नेत्यांचे वाईट धंदे : पत्रकार हेमंत जोशी

नेत्यांचे वाईट धंदे : पत्रकार  हेमंत जोशी 

हे बघा, जाळ्यात अडकलेला मासा जाळ्याच्या आतून बाहेरचे बघू शकतो पण त्यातून तो बाहेर पडू शकत नाही, अगदी वाघाचे देखील तेच होते, एवढा ताकदवान प्राणी पण पिंजऱ्यात अडकला कि ताकद निरुपद्रवी ठरते आणि पिंजऱ्याबाहेर उभे असलेले माकड देखील त्याला वाकुल्या दाखवून मोकळे होते किंवा पिंजऱ्याभोवती जमलेली लहान मुले दगडं मारून मारून मोकळी होतात. माणसांचेही तेच आहे, मोहपाशात अडकलेली विशेषतः व्यसनाधीन माणसे, त्यांना हे कळत असते कि बाहेरची माणसे त्यांना काय म्हणताहेत तरीही ते त्यातून बाहेर पडायला तयार नसतात, आयुष्याचा वाईट अंत करवून घेतात…


दारिद्र्याला कंटाळलेले असे कितीतरी कि त्यांनी दारिद्र्याच्या जॊखडातूनबाहेर पाडण्यासाठी म्हणजे श्रीमंत होण्यासाठी त्यांनी नको ती पापे, नको ते धंदे केलेले आहेत पण अमाप पैसे मिळविल्यानंतरही हि मंडळी चुकीची कामें करून मोकळी होणार असतील तर हा त्यांचा देशद्रोह आहे, म्हणणे अजिबात चुकीचे ठरणार नाही समजा १५ वर्षांपूर्वी दारिद्र्यात खितपत पडलेले अमरावतीचे आमदार श्रीकांत देशपांडे त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी अगदी सुरुवातीला काही बरी वाईट कामे करून पैसे मिळविले असतील तर प्रसंगी त्यांच्या त्या वाईट कामांकडे माहितगार दुर्लक्ष देखील करतील पण दुर्दैवाने शिक्षकांचे अमरावती भागातले हे आमदार जर उद्या पुण्यामध्ये, मिळविलेल्या काळ्या कमाईतून एखादा वाईट व्यसनांना चालना देणारा म्हणजे एखादा पिकअप पॉईंट असलेला पब चालवीत असतील, मोठी किंमत मोजून एखादा असा पब विकत घेत असतील तर त्यांच्या या गैरकृत्याला का म्हणून माफ करावे, उलट असे नेते लोकांसमोर नागडे करून मोकळे व्हावे…


www.vikrantjoshi.com


अर्थात येथे हे सहजच उदाहरण दिले, देशपांडे हे असले उद्योग करीत असतील, असेही नाही किंवा मागेही एकदा मी या राज्यातल्या एका आमदाराला म्हणजे अमुक एका जातीचे नेतृत्व करणाऱ्या विधान परिषद सदस्याला हेच म्हणालो होतो कि तुम्ही जेव्हा अतिशय दारिद्र्यावस्थेत होता, तुम्हाला मी तेव्हापासून अगदी जवळून ओळखतो, नंतर तुम्ही नको ते उद्योग करून प्रचंड पैसे मिळविले, चुकीच्या पद्धतीने लोकांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावणाऱ्या नाशिकच्या आणि पुण्यातल्या दोन वेगवेगळ्या भामट्यांना वाचविण्यासाठी तुम्ही त्यांच्याकडून प्रचंड पैसे मिळविले, त्यापैकी नाशिकचा तो भामटा तुरुंगात गेला नाही पण पुण्यातला मात्र अद्याप तुरुंगात आहे, ज्याने अनेकांना ‘ चिट ‘ करून फंड्स मिळविलेले आहेत, मला तेव्हा देखील फारसे वाईट वाटले नाही पण अलीकडे तुमचे मुंबईत ठिकठिकाणी ‘ हॅपी एंडिंग ‘ करणारे थोडक्यात पडद्याआड वेश्या व्यवसाय चालविणारे जे मसाज पार्लर्स आहेत, हे तुम्हाला अजिबात न शोभणारे आहे. त्यावर ते म्हणाले, ते मसाज पार्लर्स माझे नाहीत, माझ्या अमुक एका कार्यकर्त्याचे आहेत, त्यावर मी एवढेच म्हणालो, पोलिसांवर दबाव असल्याशिवाय, मुंबईत वेश्या व्यवसाय करणारे एकही मसाज पार्लर चालणे अशक्य आहे, असते. मी दुधखुळा नाही, पण हे असे वागणे योग्य नाही, त्यांना त्याचे काहीही वाटले नसावे, बेशरम माणसाच्या ढुंगणावर झाड उगवले तरी त्याला त्याचे काहीही वाटत नसते, याला तो म्हणतो, सावली झाली, मस्त गार गार वाटते…


आपल्या घरातले पुरुष मसाज घ्यायला नेमक्या कोणत्या प्रकारच्या पार्लर्स मध्ये जातात त्यावर करडी नजर ठेवणे अत्यावश्यक ठरते, असते. ज्या मसाज पार्लरला चावट पुरुष हॅपी एंडिंग करणारे मसाज पार्लर म्हणतात, तो एकप्रकारे छुपा वेश्या व्यवसाय करणारा अड्डा असतो, हे त्यातले नेमके सत्य आहे पण मोठमोठाल्या शहरांमधून सारेच मसाज पार्लर छुपा वेश्या व्यवसाय करणारे असतात, असेही नाही, काही पार्लर्स अतिशय प्रोफेशनल असतात, तेथे चावट चवीचे ग्राहक घुसले आणि नको ती मागणी करायला लागले तर अशा ग्राहक मंडळींना प्रसंगी बाहेर देखील काढल्या जाते पण असे पार्लर्स फार कमी असतात, अभावाने दिसतात…

तूर्त एवढेच :

पत्रकार  हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *