पुरेपूर कोल्हापूर जिल्हा १ : पत्रकार हेमंत जोशी

 पुरेपूर कोल्हापूर जिल्हा १ : पत्रकार हेमंत जोशी 

मी पाळतो तुम्हीही पाळा, श्रीमंती सत्ता आणि सौंदर्य कधीही कायम टिकत नसते या तिन्हींचा कधी गर्व नसावा. जमिनीवर असावे जमिनीवर राहावे म्हणजे जेव्हा केव्हा उतरती कळा लागलीच तर आपल्याकडे बघणार्यांना सहानुभूती राहते अन्यथा माणसे प्रसंगी तोंडावर सांगून मोकळे होतात, कि गर्वाचे घर खाली झाले. मी विधान भवनाच्या मुख्य द्वारापाशी उभा होतो तेवढ्यात अजित पवार आले, त्यांना कुठलेसे काम सांगण्यासाठी एक सामान्य कार्यकर्ता त्यांच्यासमोर आला आणि हात जोडून काम सांगू लागला, सटकली कि अजितदादांची, म्हणाले, कार्यकर्त्याने नेत्यांसमोर असे हात जोडून उभे राहायचे नसते, आधी ते हात खाली कर, कार्यकर्त्याने क्षणार्धात हात खाली करून ताठ मानेने त्याने काम सांगितले, दादांनी ते तेथल्या तेथे करून दिले, मी कौतुकाने हे पाहतच राहिलो. अजितदादा तो तुमचा पार्थ आहे ना, त्यालाही किंवा दोन्ही मुलांना जरा स्वातंत्र आणि संधी द्या कि बाहेर पडण्याची, पुढे जाण्याची, पार्थ नक्की बापसे बेटा सवाई ठरेल. काकांनी तुमचा पार्थ केला असता तर…


राजकारणात जातीला महत्व आहे, मराठ्यांना तर नक्की अधिक महत्व आहे,पण जात असली म्हणजेच नेता म्हणून अमुक एखादा मोठा होतो असे मला वाटत नाही, येथे कोल्हापूर जिल्ह्यातल्या सद्द्य राजकारणाविषयी लिहायचे आहे म्हणून तेथल्या नेत्यांची नावे सांगतो, साऱ्यांना मागे सारत म्हणजे निवेदिता माने किंवा कुपेकर कुटुंबाला मागे सारत, खुबीने युक्तीने व मेहनतीने अख्ख्या कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षातले क्रमांक एकचे नेते हसन मुश्रीफ मराठा तर नाहीत पण थेट मुस्लिम असून देखील त्यांच्या मागे जिल्ह्यातली राष्ट्रवादी ठामपणे उभी आहे. शेतकरी संघटनेचे नेते आणि दोन दोन वेळा खासदारकीला निवडून आलेले राजू शेट्टी हे तरी कुठे मराठा आहेत पण राजू शेट्टी यांना मराठा नेत्यांनी पुढे गेलेले फारसे आवडत नसावे मग त्यांच्या जाचातून कधी लोकमान्य नेते शिवाजी माने त्यांच्यापासून दूर गेले तर कधी सदाभाऊ खोत यांनी शेट्टी यांच्याविरुद्ध बंड केले. जे राजू शेट्टी बारामती मध्ये जाऊन आंदोलनातून थेट शरद पवारांना जेरीस आणायचे तेच राजू शेट्टी अलीकडे पवारांच्या किंवा साऱ्या साखर कारखानदारांच्या मांडीवर जाऊन बसल्याने परवा धैर्यशील निवेदिता माने देखील असेच पवारांपासून आईसहित दूर झाले आणि पुन्हा एकदा शिवसेनेत जाऊन बसले. राजू शेट्टी हेच लोकसभेला आघाडीचे उमेदवार असतील असे पवारांनी म्हटले आहे याचा सरळ अर्थ पवारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले आहेत अत्यंत महत्वाचे म्हणजे त्यांनी अत्यंत खुबीने शेट्टी यांना सामान्य शेतकऱ्यांच्या मनातून उतरविण्याची हि व्यूहरचना आखली आहे, पवार त्यात यशस्वी ठरत चालले आहेत….


मराठा नेत्यांना मोठे होऊ न देणारे, किंवा शेतकऱ्यांचे नेते नव्हे तर श्रीमंत साखर कारखानदारांच्या गळ्यातले ताईत असे जर राजू शेट्टी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले तर, शेट्टी यांना लोकसभा निवडून येणे नक्की कठीण होऊन बसेल, ती तयारी सुरु आहे, काहीसे कठीण आहे पण अगदीच नामूमकिन नाही, लोकसभेला राजू शेट्टी यांना धैर्यशील माने पराभूत करू शकतील, राजू यांचे राजकारण बिनसले आहे हे निश्चित. दिल्लीत जाऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी जर काँग्रेसचा कोणत्याही कारणासाठी पाठिंबा घेण्यासाठी अहमद पटेलांशी वारंवार गुफतगू करण्यात आनंद घेत असतील तर हे शेट्टी आता आमचे राहिले नाहीत असे सामान्य शेतकरी नक्की तेही अगदी उघड सांगून मोकळे होतील….


भारतीय जनता पक्षाचे नेते, महत्वाची खाती सांभाळणारे राज्यचे महसूल व बांधकाम खात्याचे मंत्री कोल्हापूर जिल्ह्यात भल्याभल्यांना भारी पडलेले वरकरणी काहीसे बालिश नसूनही एखाद्या लहान मुलासारखे निदान वरकरणी निरागस वाटणारे मंत्री चंद्रकांत पाटील, नक्कीच कोल्हापूरकर नेत्यांच्या मनात धडकी भरणारे हेही मराठा नाहीत, कोल्हापूर जिल्ह्याचे आजचे राजकारण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे नाव निघाल्याशिवाय अजिबात पुढे सरकत नाही. चेहरा असे बावळा अंतरी नाना कळा, हि म्हण दादा पाटलांना तंतोतंत लागू पडते, राजकीय कामगिरी फत्ते करून आणणारे भाजपातले नेते, असे त्यांच्याविषयी उगाच बोलले जात नाही, थोडक्यात कट्टर मराठ्यांच्या जिल्ह्यात जर हे घडते म्हणजे मराठेतर नेते मराठा नेत्यांना प्रसंगी भारी पडतात तर ते इतरत्र, राज्यात कुठेही घडू शकते, घडते म्हणजे जातीला राजकारणात नक्की महत्व आहे पण जात हेच सर्वस्व आहे, असे अजिबात नाही. एक मात्र नक्की कोल्हापूर जिल्ह्यातले राजकारणातले संदर्भ झपाट्याने बदलायला सुरुवात झालेली आहे. पुढल्या काही दिवसात वाघासारख्या शेट्टी यांचे मांजर केल्याशिवाय शरद पवारांना चैन पडणार नाही, हि काळ्या दगडावरची रेघ आहे….

क्रमश:

पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *