बार बार मुनगंटीवार : पत्रकार हेमंत जोशी

बार बार मुनगंटीवार : पत्रकार हेमंत जोशी 

श्री शरद पवार यांना गेली ३९ वर्षे बऱ्यापैकी जवळून बघत आलो आहे, त्यांचे आजतागायत झालेले राजकीय अपमान किंवा इतर मानसन्मान मला पाठ आहेत ठाऊक आहेत ज्ञात आहेत पण त्यांचा २७ सप्टेंबरला झालेला अपमान मला वाटते मध्यंतरी दिल्लीत त्यांच्या थोबाडात ज्याने जाहीर ठेवून दिली होती त्यापेक्षा जहरी होता, असे येथे मुद्दाम सांगावेसे वाटते. अत्यंत महत्वाचे असे कि शरद पवार व्यक्तिगत वाईट नाहीत चांगले आहेत त्यांनी अनेक माणसे उभी केली वाढविली घडविली मोठी केली पण त्यांचे नेमके हे चुकले कि त्यांनी उभी केलेली नेत्यांची फळी अजिबात चांगली निवडली नाही, दहशत निर्माण करणारे भ्रष्ट गुंड प्रवृत्तीचे त्यांनी नेते म्हणून मोठे केले तेच आज त्यांच्या अंगलट आलेले आहे. चार दोन गुंड भ्रष्ट नीच वृत्तीचे नेते साऱ्याच पक्षात असतात पण पवारांनी रोहित पवार, आर आर पाटील किंवा अमोल कोल्हे यांच्यासारखे दुसऱ्या फळीतले नेते मोठ्या प्रमाणावर उभे न करता त्यांनी प्रफुल्लछाप नेत्यांची जी मोठी फळी उभी केली ते चांगले केले नाही जे त्यांना आता आयुष्यच्या संध्याकाळी भोवते आहे, भोवले आहे…


अजित पवार यांनी त्यांच्या पवार कुटुंबात कुटुंबाविरुद्ध विशेषतः काकांविरुद्ध आधी केलेले बंड नंतर मागे घेतलेले असले आणि बंड मागे घेतांना सांगितलेली कारणे स्पष्ट केलेली असली तरी अजितदादा यांनी अत्यंत नाजुकक्षणी शरद पवार यांच्याविरुद्ध पुकारलेले बंड नेमके कोणत्या कारणांसाठी हे न समजण्या इतकी जनता भोळी आहे असे समजण्याचे कारण नाही. शरद पवार तिकडे दिल्लीत रमलेले असतांना ज्या अजित पवार यांनी सतत दहा वर्षे अत्यंत यशस्वी पक्षाची धुरा डॅशिंग नेते म्हणून सांभाळली त्या अजितदादा यांना ऐन विधानसभा निवडणुकीदरम्यान ज्या पद्धतीने प्रत्येक रथ यात्रेत किंवा अन्य प्रत्येक ठिकाणी दूर ठेवून आणि अमोल कोल्हे किंवा धनंजय मुंडे या कालच्या म्हणजे नवोदित नेत्यांना समोर करून अजितदादांना अपमानित करणे, त्यांनी केवळ या वैतागापोटी काकांपासून दूर जाण्याचे ठरविले होते अशी माझी माहिती आहे, त्यावर अधिक पुरावे मी पुढे नक्की सांगणार आहे. पण शरद पवारांच्या केलेली मोठी चूक लक्षात आली त्यांनी पुन्हा अशी चूक न करण्याचे दादांना वाचन दिले आणि सारे पुन्हा सुरळीत सुरु झाले…


www.vikrantjoshi.com

१९९५ च्या मंत्रिमंडळात नामदारकी, तदनंतर प्रदशाध्यक्षपद, अलीकडे पाच वर्षे राज्याचे वन आणि अर्थ या महत्वाच्या खात्यांचे मंत्री असूनही कुठे बदनाम झाले चारित्र्य गमावले, पैशांच्याच मागे लागले असे मुनगंटीवार यांच्याबाबतीत कधी घडले नाही कारण सामाजिक भान ठेवून आणि समाजाची भीती बाळगून उत्तम संस्कार राखून त्यांचे भाजपाचे बुजुर्ग नेते कामसू नेतृत्व म्हणून उत्तम चाललेले आहे. कोणत्याही वेळी सामान्य कार्यकर्त्याना अभ्यंगतांना सुधीरभाऊंना सहज भेटता येते त्यांच्याशी मनमोकळे बोलणे प्रत्येकाला सहज शक्य असते कारण ते कार्यकर्त्यांचे सामान्य मतदारांचे नेते आहेत, बऱ्यापैकी गप्पिष्ट आहेत अर्थात असे नाही कि ते टाईमपास नेते आहेत म्हणजे मुनगंटीवार हे च्युईंगगम नव्हेत कि चघळतांना तेवढे गोड वाटते आणि चघळण्यातला गोडवा संपला कि ना भूक भागते ना तोंडाला चव उरते, त्यांचे बोलणे जेवढे साधे सरळ असते तेवढे त्यांनी दिलेले शब्द आश्वासक असतात, एकदा ‘ हो करतो ‘ असे त्यांनी म्हटले कि आपले काम झाले असे त्यांना भेटणार्यांचे कायम सांगणे असते…


मला आठवते १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत म्हणजे सुधीर मुनगंटीवार हे केवळ डॉ. सच्चीदानंद मुनगंटीवार या आणीबाणीच्या काळात तुरुंगात गेलेल्या संघ नेत्याचे तडफदार चिरन्जीव म्हणून ओळखल्या जायचे पण कार्यकर्त्याचे पाय पाळण्यात ओळखणाऱ्या दिवंगत आदरणीय अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यादरम्यान म्हटले होते कि ये नौजवान आज चलकर बडा नेता बनेगा, असे म्हटले होते जे नेमके पुढे घडले. पुढे २०१० ते २०१४ दरम्यान त्यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून उत्तम काम बघितले, त्यांचे काम फळाला आले, तब्बल पंधरा वर्षांनंतर २०१४ मध्ये लगेच सेना भाजपा युती सत्तेत आली. आता तेच सुधीर मुनगंटीवार थेट सहाव्यांदा यावेळी विधानसभेची निवडणूक लढताहेत विशेष म्हणजे याआधी ते सतत पाच वेळा विधानसभेत निवडून गेले आहेत, त्यांचे जे जे मतदार मला भेटले, यावेळी सुधीर मुनगंटीवार सर्वाधिक मतांनी निवडून जातील त्यांनी मला मुद्दाम निक्षून सांगितले. व्होटर्स आर कॉन्फिडन्ट….


अर्थात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणे मुनगंटीवार यांना नवीन नाही, १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत ते विदर्भातून सर्वाधिक मताधिक्याने चंद्रपूर विधानसभेची निवडणूक जिंकली आहे. सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात प्रत्येक घरी घरच्यासारखे म्हणजे प्रत्येकाचे जणू एक कुटुंबसदस्य म्हणून नावाजलेले आहेत, राज्यात गाजलेले आहेत. भाऊ हे नाते आदराचे असते, मोठ्या भावाचे नाते हे घरातल्या प्रत्येकाला आधाराचे प्रतीक असते. आपल्या नावापुढे राव पंत साहेब अशी कोणतीही बिरुदावली न लावता मी तुमचा मोठा भाऊ तुमचा लाडका दादा या नात्याने माझ्याकडे बघा आणि तुमचे काम अडले कि कुठल्याही वेळी माझ्याकडे येत चला हे मुनगंटीवार यांनी जपलेले आणि सांगितलेले नाते चंद्रपूर मतदारसंघात प्रेमाचे आणि आदराचे प्रतीक मानल्या गेले आहे, वर्षानुवर्षे हे नाते जसेच्या तसे मतदारांनी आणि मुनगंटीवारांनी जपलेले आहे…

क्रमश: हेमंत जोशी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *