कोण कसे : भाग २ : पत्रकार हेमंत जोशी

कोण कसे : भाग २ : पत्रकार हेमंत जोशी 


आताची परिस्थिती माहित नाही पण पूर्वी विदर्भातल्या खेड्यापाड्यात भंडारा असला कि अख्खे गाव जेवायला उलटायचे, पहिली पंगत उठली कि दुसऱ्या पंगतीला वाट पाहणारी माणसे क्षणाचाही विलंब न लावता अगदी पटकन, क्षणार्धात रिकामी झालेली जागा पकडायचे, आपले जेवण झाल्या झाल्या रोखून बघणारा अमुक पुरुष आपली जागा धावत पळत येऊन पकडणार आहे हे जेवणाऱ्याच्या लक्षात आलेले असायचे, समोरच्याची ती तीक्ष्ण भुकेली नजर जेवणाऱ्याला धड जेवू देखील देत नसे, कसेबसे खाली मान घालून जेवायचे, एवढेच जेवणाऱ्याला नेमके ठाऊक असायचे, ज्यांना या अशा तीक्ष्ण भुकेल्या नजरेची सवय झालेली असायची, ते त्या नजरेची पर्वा न करता अगदी पोटभर जेवून घ्यायचे…

फडणवीस मंत्रिमंडळातील कोण मंत्री आणि राज्यमंत्री कसे यावर येथे मांडतांना गावाकडल्या भंडाऱ्याची आठवण झाली. मुख्यमंत्री म्हणजे विहिणीची पंगत, मुख्यमंत्री मुख्य विहिण बाईच्या भूमिकेत पण त्याच जागेवर आपल्यालाही जेवायला बसायचा मान मिळावा यासाठी उत्सुक आणि इच्छुक आहेत चंद्रकांतदादा पाटील, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, भाऊसाहेब फुंडकर इत्यादी. तेच ते भंडार्यासारखे, फडणवीसांचे उरकत नाही तोच, ती जागा कोण पटकावणार, तर धावत पळत जाऊन शर्यत जिंकण्याची क्षमता ज्या दोघात आहे किंवा वारंवार ज्या दोघांच्या स्वप्नात वर्षा बांगला येतो, जगजाहीर आहे, ते दोघे आहेत, महसूल आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि वित्त व वने मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि हे भंडार्यातल्या जेवण घेणाऱ्यासारखे फडणवीसांना नेमके माहित आहे कि ते दोघेही त्यांच्या जागेवर डोळा ठेऊन आहेत, फडणवीसही काही कमी नाहीत, एकाचवेळी बायको आणि प्रेयसी यशस्वीपणे सांभाळणाऱ्या चावट पुरुषासारखे त्यांचेही वागणे म्हणजे माझ्यानंतर नक्की तुम्हीच, आळीपाळीने ते या दोघांनाही डोळा मारतांना आणि त्या आनंदाच्या भरात चंद्रकांतदादा आणि सुधीरभाऊ सभोवताली गोल गोल गिरक्या घेतांना अनेकांनी अनुभवले आहेत पण फडणवीस दादा आणि भाऊ सारख्या आणखी दोघा तिघांना कसे डोळा मारून खुश करतात, एकांतात गाठून एकमेव अद्वितीय सुमित वानखडेंना विचारा, पुढल्या तासभर पॉट धरधरून तुम्ही हसला नाहीत तर मला हेमंत जोशी म्हणू नका वाटल्यास निलेश साबळे म्हणा, मंगला खाडिलकर म्हणा थोडक्यात बोअरिंग व्यक्तिमत्व म्हणून शिव्या हासडा…..

येथे गमतीचा भाग सोडल्यास राजकीय वस्तुस्थिती अशी गेल्या वर्षभरापासून अतिशय नियोजनपूर्वक मग कधी ते शेतकऱ्यांचे आंदोलन असेल तर कधी मराठ्यांचे मोर्चे, विविध अडचणी फडणवीसांसमोर उभ्या करून ज्यापद्धतीने त्यांना अडचणीत आणून घरी पाठविण्याचे प्रयत्न झालेत, अनेकदा वाटायचे, मुख्यमंत्र्यांचे आता काही खरे नाही पण प्रचंड संकटांवर मात करून टिकून राहण्याचे श्रेय फक्त आणि फक्त एकट्या फडणवीसांचे आहे, अत्यंत महत्वाचे म्हणजे भारतीय जनता पक्षाची प्रभावी असलेल्या प्रादेशिक पक्षांच्या बाबतीत ठरलेली, संपविण्याची भूमिका त्यातून उद्धव ठाकरे यांचे वारंवार उघड टोचून बोलणे आणि लिहिणे, मला वाटते, आजही फडणवीसांना आपल्या या जिवलगमित्राचा म्हणजे उद्धव ठाकरे यांचा अतिशय मानसिक त्रास होतो, त्याचवेळी वाईट याचे वाटते कि उद्धव मात्र आपला मित्रधर्म फडणवीसांच्या बाबतीत पाळतांना एखाद्या हिंदी सिनेमातल्या खलनायकासारखे वाटतात, शक्ती कपूर, प्राण, गुलशन ग्रोव्हर, अमरीश पुरी किंवा ललिता पवार, बिंदू वाटतात….

विषय आहे, फडणवीस मंत्री मंडळातील कोण कसे आणि वस्तुस्थिती हीच आहे कि चुकून माकून जर फडणवीस यांचे दिल्लीत जाणे झाले तर त्यांची जागा नक्की एकतर प्राधान्याने चंद्रकांत पाटील यांना देण्यात येईल किंवा पुढलाही मुख्यमंत्री आमच्या विदर्भातलाच हवा असा हट्ट जर मोस्ट पॉवरफुल नितीन गडकरी यांनी धरला तर शंभर टक्के पुढले मुख्यमंत्री असतील सुधीर मुनगंटीवार. एक मात्र नक्की, जी खबरदारी सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली ती खबरदारी काहीसे भोळसट चंद्रकांत पाटील घेतांना दिसत नाहीत म्हणजे त्यांच्या कार्यालयातील सततचा देवाणघेवाणीतून दरदिवशी उडणारा गोंधळ त्यांना कोणत्याही क्षणी अडचणीत आणू शकतो हे दादांच्या अद्याप लक्षात आलेले दिसत नाही…. 

अर्थात राजकारणात जे दिसते तसे नसते म्हणजे अमुक एक व्यक्ती मुख्यमंत्री व्हावा, होईल तुम्हा आम्हाला वाटत असते पण तोच होईल हेही घडत नसते, उद्या मराठा कार्ड म्हणून रावसाहेब दानवे यांचेही नाव पुढे येऊ शकते पण लोक गमतीने म्हणतात, उद्या रावसाहेब मुख्यमंत्री झालेच तर अमुक एखाद्या कामाचे पैसेही घेतील, काम तर करणार नाहीत पण पैसेही बुडतील, अर्थात हा झाला थट्टेचा भाग पण नेमकी वस्तुस्थिती हीच कि फडणवीसच हा पाच वर्षांचा कार्यकाळ मुख्यमंत्री म्हणून पूर्ण करतील आणि पुढल्या निवडणूक पक्षाला जिंकून देऊन मगच ते दिल्लीत जातील, एवढ्या लवकर त्यांना दिल्लीत घेणे फडणवीस ज्यांचे अतिशय लाडके किंवा पुत्रवत आहेत त्या पंतप्रधांना वाटत नाही, फडणवीसांनी सोडलेली प्रेयसी आपल्यालाच मिठीत घेईल हा जो बारामतीच्या दादांना साताऱ्याच्या राजाबद्दल विश्वास होता ते तसे चंद्रकांत पाटील किंवा इतर मान्यवर इच्छुकांचे होईल असे आज तरी वाटत नाही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *