साला मैं तो साब बन गया : पत्रकार हेमंत जोशी

साला मैं तो साब बन गया : पत्रकार हेमंत जोशी 

२१ एप्रिलला मला नि माझ्या एका लेखाला मोठ्या प्रमाणात चारी बाजूंनी ट्रोल करण्यात आले. मजा आली असे मी म्हणणार नाही पण असे ट्रोल करण्याने मला फारसा फरक पडला नाही हेही तेवढेच खरे. एरवी माझ्या लिखाणावर जगभरातल्या वाचकांकडून साधारणतः पाच हजार शिव्यांचा वर्षाव होतो तो यावेळी लाखभर शिव्यांचा झाला एवढाच काय तो फरक. तसेही तुमच्या ते लक्षात आलेच असेल कि माझ्या लिखाणावर ज्या अतिशय वाईट किंवा अश्लील कमेंट्स दुखावलेले वाचक दर दिवशी टाकून मोकळे होतात मी अशा कमेंट्स कधीही यासाठी डिलीट करत नाही कारण वाचकांची भूमिका अनेकदा रावणाला देव मानणारी असते म्हणजे ज्या रावणाला आपण येथे हिंदू भूमीत राक्षस म्हणतो त्याच रावणाची श्रीलंकन देव मानून पूजा करतात. थोडक्यात अमुक एखादी व्यक्ती जेव्हा मला चुकीची वाटते इतरांना ती साक्षात परमेश्वराच्या ठिकाणी असते आणि मी तर प्रत्येक व्यक्तीच्या भावनांचा आदर करणारा पत्रकार आहे म्हणून कमेंट्स डिलीट करत नाही उलट या अशा शिव्या कायम ओव्या म्हणून स्वीकारतो. महत्वाचे म्हणजे जेव्हा कोणीही सामाजिक चळवळीत उतरतो त्या व्यक्तीने मृत्यू किंवा अन्य कुठलेही भय बाळगायचे नसते, उलट असे मरण आलेच तर ते हसत हसत स्वीकारणे आमचे कर्तव्य ठरते…

अर्थात भय नाही असा भयमुक्त माणूस या जगात नाही. माणूस मग ते शरद पवार असतील किंवा रस्त्यावर फिरणारा ठार वेडा माणूस, प्रत्येकाला कुठेतरी भयाने ग्रासलेले असते. मला आठवते काही  वर्षांपूर्वी एक वेडा माणूस खारच्या महामार्गावर रस्त्याच्या मधोमध बसून वेडेचाळे करीत बसला होता, समोरून वेगाने येणारी वाहने भयाने वेग कमी करून त्याच्या बाजूने निघून जात होती. नेमका मी व माझा मित्र तेथे आलो, मी मात्र माझी मर्सिडीज बाजूला घेतली वळविली नाही सरळ त्याच्या अंगावर घालताच तो विद्युत गतीने बाजूला तर झालाच पण पुन्हा  त्याची रस्त्याच्या मध्ये येऊन बसण्याची हिम्मत झाली नाही थोडक्यात अमुक एखादा माणूस वेडा असो कि गुंड मवाली पुढारी किंवा अन्य कोणी, प्रत्येकाला कशाची तरी कायम भीती वाटत असते. मला भीती वाटते ती कुटुंब सदस्यांची. तेथे काही घडले तर मी कोसळतो अस्वस्थ होतो विशेषतः उद्या जर माझ्या कुटुंबातले सदस्य चुकून नालायक निघाले घरात हाणामारी करणारे किंवा शिवीगाळ करणारे निघाले व्यसनी निघाले जन्मदात्या आई वडिलांनाच त्रास देणारे निपजले तर मला वाटते मी कदाचित आत्महत्या करूनही मोकळा होईल कारण ज्यांच्यासाठी आपण आयुष्यभर  लढत आलो त्याग करून मोकळे होत असतो तेच जर नालायक निघाले तर मीच काय प्रत्येक भारतीय पालक देवाकडे मरण मागत असेल…

मित्रहो, तुम्हाला कदाचित कोणी यासाठी सांगणार नाही कि तुम्ही घाबरून जाण्याची दाट शक्यता आहे पण मी तुम्हाला जे सांगतो आहे ते हिम्मतीने ऐका आणि तशी मानसिक तयारी ठेवा. विशेषतः मुंबई पुणे किंवा राज्यातल्या अन्य महानगरात कोरोनाचे थैमान जून अखेरीपर्यंत संपेल असे दूरदूरपर्यंत वाटत नाही आणि ज्या भागात ज्या जिल्ह्यात कोरोनाची लागण कमी आहे त्यांनी आपण सेफ आहोत असे अजिबात अजिबात अजिबात समजू नये आणि बिनधास्त म्हणजे आमचे काही होणार नाही या भ्रमात राहून कृपया बाहेर पडू नये. मला वाटते तीन मे नंतर पुन्हा पंधरा दिवस लॉक डाऊन कालावधी वाढविल्या जाईल. जगण्यासाठी जे जे आवश्यक आहे  तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचे उत्तम नियोजन उद्धव ठाकरे यांनी केले असल्याने, आता उपाशी राहावे लागते आहे कि काय, अशा मनाशी वलगना करून एखाद्या डाकूसारखे दैंनदिन लागणाऱ्या वस्तूंवर कृपया तुटून पडू नये. साध्या कांदे बटाटयांवर  देखील खरेदी करतांना तुम्ही एवढे तुटून पडता जेवढे मधुचंद्राच्या रात्री देखील तुटून पडले नव्हते. कोरोना संकट मोठे आहे जीवावर नक्की बेतणारे आहे तेव्हा या पेटलेल्या विस्तवाशी खेळून स्वतःला आणि कुटुंबाला उध्वस्त करू नका. कोरोना संकट आज तरी मला हेच वाटते कि यापुढेही वाढणारे आहे पण जर आपण शिस्त पाळली तर त्यातून सहीसलामत बाहेर पडून उर्वरित आयुष्याचा आनंद आपल्याला पुन्हा एकवार उपभोगता येईल…

तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *