आमची बँक : पत्रकार हेमंत जोशी

आमची बँक : पत्रकार हेमंत जोशी 

रामदेव बाबांना ढोपरापासून सलाम सॅल्यूट नमस्कार त्यांनी जगविख्यात कोलगेट टूथपेस्टला देखील नमवले झुकवले, रामदेवबाबांनी भारतीय योगा आधी जगाच्या कानाकोपऱ्यात नेला, थोडा कालावधी आणखी जाऊद्या, आयुर्वेदाला देखील ते जगाच्या कानाकोपऱ्यात योगविद्येच्या रांगेत आणून ठेवतील, आता तर थेट कोलगेट ने देखील आयुर्वेदिक टूथपेस्ट बाजारात आणली आहे, मला हे असे मर्द भारतीयांचे पराक्रम बघून अतिशय आनंद होतो, तुम्हालाही होत असेल…


भाईजी राधेश्याम चांडक यांनी स्थापन केलेल्या बुलडाणा अर्बन बँकेवरून हे रामदेवबाबा आठवले. वास्तविक ‘ बुलडाणा ‘ हा विदर्भातही एक अविकसित जिल्हा. ३२ वर्षांपूर्वी तर हा जिल्हा फारसा कुणाला परिचितही नव्हता, त्याकाळी वर्तमान पत्रे व रेडिओ वगळता प्रसिद्धीची फारशी माध्यमे देखील उपलब्ध नसल्याने कदाचित ते घडत असावे पण भाईजी उर्फ राधेश्याम चांडकजी यांनी १०० टक्के केवळ पतसंस्थेच्या भरवशावर या जिल्ह्याचे नाव उभ्या राज्यात किंबहुना देशाच्या विविध भागात देखील रोशन करून सोडले. बुलडाणा जिल्हा केवळ ‘ बुलडाणा अर्बन ‘ या भन्नाट पतसंस्थेमुळे नावारूपाला आला, असे म्हटल्यास त्यात वावगे ते कसले…काहींचे आयुष्याचे प्रवास त्यांना मिळालेल्या यशामुळे थक्क करणारे असते. मला एसएससीला मिळालेले ५२ टक्के गुण माझ्या शिक्षकांना असेच थक्क करणारे होते किंवा रामदास कदमांनी घेतलेला प्लास्टिक बंदीचा निर्णय देखील असाच थक्क करणारा होता, थक्क करणारा आहे, कदम देखील एखादे चांगले काम करू शकतात, त्यांना जवळून ओळखणाऱ्यांनी तोंडात बोटे घातली आहेत फक्त राज ठाकरे म्हणाले ते घडू नये म्हणजे येणाऱ्या निवडणुकांसाठी लागणाऱ्या फंडासाठी हे नाटक आहे, असे ते जे म्हणताहेत ते घडले नाही म्हणजे रामदास कदम जिंकले असे म्हणता येईल पण घेतलेला प्लास्टिक बंदीचा निर्णय बारगळला तर, जे अपेक्षित होते तसे कदम वागले, असे म्हणून या राज्यातले समस्त मराठी जन कपाळावर हात मारून घेतील…


बुलडाणा अर्बन बँकेचा कम पतसंस्थेचा, आणि या उपक्रमाला पुढे नेणाऱ्या श्री श्री राधेश्याम चांडक यांचा हा आजवरचा प्रवास असाच थक्क करणारा, म्हणजे महाराष्ट्राबरोबर गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, गोवा, तेलंगणा, सीमांध्र तर थेट अंदमान निकोबार या सर्व राज्यात आर्थिक सेवा देण्यात बुलडाणा अर्बनला जे यश मिळालेले आहे किंवा देशातल्या प्रथम क्रमांकाची पतसंस्था असलेल्या चांडकजींच्या ‘ बुलडाणा अर्बन ‘ ची आशियातील अव्वल संस्थेच्या दृष्टीने जी वाटचाल सुरु आहे ती एकाचवेळी पाचही बोटे तोंडात घालायला लावणारी म्हणजे तोंडाचा ‘ आ ‘ वासायला लावणारी….


कदाचित सांगून खोटे वाटेल पण सुरुवातीला म्हणजे तब्बल ३२ वर्षांपूर्वी बुलडाणा अर्बन भाईजींनी १२ हजार रुपयांच्या भांडवललवार आणि फक्त ७२ सदस्यांच्या उपस्थितीत अत्यंत दुर्लक्षिलेल्या बुलडाणा जिल्ह्यातून, बुलडाणा शहरातून सुरु केली आणि एकेकाळीच्या शेम्बड्या, बावळट मुलीने पुढे मिस वर्ल्ड ‘किताब मिळवावा तसे बुलडाणा अर्बन चे झाले, रोपट्याचे रूपांतर वटवृक्षात झाले, म्हणजे, ‘ आपला कृपाभिलाषी ‘ च्या वर सही करणार्याने एक दिवस शिक्षणमंत्री व्हावे तसे बुलडाणा अर्बन चे झाले, कारण ज्या तडफेने ३२ वर्षांपूर्वीचे भाईजी किंवा त्यावेळेचे त्यांचे शिरीष देशपांडे किंवा डॉ. किशोर केला यांच्या सारखे सहकारी ज्या तडफेने जिद्दीने तळमळीने हि पतसंस्था वाढविण्यात व घडविण्यात २४ तास जणू गढलेले असायचे, आजही त्यांचे तेच, सतत रामनामाचा जप करणार्यांसारखे ते ‘ बुलडाणा अर्बन, बुलडाणा अर्बन ‘ करीत असतात, घोकत असतात. अगदी अलीकडे देशात कौतुकाचा विषय ठरलेली हि पतसंस्था म्हणजे बुलडाणा अर्बन आत थेट मुंबईत देखील डेरे दाखल झालेली आहे, शिवाजी पार्कात, माँ साहेबांच्या पुतळ्याजवळ. जे इतरत्र कायम कटकटीचे वाटते ते सारे येथे अतिशय सोपे जाते असे बुलडाणा अर्बन चे ग्राहक हमखास सांगतात, अनुभव घ्यायला काय हरकत आहे…

क्रमश:


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *