग ओसरलेला आहे त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याही मनात फारशी कटुता नाही खुद्द गणेश नाईक मला त्यावेळी म्हणाले होते. असे असतांना शंभर टक्के नाईकांचा सेनेकडे ओढा असतांना त्यांना भाजपामध्ये जाऊ देणे म्हणजे ठाणे जिल्ह्यातली मोठी ताकद सेनेने कमी करवून घेण्यासारखे. आपल्याला पक्षात स्पर्धक नको म्हणून एकनाथ शिंदे यांनी खुबीने मोडता घातला असे काहींचे म्हणणे, योग्य असावे हेही मला येथे वाटते….


मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार गेली चार वर्षे गणेश नाईक हे राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचा अतिशय गांभीर्याने प्रयत्न करीत होते, होय, त्यांना शिवसेनेतच जायचे होते, असे घडले असते तर ते नाईक व शिवसेना दोघांनाही राजकीय ताकद वाढण्यात नाईकांचे सेनेत जाणे अधिक फायद्याचे ठरले असते, दोघांचीही मोठी राजकीय ताकद वाढली असती. दुरदैवाने ते 

घडले नाही , घडू दिले नाही. आणि हे असे घडणार नाही जेव्हा गणेश नाईक आणि कुटुंबियांच्या लक्षात आले, आमदार म्हणून संदीप गणेश नाईक यांनी थेट देवेंद्र फडणवीस या समवयस्क मित्र नेत्याशी जवळीक वाढवायला सुरुवात केली. त्या दोघांचे आपापसातले संबंध बघून मला तर कित्येकदा हेच वाटायचे कि संदीप नाईक भाजपाचे अधिकृत आमदार आहेत. संदीप नाईक यांचा भाजपा वर्तुळात असलेला सहज वावर, त्यांना भाजपामध्ये येण्याचे वेध लागले आहेत, जाणकारांच्या ते सहज लक्षात यायचे….


नवी मुंबईतील नाईक आणि कंपनीचे भाजपामध्ये येणे, त्यातून गणेश नाईकांची, देवेंद्र फडणवीसांची, भाजपाची ताकद एकीकडे वाढलेली असतांना तिकडे शरद पवार आणि राष्ट्रवादीचे भरून न येणारे नुकसान तर झाले आहेच पण एकनाथ शिंदे यांना ठाणे जिल्ह्यात नाईकांच्या रूपाने तगडा स्पर्धक निर्माण झाला आहे हेही नक्की. यापुढे थेट प्रभावी भाजपाची ताकद नाईकांच्या पाठीशी उभी राहिल्याने गणेश नाईक पूर्वीच्या उत्साहात ठाणे पालघर रायगड या बेल्ट मध्ये भाजपा अधिक प्रभावी करण्यात मोलाची कामगिरी पार पाडतील. महत्वाचे म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यासमोर भाजपातर्फे तगडा नेता ठाणे जिल्ह्यात नाही हे जे शल्य भाजपाला बोचायचे ते भाजपावाले मनातल्या मनात नाचायला आणि बागडायला लागले आहेत. सेनेची मोठी ताकद नाईकांच्या येण्याने वाढली असती, संधी फडणवीसांनी साधली, शिवसेनेने केवळ एकनाथ शिंदे यांच्या हट्टापायी गमावली, एक नक्की, भाजपाची ताकद ठाणे जिल्ह्यात वाढली….


तूर्त एवढेच : हेमंत जोशी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *