पराग पार्ले महोत्सव : पत्रकार हेमंत जोशी

पराग पार्ले महोत्सव : पत्रकार हेमंत जोशी 

जुहू चौपाटीवर नेहमीचे आम्ही सारे फिरत असतांना माजी राज्यमंत्री कृपाशंकर सिंग भेटले, घोळका करून गप्पा मारता मारता ते म्हणाले, विलासराव देशमुख यांच्यानंतर मला मनापासून आवडलेले फडणवीस हे एकमेव. पुढे ते म्हणाले, अलीकडे केव्हातरी मी त्यांना माझ्या एका बांधकाम व्यावसायिक मित्रसंगे त्याच्या कामासाठी भेटायला गेलो होतो, फडणवीस म्हणाले, हे काम व्यक्तिगत आहे ते मी करूनही देईल, पण या कामाला सार्वजनिक स्वरूप दिले तर कृपाजी या मित्राचे काम तर होईलच पण तुमचे नाव होईल, मी मग पुन्हा त्यावर तयारीनिशी गेलो, आश्चर्य म्हणजे भेटल्यानंतर त्यांनी ते काम ती योजना क्षणार्धात मंजूर केली, गजब का मुख्यमंत्री है…छान वाटले ऐकून, मीही नेहमी देवेंद्र फडणवीसांविषयी तेच सांगत आलोय, फक्त भीती त्यांच्या सभोवताली जमलेल्या काही लबाडांची वाटते, एखाद्या बेसावध क्षणी आमचे हे विदर्भवीर, चुकून कुठे अडकलेत तर…


याआधीच्या लेखात अलीकडे गोंधळ घालून भाजपमधून बाहेर पडलेले नाना पाटोले हे काहीसे वादग्रस्त ठरलेले नेतृत्व विस्तृत लिहिलेले आहे. असे वाटते, राजकीय पक्ष मग तो कोणताही असो, गोंधळ घालून बाहेर पडण्याचे मला वाटते नाना पटोले यांना आता व्यसन लागले आहे काय, भाजपातर्फे खासदार होण्यापूर्वी ते काँग्रेस मधून आमदार झाले होते, तेव्हाही मला आठवते त्यांनी असाच काँग्रेस विरुद्ध अधिवेशन सुरु असतांना भर विधानसभेत गोंधळ घातला होता, भर अधिवेशनात काँग्रेस नेतृत्वाविरुद्ध गरळ ओकली होती, आरडाओरड करूनच त्यांनी काँग्रेस सोडली होती, भाजपा मध्ये पुढे ते जाऊन बसले होते. थोडक्यात ज्या पक्षाने उमेदवारी दिली त्यांनाच काही वर्षानंतर असे कोंडीत पकडून त्यांचे हे गोंधळ घालणे नेहमीचेच झाले आहे, असावे….


नागपूर अधिवेश्नावरून मुंबईत परतल्यानंतर थोडा रिलॅक्स होतो, तसेही तुमच्या आयुष्यात कोणी खास असे नसेल तर फावल्या वेळात काय करायचे, हा आम्हा पुरुषांना नेहमी प्रश्न पडलेला असतो, आणि या डिसेंबर सारख्या रोमँटिक महिन्यात जर एकटेच कॉफी घेत बसणे आम्हा पुरुषांच्या नशिबात असेल तर अशावेळी एकांत शोधून डोक्याचे केस उपटणे तेवढे आमच्या हाती असते, वेळ होता, तेवढ्यात मुंबईतल्या पार्ले पूर्व भागातल्या आमदार पराग अळवणी यांचे पार्ले महोत्सवानिमित्ते आग्रहाने बोलावणे आठवले, फोन करून त्यांना विचारले, ते ‘ या ‘ म्हणाले, पार्ले पूर्व भागात जेथे पार्ले मोहत्सव सुरु होता तेथे गेलो, आणि तेथे जाण्याने सार्थक झाले, मनाला वाटले. अळवणी दाम्पत्याशी मनमोकळ्या गप्पा मारतांना समाधान झाले, एकच सांगतो, जो कोणी पराग अळवणी यांच्या पार्ले महोत्सवाची नक्कल करेल, त्याला आमदार होणे, आमदारकीला निवडून येणे, हातचा मळ असेल. एक मात्र नक्की केवळ आमदार होणे म्हणून पार्ले महोत्सवाचे आयोजन हे असे पराग आणि ज्योती या अळवणी दाम्पत्याचे त्या नजरेतून नियोजन नाही, कारण ते सत्तेत असले तरी आणि नसले तरी त्यांचे हे दरवर्षी महोत्सव भरविणे नित्याचे नेहमीचे झालेले आहे. घाम काढणारा हा महोत्सव अळवणी दाम्पत्याचे ते पॅशन आहे, सतत १८ वर्षे ते दोघे सत्तेत असलेत तरी आणि नसलेत तरी त्यांचे हे पार्ले महोत्सव दरवर्षी डिसेंबर महिन्यात सतत ७-८ दिवस भरविणे, मला वाटते त्यांना लागलेले जडलेले हे चांगले व्यसन आहे…


आमदार पराग अळवणी हे विचित्र नाहीत पण त्यांचा विधान सभा परिसर अत्यंत विचित्र पद्धतीने त्यांच्या वाटेला आलेला आहे, आम्हा मुंबईकरांना वाटते, मुंबईतल्या सदाशिव पेठेचे म्हणजे मुंबईतल्या पुण्याचे – विलेपार्ले पूर्व विभागाचे अळवणी तेवढे आमदार आहेत, नो, असे अजिबात नाही, विशेष म्हणजे त्यांचे जवळपास ५० टक्के मतदार झोपड्पट्टीतले आहेत, अळवणी म्हणाले, त्यांच्या न्यायहक्कासाठी मी लढत आलोय म्हणून ते माझे अगदी हक्काचे मतदार आहेत, आम्ही एकमेकांशी अतिशय क्लोज आहोत. तिकडे थेट, पार कालीना सांताक्रूझ पूर्वेपासून तर थेट इकडे सांताक्रूझ पश्चिम आणि जुहूपर्यंत थोडक्यात अगदी तुकड्यातुकड्यात अळवणी यांचा विधानसभा मतदार संघ अतिशय दुर्गम पद्धतीने विखुरला आहे,पसरला आहे, विस्तारला आहे आणि हे अतिशय दगदगीचे आहे, सततची धावपळ, त्यांना त्यातून अंगवळणी पडली आहे…


थोडेमी जरासे जरी मतदारांकडे दुर्लक्ष झाले तरी मोठी किंमत मोजावी लागते, मोजलेली आहे, पराग गप्पांच्या ओघात म्हणाले. एक बरे झाले, आम्हाला समजले कि पराग तेवढे पार्ले पूर्व साठी मर्यादित नाहीत, त्यांचे विधान सभा परिक्षेत्र फार मोठे आहे, प्रचंड परिसरात विभागलेले आहे, त्यांनी आपल्या मतदार संघात भाजपा चे एकंदर पाच नगरसेवक निवडून आणतांना मोठे कष्ट घेतलेले आहेत, त्या पाच मध्ये अर्थात एक आहेत, ज्योती पराग अळवणी….

क्रमश:


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *